‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आठवणी कोकणातील बाप्पाच्या
रंगभूमी, मालिका आणि चित्रपट तसेच रियालिटी शो या सर्वांमध्ये अगदीसहजगत्या वावरणारा अभिनेता अंशुमन विचारे. सध्या सिंगिंग स्टार या रियालिटी शो मध्ये अंशुमन हा गायक म्हणून आपल्या समोर येतोय. अंशुमन कोकणातल्या गणपतीच्या आठवणी सांगताना म्हणाला, “आम्हा विचारे कुटुंबीयांचा गणपती संगमेश्वर जवळील तुरळ या गावात असतो. आमचे गाव डोंगरावर आहे. आम्ही सर्व विचारे कुटुंबीय हे मुंबईत आहोत, मात्र दरवर्षी गणपतीला सर्व जण मुंबईहून गावाला जातो. आमचे तेथील घर मोठे आहे.
आम्ही साठ – सत्तर जण एकत्र जमतो. सर्व सजावटीचे साहित्य वगैरे सर्व गोष्टी मुंबईहून घेऊन जातो. आमच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती सुद्धाअनेक तास चालते. मग ढोलकीचा ताल धरला जातो. बाप्पाला साग्रसंगीत नैवेद्य सुद्धा असतो. आमचे घर डोंगरावर असल्याने बाजूला खूप निसर्गरम्य वातावरण असते . मात्र ही वाट चढणीची असल्याने कधीकधी गुरुजी मिळतील असे
नाही. मग आम्ही घरीच टेपवर ऐकून पूजा करतो. गौरी पूजन देखील असते. माझ्या मामाचा गणपती हा चिपळूण मध्ये असतो. तिथे देखील आम्ही दरवर्षी जात असतो. यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे गणपती आणि गौरीच्या दर्शनाकरिता गावी जाता आले नाही, पण तेथे राहणाऱ्या आमच्या परिचयाच्या व्यक्तींनी आमच्या घरी गणपतीची स्थापना केली. मामाच्या घरी चिपळुणलाही गणपती आणला, पण आम्हाला तिथे जाऊन दर्शन घेता आले नाही, ही खंत मनात आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. गणपती उत्सवात नाटकाचे दौरे असायचे. मुख्य म्हणजे आमच्या विचारे कुटुंबात अभिनयाची कला आहेच. हनुमान जयंतीच्या उत्सवात गावाला विचारे कुटुंबीयांनी अनेक नाटकात कामे केली आहेत. गणपतीसमोर कला सादर करणे हा एक वेगळा आनंद असतो आणि मुंबईप्रमाणे सुद्धा अनेक शहरात आमच्या नाटकांचे प्रयोग गणपती उत्सवातील रंगमंचावर झाले आहेत. गेल्या वर्षी सह्याद्री वाहिनीसाठी मी आणि माझी पत्नी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी गेलो होतो, हे सर्व आजही आठवते.”