‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
इंडस्ट्रीतला दबंग सलमान
मीच असे नव्हे तर ‘बीवी हो तो ऐसी’ (रिलीज २६ ऑगस्ट १९८८) च्या मुहूर्ताच्या वेळी मिडियातील इतरानी आणि अगदी अनेक फिल्मवाल्यानीही सलमान खानकडे फारसे लक्ष दिले नाही. अहो, साक्षात ‘न्यूज ब्रेकर’ अथवा चित्रपटसृष्टीतील जिच्या अगदी छोट्यात छोट्या (कधी कधी तर फिलर) गोष्टींना न्यूज व्हॅल्यू आहे अशी रेखाच साक्षात या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात भाग घेण्यासाठी असल्याने ‘हा नवीन चेहरा सलमान खान कोण बरे’ असे वाटणे साहजिकच आहे हो. पाली हिलवरील भल्ला हाऊस या ‘शूटींगच्या बंगल्यात’ हा मुहूर्त होता. त्या काळात नवीन चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे जणू तद्दन फिल्मी सण अनुभवायला मिळे आणि त्या रिपोर्टींगला वाचक मूल्य असे…
बिवी हो तो…. च्या या मुहूर्ताला फारुख शेख, बिंदू, कादर खान अशा बड्या स्टारमध्ये नवीन चेहरा सलमान खान होता इतकेच. या चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया यांनी आम्हा काही सिनेपत्रकारांशी ओळख करून देत म्हटलं की, हा सलमान खान… पटकथा संवाद लेखक सलिम खानचा मुलगा….
अतिशय पोरसवदा सलमानकडे पाहून फारसे इम्प्रेस होण्यासारखे काही नव्हते. पण सलिम जावेद या जोडीतील सलिम खानचा मुलगा हे मात्र विशेष होते. सलिम खान एकेकाळी अभिनेते होते. काही चित्रपटात ते हीरो होते तर काही चित्रपटात छोट्या भूमिकेत होते. विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंझिल’ या चित्रपटातील आ जा आ जा मै हू प्यार तेरा या गाण्यात शम्मी कपूर आणि आशा पारेख तुफान मनसोक्त डान्स करताना हेच सलिम खान ड्रम वाजवताना दिसतात….
‘बिवी हो तो ऐसी ‘ पूर्ण झाला, सलमान खानला पोस्टरवर अजिबात स्थान न देता पडद्यावर आला, रेणू आर्या यात त्याची नायिका आहे. तात्पर्य, फारसं एक्सायटींग असे काही घडले नाही. हां, तरीही सलमान खान फोकसमध्ये होता ते संगिता बिजलानीचा बॉय फ्रेन्ड म्हणून! ती टाॅपची मॉडेल आणि आता अभिनेत्री. एकदा वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत ‘गुनाहो का देवता’ या चित्रपटाच्या सेटवर शूटींग रिपोर्टींगसाठी आम्हा काही सिनेपत्रकारांना बोलावले असता मिथुन चक्रवर्ती आणि संगिता बिजलानी यांच्यावर काही दृश्ये चित्रीत होत होती. अशातच लंच ब्रेकमध्ये चक्क सायकलवरून हाफ पॅन्टमध्ये सलमान तिला भेटायला आला आणि आम्ही लगेच बोरु सरसावत नोंद केली. स्टुडिओपासून जवळच असलेल्या आपल्या घरुन सलमान खान संगिता बिजलानीला भेटायला आला….
सुरुवातीच्या काळातील सलमान खान हा ‘लाईव्ह’ असा होता. राजश्री प्राॅडक्शन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘मै प्यार किया’ जबरदस्त हिट झाला आणि…. भाग्यश्री पटवर्धन स्टार झाली…. थोडसं आश्चर्य वाटले का? अहो, पिक्चर हिट झाला आणि निर्माते भाग्यश्रीला साईन करण्यात रस घेऊ लागले. पण तिने आपला प्रियकर हिमालय याच्याशी लग्न केले. पण सलमानकडे का कोण जाणे पण निर्माते वळत नव्हते. सुपर हिट हीरोच्या बाबतीत हे असे? सलमानने एक शक्कल केली. त्याने त्यावेळचे प्रतिष्ठित आणि विश्वसनीय अशा ‘स्क्रीन साप्ताहिका’त एक बातमी प्रसिद्ध करुन आणली,
‘शोले ‘चे निर्माते जी. पी. सिप्पी यांनी सलमान खानला ‘साईन’ केले…
हे नाणे सकारात्मक ठरले आणि सलमानला एकेक करत अनेक निर्मात्यांनी साईन केले.
सलमान ‘स्टार’ झाला आणि सोमी अलीशी नाव जोडले गेले. गाॅसिप्स मॅगझिनना अशा खमंग स्टोरीत, स्पेशल रिपोर्टमध्ये जरा जास्तच रस असतो आणि ते तिखट मीठ मसाला हिंग घालून अशी प्रकरणे रंगवतात. त्यामुळे सलमान खान को गुस्सा आ गया आणि सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी/फोटोसाठी भटकंती/निरीक्षण/भेटीगाठी घेऊन सिनेपत्रकारीत करणारे आम्ही बरेच जण सलमानपासून बरेच अंतर ठेवू लागलो. सावनकुमार दिग्दर्शित ‘सनम बेवफा’ च्या सेठ स्टुडिओतील मुहूर्ताला तर काही फोटोग्राफरनी सलमानशी चक्क वाद घातला, तर ‘स्क्रीन साप्ताहिकाने’ आता सलमानचा फोटोच प्रसिद्ध करायचा नाही असे धोरणच आखले….
हे सगळे ‘पेल्यातील वादळ’ ठरले. सलमान आणि मिडियात मग कधी दोस्ती, कधी दुरावा निर्माण झाला. खरं तर मोठ्या स्टारपासून व्यवस्थित अंतरावर राहणे हेच सिनेपत्रकाराना व्यावहारिकदृष्ट्या योग्य असते. टीका करायचे स्वातंत्र्य राहते. अमका तमका स्टार माझा मित्र अथवा मैत्रीण आहे असा गोड गैरसमज करून घेता येत नाही. अर्थात हे व्यक्तीसापेक्ष आहे…
‘रेडी’ पासून सलमान साॅफ्ट झाला. कदाचित काही वादग्रस्त प्रकरणानी तो अंतर्मुख होऊन विचार करायला लागला असावा. एव्हाना मिडिया खूपच वाढला होता. ‘आपल्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखती देण्याचे युग आले होते’ (पूर्वी बरेच स्टार ‘पिक्चर देखी है क्या ‘असा ‘उलटा प्रश्न’ करुन मग स्वतंत्रपणे मुलाखतीसाठी आवर्जून वेळ काढत हे मी स्वानुभवाने सांगतोय. तेव्हा मुलाखती घेणे थ्रील असे.)
दबंग, ट्यूबलाईट… पिक्चर रिलीजसाठी तयार झाला रे झाला की सलमान ‘जास्तीत जास्त मुलाखती देण्यासाठी’ वेळ काढू लागला. भले मग किमान दोन तास उशिरा येत असेल. पण सल्लूभाईसाठी थांबायला काय हरकत आहे? आज तो बहुत बडा स्टार आहे. ‘रेस३’ पासून तो चित्रपट वितरण क्षेत्रातही उतरला. आपल्या काही चित्रपटाच्या कथाही (पत्थर के फूल वगैरे) त्याच्याच आहेत. त्या कशा आहेत याचे ऑपरेशन आता नकोच. तो भारी क्राऊड पुलर स्टार असून ते त्याने टिच्चून टिकवलयं हे विशेष कौतुकाचे आहे.
एक महत्त्वाचे म्हणजे, सलमानची आई सलिमा या मूळच्या महाराष्ट्रीय आहेत बरं का? आणि खुद्द सलमान छान मराठी बोलतो. कधी एकादा प्रश्न मराठीत केला की तो छान हसत मराठीत उत्तर देतो. ‘लय भारी’ गोष्ट आहे ही. उगाच नाही त्याने रितेश देशमुखसोबत निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ मध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारली….