‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आर्या- एक सक्षम आई
ऑनलाईन ॲप : हॉटस्टार
पर्व : पहिले
स्वरूप : थरारक नाट्यपट
दिग्दर्शक : राम माधवनी, संदीप मोदी आणि विनोद रावत
मुख्य कलाकार : सुश्मिता सेन, चंद्रचूड, सिंग, सिकंदर खेर, नमित दास, माया सारावो आणि इतर
सारांश : नऊ भागांच्या या सिरीजची मुख्य मदार सुश्मिता सेनच्या खांद्यावर आहे आणि आपल्या दमदार अभिनयाने ही जबाबदारी ती उत्तमरीतीने सांभाळते.
—
एक सुखवस्तू कुटुंब राजा, राणी आणि त्यांच्या तीन मुलांचं…
राजा आणि राणीचं एकमेकांवर आणि त्यांच्या मुलांवर भरपूर प्रेम असतं. त्यांच्या महालात ते आनंदात जगत असतात. एकेदिवशी महालाभोवती काळ्या ढगांचा वेढा जमू लागतो. राजा या आपल्या कुटुंबाला वाचवायला म्हणून या ढगांचा पाठलाग करून त्यांना परतून लावायला घोड्यावर स्वार होऊन जंगलात कुच करतो…
एखाद्या परीकथेतील गोष्टीची आठवण यावी अशा पार्श्वभूमीवर ‘आर्या’ या वेबसिरीजचा पाय रचलेला आहे. तेज, आर्या आणि त्यांची तीन मुले वीर, आरु, आदी राजस्थानच्या एका गावात आनंदाने आयुष्य घालवत असतात. तेज, त्याचा मित्र जवाहर आणि आर्याचा भाऊ संग्राम हे तिघे आर्याचे वडील झोरावर यांचा औषधनिर्मितीचा व्यवसाय सांभाळत असतात. पण वरवर दिसणाऱ्या या व्यवसायाच्या आड ते अफूच्या निर्यातीचा अवैध व्यवसाय करत असतात. आर्याला कदाचित या व्यवसायासोबत आलेल्या अनिश्चित आणि असुरक्षित आयुष्याची जाणीव लहानपणापासून असल्यामुळे असेल, तेजने या व्यवसायातून शक्यतितक्या लवकर बाहेर पडावे अशी तिची इच्छा असते. दरम्यान शाळेत काही मुलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांना घाबरविण्याच्या उद्देशाने आदी तेजची बंदूक गाडीतून चोरतो आणि शाळेत मुलांसमोर धरतो. या घटनेनंतर त्याला शाळेतून काढलं जातं. या अनैतिक व्यवसायाची सावली आपल्या मुलांच्या भविष्यावर पसरत असल्याची जाणीव आर्याला होते आणि ती तेजला एकतर व्यवसाय सोडायचा किंवा तिला घटस्फोट द्यायचा यातील एक निर्णय घ्यायला लावते. दरम्यान तेजही या व्यवसायापासून दूर जाण्याच्या निर्णयापर्यंत आलेला असतो. त्यासाठी त्याने पावलेही उचलायला सुरवात केलेली असते. कुटुंबाला घेऊन कायमच न्यूझीलंडला जायच योजना त्याने आखलेली असते. दरम्यान दुसरीकडे आर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असते. या सगळ्यामध्ये संग्राम त्यांचा प्रतिस्पर्धी शेखावतचा ३०० कोटीचा अफूचा माल चोरतो आणि सगळ्यांना वेगळ्याच गुंत्यात टाकतो. तेज आलेली परिस्थितीचा अंदाज घेऊन पावलं उचलणार त्याआधीच घरासमोरच एका अज्ञात बाइकस्वार त्याला गोळ्या घालतो. ही घटना आदी पाहतो. सगळ्या गडबडीत शेखावतकडून चोरलेला माल गहाळ होतो आणि माल किंवा ३०० कोटी परत मिळविण्यासाठी शेखावत या कुटुंबाच्या मागे लागतो. आता एकीकडे तेज्च्या खुन्याचा छडा लावायचा, दुसरीकडे बुडीत निघालेल्या व्यवसायाला सावरायचं आणि तिसरीकडे शेखावतचा बंदोबस्त करायचा या कात्रीमध्ये आर्या अडकलेली असते. त्यात आई म्हणून आपलं घर आणि मुलं यांना सांभाळायची जबाबदारी आता तिच्या एकट्याच्या खांद्यावर आलेली असते. या सगळ्या जबाबदाऱ्या आर्या यशस्वीपणे सांभाळते का? ३०० कोटीच्या अफूच काय होतं? आर्या आणि तिचं कुटुंब न्युझीलंडला जात का? यासाठी सिर्ज पहायला लागेल.
सिरीजच मुख्य आकर्षण अर्थातच सुश्मिता सेन आहे. तब्बल पाच वर्षांनी ती पडद्यावर आलेली आहे. अशावेळी तिच्याकडून दमदार पदार्पणाची अपेक्षा तिच्या चाहत्यांना होती. आर्याच्या भूमिकेच्या माध्यमातून ती या अपेक्षावर पूर्णत्वास उतरते. ही सिरीज म्हणजे ‘सबकुछ सुश्मिता’ आहे असं म्हटलं तर काही खोटं नाही. डच सिरीज ‘पेनोझा’वर ही सिरीज आधारित आहे. त्यामुळे सिरीजचं कथानक घट्ट साच्यामध्ये बसलेलं आहे. कुठल्याही क्षणी कथानकाची घडी चुकल्याची जाणवत नाही. पण त्याचवेळी कथानकाचा पसारा इतका मोठं आहे की त्याला आवरत घेण्याचा मोहही दिग्दर्शकाने घेतलेला नाही. त्यामुळे किमान ४५-५५ मिनिटांच्या प्रत्येक भागामध्ये एकाच वेळी घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी काही घटनांना कात्री लावली असती तरी मूळ कथानकाला धक्का पोहचला नसता. तेजच्या मृत्युनंतर मुलांचं बिथारण, आदीच वडिलांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यामुळे मानसिकदृष्ट्या खचण, आरीचं तिच्या मावशीच्या नवऱ्यामध्ये वडिलांना शोधणे, वीरच नव्याने उमगलेल्या प्रेमाच्या वाऱ्यात गरजेपेक्षा जास्त गुंतणे हे सगळे नाजूक विषयही आर्याला हाताळायचे असतात. त्याचवेळी तिच्या वडिलांचा बाहेरख्यालीपणा, जोरावरचं नशेच्या आहारी बेफान वागणं, तुरुंगात अडकलेल्या भावाला सोडवणं असे कितीतरी प्रश्न आर्याच्यासमोर असतात. हे सगळे पेच सोडवताना चोरीचा माल आणि त्याभोवतीचे रशियन माफियाचे संबंध हा गुंताही तिच्यासमोर असतो. हे सगळं मांडताना मालिकेच कथानक प्रचंड मोठं झालं आहे. त्यामुळे जोपर्यंत आर्या मुख्य सूत्र हाताळत नाही, तोपर्यंत मालिकेच्या कथानकामध्ये संथपणा जाणवतो. म्हणूनच सुरवातीचे काही भाग पाहताना कंटाळा जाणवतो. पण ज्यावेळी कथानकाची दोरी संपूर्णपणे सुश्मिताच्या हाती येते, तिथून मात्र मालिका वार्याच्या वेगाने पुढे पळते.
सुश्मितासोबत चंद्रचूड, सिकंदर, माया, नमित दास अश्या कसलेल्या कलाकारांची एक फळी या सिरीजमध्ये पहायला मिळते. प्रत्येकजण आपापल्यापरीने भूमिकेमध्ये जीव घालण्याचा प्रयत्न करतो. नव्याने आलेल्या वेबसिरीजच्या माध्यमाने काही कारणाने मोठ्या पडद्यामागे राहिलेल्या या कलाकारांना एक नवी संधी मिळवून दिली आहे. येत्या काही वर्षांमध्ये या अशा कलाकारांमुळे वेबसिरीजचं माध्यम अधिकच सक्षम होईल यात काही वाद नाही फक्त गरज आहे तितक्याच दमदार कथानकाची आणि दिग्दर्शकांची…