मन्नाडे यांच्या एका लोकप्रिय गाण्यातून ‘हा’ बिजनेस झाला सुरू…
सिनेमाच्या दुनियेत कधीकधी इतक्या मजेदार गोष्टी घडतात की, आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण होऊन जाते. गायक कलाकार मन्नाडे (Manna Dey) यांनी एक गाणं बंगाली भाषेत १९६९ साली गायले होते. बंगाली भाषेतील हे प्रचंड लोकप्रिय असं गाणं ठरलं. आज देखील बंगालीमध्ये या गाण्याला प्रचंड मागणी आहे. हे गाणं आल्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन या गाण्यातील शब्द घेवून मन्नाडेच्या (Manna Dey) नावाने बंगालमधील पाच तरुणांनी एका रेस्टॉरंटची स्थापना केली. या रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक बंगाली फूड मिळू लागलं. या रेस्टॉरंटची लोकप्रियता एवढी वाढली की, आज कलकत्ता आणि बंगालमध्ये या रेस्टॉरंटच्या अनेक फ्रॅंचाईजी आहेत. चेन रेस्टॉरंटच्या रूपात त्याच्या शाखा आता भारतात देखील सुरू झालेल्या आहेत. एका गाण्याच्या लोकप्रियतेतून हा बिजनेस सुरू झाला आणि आज प्रचंड मोठा झालेला दिसतो. कोणतं गाणं होतं ते? आणि काय होता त्याचा किस्सा?
१९६९ साली मन्नाडे (Manna Dey) यांनी ‘प्रोथोम कदम फूल’ या चित्रपटासाठी एक गाणं गायलं होतं ‘ऑमी श्री श्री भोजाहोरी मन्ना’ या गाण्याला बंगाली पब्लिकने इतकं उचलून धरलं की, तिथल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हे गाणं हमखास ऐकायला मिळू लागलं. हा चित्रपट देखील या गाण्यामुळे हिट झाला. चित्रपटात हे गाणे समित भांजावर चित्रित झालं होतं. (हा समित भांजा म्हणजे आपल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटातील जया भादुरीचा नायक!) ऑमी श्री श्री भोजहोरी मन्ना’ प्रचंड लोकप्रिय ठरलं.आजही मागच्या १०० वर्षातील बंगालीतील पहिल्या दहा लोकप्रिय गाण्यात याचा समावेश होतो. त्या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा देखील तितकाच भन्नाट असा आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, मन्नाडे (Manna Dey) हे स्वतः प्रचंड ‘फुडी’ आणि चांगले ‘कूक’ देखील होते. संगीतकार मदन मोहन यांना ते आवडीने ‘मटण करेला’ची डिश बनवून खिलवत असे. मदन मोहनच्या ‘देख कबीरा रोया’ या चित्रपटातील ‘कौन आया मेरे मन के द्वारे…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंग पूर्वी मदन मोहनने मन्नाडे कडे या डिश ची ‘खास’ फर्माईश केली होती आणि तिथून पुढे मन्नाडे कायम मदन मोहन यांना ‘मटन करेला’ ही डिश ‘खिलवत’ असे. तर आता येऊ आपण मूळ किस्स्याकडे. हे बंगाली गाणं कसं बनलं त्याची एक मजेदार स्टोरी आहे. एकदा बंगाली गीतकार पुलक बॅनर्जी, मन्नाडे यांना भेटायला गेले त्यांच्या घरी होते. मन्नाडे (Manna Dey) यांची पत्नी सुलोचना त्यावेळी एका शाळेमध्ये टीचर होत्या आणि त्या शाळेत गेल्या असल्यामुळे मन्नाडे एकटेच घरी होते. घरी मेहमान आल्यामुळे मन्नाडे (Manna Dey) यांनी ताबडतोब किचनचा ताबा घेतला आणि आपले मित्र पुलक बॅनर्जी यांच्यासाठी चिकन बनवायला घेतले. मन्ना स्वत: हौशी कुक होते त्यामुळे त्यांनी अतिशय तब्येतीने हे चिकन बनवले होते. त्यात घातलेल्या मसाल्यांचा सुगंध बाहेर हॉलमध्ये बसलेल्या पुलक बॅनर्जी यांना सुखावून गेला. ‘जिसकी खुशबू इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा!’ असं कदाचित त्यांच्या मनामध्ये आले असावे. त्या आनंदाच्या क्षणी त्यांना काही ओळी सुचल्या. त्यांनी तिथल्या तिथे वही पेन काढले आणि ठरवले की हे चिकन बनेपर्यंत या मस्त सुगंधी ‘खुशबू’ मध्येच आपण एक गाणं लिहून टाकू! आणि मन्नाडे किचनमध्ये असतानाच त्यांनी गाणं लिहून टाकलं. ‘ऑमी श्री श्री भोजाहोरी मन्ना’ जेवणाच्या टेबलवर पुलक बॅनर्जी यांनी हे गाणं मन्नाडे यांना ऐकवले. त्यांना हे गाणं खूपच आवडले आणि ते म्हणाले ,” हे गाणं नक्की मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करेन.”
=======
हे देखील वाचा : जावेद अख्तर यांची लव्हस्टोरी पूर्ण करण्यासाठी सलीमचा हात
=======
हा योग लवकरच आला आणि ‘प्रोथोम कदम फूल’ या चित्रपटासाठी हे गाणं रेकॉर्ड झालं. हे गाणं संगीतबद्ध केलं होतं सुधीन दासगुप्ता यांनी. या गाण्याला बंगाली लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतले. ज्याच्या त्याच्या तोंडी हे गाणं त्याकाळी घोळत होतं. शाळेतील, कॉलेजमधील गॅदरिंगमध्ये या गाण्याने एकच धूम बसवली होती. समूह स्वरात देखील हे गाणं गायलं जात होतं. या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन २००३ झाली बंगालमधील पाच तरुणांनी ऑथेंटिक बंगाली फूड लोकांना खायला मिळावं म्हणून एका चेन रेस्टॉरंटची सुरुवात केली आणि या रेस्टॉरंटला नाव दिलं ‘भोजोहारी मन्ना!’
जाता जाता थोडंस या ‘प्रोथोम कदम फूल’या सिनेमाबद्द्दल. कारण याचे बरेचसे धागेदोरे आपल्याशी जुळले आहेत. या सिनेमात सौमित्र चटर्जी आणि तनुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातील गाणी आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायली होती. ‘भोजोहारी मन्ना’ या रेस्टॉरंट ची चेन आता बंगळूरू,दिल्ली आणि मुंबई पर्यंत पोचली आहे. मन्नाडे यांच्या एका लोकप्रिय गाण्याने इतिहास घडवला.