‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सेलिब्रेटिजचे वाचन….
जवळपास दहा वर्षे झाली या वेगळ्या अनुभवाला. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून आम्हा काही सिनेपत्रकारांना शाहरूख खानच्या मुलाखतीसाठी बांद्रा, बॅन्ड स्टॅंड येथील त्याच्याच ‘मन्नत’ बंगल्यावर बोलावले होते. एसआरके वेळेच्या बाबतीत पक्का नसल्याने आम्ही सहा सात सिनेपत्रकार थोडे सावकाश गेलो, पण आम्हाला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. खाली सांगण्यात आले, या लिफ्टने वरच्या मजल्यावर जा. लिफ्टमधून बाहेर पडताच उजव्या बाजूच्या रूममध्ये सगळीकडे कपाटभर पुस्तकेच पुस्तके दिसली आणि असे काही वेगळेच चित्र पाह्यला मिळेल याची कल्पना नसल्याने आम्ही गप्पच झालो. आणि मग साक्षात शाहरूख खान आमच्या समोर आल्यावर ‘एवढी पुस्तके?’ अशा आमच्या प्रश्नार्थक नजरेने गप्पांना सुरुवात झाली… त्याने आपण जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसे वाचन करतोय. त्याने भाषा सुधारते, एखादी व्यक्तिरेखा साकारताना एखादा संदर्भ उपयुक्त ठरतो असे म्हणतच चित्रपटाकडे वळला. खरं तर ही भेट त्यासाठीच तर होती.
आपल्या चित्रपटाच्या जगात असे वाचक खूप आहेत. उर्मिला मातोंडकरने तर मराठी आणि इंग्रजी साहित्याचे प्रचंड वाचन केले आहे. आता लॉकडाऊनच्या दिवसात अनेक सेलिब्रेटिज ‘मी पुस्तक वाचनात दंग’ असे म्हणताहेत, तसे पुस्तकासह सोशल मिडियात फोटो पोस्ट करताहेत, फेसबुक लाईव्हवर तशी जणू कबूली देताहेत. ते जाऊ दे. पण काही सेलिब्रेटिज अतिशय उत्तम वाचक आहेत.
उर्मिला मातोंडकर तर हिंदी चित्रपटाच्या सेटवर आपले दृश्य ओके होताच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन पुस्तकात डोकं खुपसणारच. भले त्यावरुन कितीही गॉसिप्स होऊ देत. आपल्याला आपल्या आई बाबांनी लहानपणीच वाचनाची गोडी लावली असे ती कायमच सांगत असते. अशा अफाट वाचनानेच तिच्या व्यक्तीमत्वात सुसंस्कृतपणा दिसतो.
मृणाल कुलकर्णी तर गो. नी. दांडेकर यांची नात आणि त्यात वाचन आणि शक्य तेव्हा लेखन यांची आवड. तब्बल तीन दशके ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे, मालिकांच्या सेटवर ती इतरांशी गपशप करण्यात वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकात रमणार, त्यामुळे तिला केव्हाच ‘मिस लायब्ररी’ असे नाव पडले आहे.
सदाशिव अमरापूरकर पूर्वी जोगेश्वरीला वैशाली नगरला राह्यला होते तेव्हा एकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. त्यांनी घरातच वाचनासाठी स्वतंत्र रुम केल्याचे दिसले. अनेक प्रकारची पुस्तके ते वाचत आणि आपले पुस्तक वाचून झाले की ते आपल्या घरातच पडून राहिल म्हणून ते इतरांना भेट देत.
मिलिंद गुणाजी शिवाजी मंदिरच्या मॅजेस्टीक बुक स्टॉलला भेट देऊन एकाच वेळेस अनेक पुस्तके विकत घेतो. तो स्वतः भटकंती आणि वाचन यात विलक्षण रस घेत असल्याने त्याला हे आवडते.
रमेश देवही अनेकदा येथे भेट देतात, पुस्तकं चाळतात आणि अनेक पुस्तके विकत घेतात.
सचिन खेडेकरला वाचनाचे विलक्षण वेड आहे. उषा दातार यांची एक कथा त्याला खूपच भावली. त्या कथेवर चित्रपट निर्माण होईल असे त्याला मनोमन वाटलं, तसे ते त्याने महेश मांजरेकरला सांगितले आणि त्याच कथेवर ‘काकस्पर्ष’ हा चित्रपट निर्माण झाला. कादंबरी अथवा कथा यावरुन मराठी तर झालेच पण अगदी हिंदी चित्रपट निर्माण झाला अशी अनेक उदाहरणे देता येतील. तो विषयच वेगळा.
अलका आठल्येच्या हस्ते तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित पारु मदन नाईक आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या पुस्तकाचे पुणे शहरात प्रकाशन असताना तिने मुंबई ते पुणे असा प्रवास करताना ते पुस्तक वाचले आणि ते होत असतानाच तिने ठरवले यावर आपण चित्रपट निर्माण करायचाच. आणि तिने रमेश मोरे दिग्दर्शित ‘आम्ही का तिसरे’ ( २०११) हा चित्रपट निर्माण केला.
अनेक सेलिब्रेटिजची अशी अनेक ‘वाचक वैशिष्ट्ये’ आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत विक्रम गोखले, सोनाली कुलकर्णी (सिनियर), अश्विनी भावे, सुनिल बर्वे, संजय मोने, चिन्मयी सुर्वे, सुमित राघवन, प्रसाद ओक, पुष्कर क्षोत्री, मनवा नाईक असे अनेक कलाकार उत्तम वाचक म्हणून ओळखले जातात. गजेन्द्र अहिरेकडे तर अबब म्हणावे इतकी आणि अनेक प्रकारची पुस्तके आहेत. प्राजक्ता माळीच्या पुण्याच्या घरीही भरपूर पुस्तकं आहेत, ती नवीन पुस्तके विकत घेते आणि वेळ काढून वाचते. कलाकारांना पुस्तके वाचायला वेळ कुठे असतो असा प्रश्न अनेकांना पडतो पण येथे तब्बूपासून कांचन अधिकारीपर्यंत अनेक चांगले वाचक आहेत. सोनाली बेन्द्रे तर अधिकाधिक वेळ पुस्तकाच्या सहवासात असते. इंग्रजी साहित्याचे तिचे वाचन दांडगे आहे आणि ती इंग्रजी पुस्तकाच्या लेखकांची मुलाखतही घेत असते.
आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आणखीन काही सेलिब्रेटिजनी आपणही चांगले वाचक बनू, अगदी हाती पुस्तक घेतले नाही तरी ऑनलाईन वाचन करु, किंडलवर वाचन करु असा निश्चय नक्कीच केला असणार. सोशल मिडियाच्या काळात आणि शूटिंगपासून इव्हेन्टसपर्यंत बिझी असल्याच्या युगात पुस्तके कोण वाचते असा काहीना प्रश्न पडत असला तरी त्याचे उत्तर चित्रपटसृष्टीतील हे वाचक आहेत.
— दिलीप ठाकूर