देव आनंद –सुरैयाची अधुरी एक प्रेम कहाणी
हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील चॉकलेट हिरो देव आनंद आणि गायिका अभिनेत्री सुरैया (Dev Anand Suraiya) यांच्या प्रेमाचा अध्याय अधुराच राहिला. देवआनंद चित्रपटात येण्यापूर्वीच सुरैयाचा हिंदी सिनेमांमध्ये प्रवेश झाला होता. गायिका अभिनेत्री हे तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्या आवाजामध्ये एक प्रकारचा लाडिकपणा होता. श्रोत्यांना खेचून ठेवणारा असा तो स्वर होता. तिचा पडदा वरील ॲपीअरन्स देखील डिसेंट होता. गोल गरगरीत चेहरा, टपोरे डोळे, गोरा गुलाबी रंग आणि संवेदनशील चेहरा हे तिचं ॲसेट होतं. देवआनंद आणि सुरैया पहिल्यांदा ‘विद्या’ या चित्रपटात एकत्र आले. सुरय्या सांगते,” (Dev Anand Suraiya) देवआनंद खूपच लाजरा होता. विशेषतः रोमँटिक सीन करताना तो खूपच नर्व्हस व्हायचा.” पण सुरैया ने त्याला समजावून घेतले आणि दोघांमधील मैत्री वाढत गेली. देवला पहिल्या भेटीपासूनच ती खूप आवडली होती पण ती मोठी अभिनेत्री होती त्यामुळे तो तिच्याशी बोलायला देखील घाबरत असे. पण एक प्रसंग असा आला, ज्यामुळे ते दोघे एकत्र आले. ‘विद्या’ या चित्रपटाच्या शूटच्या दरम्यान एका नावेत बसून दोघांना एक शॉट द्यायचा होता. शॉर्टची तयारी पूर्ण झाली. देव आनंद सुरैयाला (Dev Anand Suraiya) घेऊन पाण्याच्या थोडासा आत गेला पण पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यामुळे ती बोट बुडाली.
सुरैयाला पोहता येत नव्हते. त्यामुळे देव खूप घाबरला पण त्याने जीवाची बाजी लावत तिला किनाऱ्यावर आणले. सुरैया खूपच घाबरली होती तिला वाटलं आता सगळं संपलं पण देवने तिचा जीव वाचवला. नंतर ती देव आनंदला म्हणाली ,”जर आज तू नसतास तर मी जिवंत राहिले नसते!” त्यावर देव आनंद तिच्याकडे झुकून तिच्या कानात घोगऱ्या स्वरात म्हणाला,” तसं झालं असतं तर मी तरी कुठे जिवंत राहिलो असतो?” या एका वाक्याने जादू केली. सुरैया देवच्या (Dev Anand Suraiya) त्या अस्पष्ट वाक्याने नखशिखांत मोहरून गेली. तिच्या मनात त्याच्याविषयी असलेल्या भावना चेहऱ्यावर उमटून लागल्या. तिचा आरक्त चेहरा देवला सगळं काही सांगून गेला. तिथून त्या दोघांमधील नात्याने एक वेगळे वळण घेतलं. देव आणि सुरैया प्रेमाच्या नात्यात गुंफले गेले.
पण त्यांच्या प्रेमाला नजर लागली. सुरैयाच्या सख्या आजी चीच! तिला हे नाते अजिबात पसंत नव्हते. ही आजी म्हणजे बादशाह बेगम. सुरैयाच्या आईची आई. तिने सुरैयाला स्पष्ट शब्दात देव पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. सुरैया आजीच्या खूप धाकात होती. देवआनंद तर सुरैयासाठी (Dev Anand Suraiya) पागल झाला होता. तो तिला म्हणाला ,”आपण पळून जाऊन लग्न करू.” पण याची खबर देखील आजीला आधीच लागली. आणि तिने आता डोळ्यात तेल घालून आपल्या नातीवर पहारा चालू ठेवला. आजीचा मुख्य विरोध दोघांच्या धर्मातील अंतराला होता. देवआनंद खुल्या विचारांचा होता. तो म्हणाला,” जात धर्म या सर्व गोष्टी प्रेमापुढे फिजूल आहेत. देवचे ते बोलणे त्याचे हसणे त्याचा लूक सुरैयाला खूप आवडायचा. तिला देव आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे देव आनंद हॉलिवूडचा त्या काळातील अभिनेता ग्रेगरी पॅक याच्यासारखाच दिसायचा. तिचा ग्रेगरी पॅक हा आवडता हिरो होता. ती मुद्दाम देवला ग्रेगरी सारखे हेअर स्टाईल करायला सांगायची. (एकदा ग्रेगरी पॅक तिला भेटायला रात्री दोन वाजता तिच्या मरीन ड्राईव्ह च्या घरी आला होता!)
दोघांमधील नातं फुलत होतं पण दुसऱ्या बाजूने या नात्याला छेद देण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणावर चालू होता आता. सुरैयाची आजी सेटवर येऊन देखील डायरेक्टरला सुचना देत होती,” यांच्यात कुठले प्रेम प्रसंग ठेवायचे नाही ते दोघे एकमेकाला स्पर्श करता कामा नये!” मग डायरेक्टर आयडिया करून आजीला थोडेसे बाजूला न्यायचे आणि या दोघांचे शॉट शूट करून घ्यायचे. एकदा एका चित्रपटाच्या शॉट च्या वेळी देवला सुरैयाच्या डोळ्याला किस करायचे होते. सुरैया खूपच मोहरून गेली होती. तिने डोळ्याच्या पापड्या बंद केल्या आणि देवने आपले ओठ तिच्या पापण्यांवर ठेवले. सुरैया तो शॉट रिटेक व्हावा अशी प्रार्थना करत होती. पण त्यांच्या प्रेमातील बिब्बा आजी तिथेच जवळपास असल्याने तो शॉट आवरता घ्यावा लागला.
मग देव आनंद यांनी एक आयडिया लढवली. सुरैया राहत असलेल्या मरीन ड्राईव्हच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर ते भेटू लागले. देव आनंद मागच्या जिन्याने टेरेसवर आधी जाऊन बसत असे. देव चा मित्र द्वारका दिवेचा (शोले चा छायाचित्रकार) सुरैया च्या घरी तिच्या आजीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत असे. सुरैया त्यावेळी पटकन वर जाऊन पाण्याच्या टाकीच्या मागे जाऊन ते भेटत असत आणि जिन्यात बसून गप्पा मारत. रुपेरी पडद्यावर या दोघांनी यांनी एकूण सात चित्रपटात काम केले. (Dev Anand Suraiya)
======
हे देखील वाचा : दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!
======
पण या प्रेमप्रकरणामुळे देवच्या करिअरवर परिणाम होईल अशी भीती चेतन आनंद यांना वाटत होती. यातून काहीही साध्य होणार नसेल तरी यातून बाहेर पड असाही सल्ला त्यानी दिला. देवने एकदा सुरैया ला एक अंगठी प्रेझेंट दिली. ती अंगठी पाहून सुरैयाच्या आजीने राडा केला आणि ती अंगठी तिच्या पोटातून हिसकावून खिडकीतून दूर समुद्रात फेकून दिली. सुरैया रात्रभर रडत राहीली. पण नाईलाज होता. शेवटी दोघांनीही समंजसपणे दूर होण्याचा निर्णय घेतला. शेवटची भेट त्यांची पुन्हा मरीन ड्राइव्हच्या सुरैया च्या घराच्या टेरेसवरच झाली. त्यावेळी देवआनंद ने त्याच्या पोलीस मधील एका मित्राला देखील सावध करून ठेवले होते कारण त्या पोलीस मित्रांने देवला सांगितले होते ,”सुरैयाची सासू पाताळ यंत्री आहे. ती गुंडांना तुझ्यावर पाठवू शकते.” त्या संध्याकाळी दोघे आणि त्या टाकीच्या मागे भेटले. दोघे भरपूर रडले. आपल्या अयशस्वी प्रेमाच्या कहाणीने दोघेही प्रचंड अस्वस्थ झाले आणि पुन्हा कधीही न भेटण्याचा निर्णय घेऊन ते दूर झाले. देवआनंद या घटनेतून लवकर सावरला. त्याने पुढे काही वर्षातच अभिनेत्री कल्पना कार्तिक सोबत लग्न केले. सुरैया मात्र देवला कधीच विसरू शकली नाही. तिने पन्नास च्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपटात काम करणे हे कमी केले. 1963 साली आलेला ‘रुस्तुम सोहराब’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर पुढची चाळीस वर्षे सुरैया मरीन ड्राईव्ह च्या आपल्या घरामध्ये एकाकी राहत होती. पहिलं प्रेम ती कधीच विसरली नाही. आयुष्यभर ती देवच्या आठवणीत रमत राहिली आणि ३१ जानेवारी २००४ या दिवशी ती अल्लाला प्यारी झाली!
धनंजय कुलकर्णी