आलियाचा, गंगूबाई काठियावाडी…
संजय लिला भन्साली यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडीचे चित्रिकरण सुरु झाले आहे. आलिया भट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून जानेवारी महिन्यात चित्रिकरण पूर्ण करण्याचे सध्यातरी टार्गेट आहे. सध्याच्या कोरोनाकाळात घेण्यात येणारी काळजी आणि चित्रपटाचे टार्गेट पहाता दिवस-रात्र मुंबई फिल्मसिटीमध्ये चित्रिकरण चालू आहे. यासाठी संजय लिला भन्साळी यांनी फिल्मसिटीमध्ये भव्य सेट उभारला असून त्यासाठी मुंबईतल्या मान्यवर वास्तुरचनाकारांचीही मदत घेतली आहे.
काठियावाडीमध्ये रहाणा-या गंगू नावाच्या मुलीवर आधारीत असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे संजय लिली भन्साळी यांच्या या चित्रपटाचे संपूर्ण काम थांबले होते. या चित्रपटात प्रमुख भूमिकेल आलिया भट आहे. मात्र संजय लिला भन्साळींनी युनिटची संपूर्ण काळजी घेत आता या चित्रपटाचे शुटींग सुरु केले आहे.
चित्रिकरण करतांना काळजी म्हणून क्रु मेंबर सेटवरच रहात आहेत. तसेच वेळेवर शुट पूर्ण होण्यासाठी रात्रीही सर्व टीम हजर असते. स्वतः आलिया भटही रात्री उशीरापर्यंत शुट करीत आहे. आलियाच मु्ख्य भूमिकेत असल्याने तिचे सीन सर्वाधिक आहेत. त्यामुळे आधी आलीया असलेले सीन शुट घेऊन मग इतर कलाकारांच्या शुटचे नियोजन करण्यात आले आहे. चित्रपटासाठी दोन काळातले सेट उभारण्यात आले आहेत. यात मुंबईतील रेड लाईट एरिया उभारण्यात आला आहे. मह्त्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे अनेकांनी खर्चात कपात केली असली तरी भन्साळी मात्र याला अपवाद आहेत. फिल्मसिटीमध्ये कामाठीपुराचा संपूर्ण सेट उभा करतांना भन्साळींनी आपलं बजेटही बाजुला ठेवल्याचे बोलले जात आहे. याशिवाय शुटींग नंतर डबिंगमध्ये वेळ जाऊ नये म्हणून सेटवरच सिंक साऊंड रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोडक्शन कामांमध्ये लागणारा वेळ वाचणार आहे.
अर्थात गंगूबाई काठियावाडीच्या सेटवरही कोरोनाचा शिरकाव झाला होता. मात्र त्या क्रू मेंबरना काही काळासाठी सुट्टी देऊन शुटींग चालू ठेवण्यात आले आहे. तसेच सर्वाच्या टेस्टही करण्यात आल्या आहेत. या चित्रपटात आलिया सोबत अजय देवगण आणि इमरान हाशमी यांच्याही भूमिका आहेत.
गंगूबाई काठियावाडी ही गुजरातच्या काठियावाडमधील एका तरुणीची कथा आहे. गंगा हरजीवनदास काठियावाडी नावाची ही 16 वर्षाची तरुणी…घरची श्रीमंती असलेली गंगा मुंबईमध्ये येऊन चित्रपटात काम करण्याचे स्वप्न बघत असते. तिच्या कुटुंबाला तिला शिकवण्याची इच्छा असते. पण गंगाला चित्रपटाचं आकर्षण असतं. अशातच तिच्या वडीलांकडे मुंबईमध्ये काही काळ राहीलेला रामणीक, अकाऊंटंट म्हणून दाखल होतो. गंगा या तरुणाच्या प्रेमात पडते. तो तिला मुंबईची भूरळ घालतो. ती त्याच्याबरोबर लग्न करुन मुंबई गाठते. हा तिचा नवरा तिला 500 रुपयांना विकतो…इथून गंगाची गंगूबाई होते. कामाठिपूरा सारख्या रेड लाईट एरीयात गंगूबाईवर अनेक अत्याचार होतात. यातून सावरत ती हे जीवन स्विकारते. पण आपल्यावर होणा-या अन्यायाविरोधात आवाजही उठवते. थेट करीमलाला सारख्या डॉनकडे ती दाद मागते. त्याला राखी बांधते. करीम लालाही गंगूबाईला बहीण म्हणून मान देतात. त्यामुळे गंगूबाईची ताकद वाढते. पुढे या सर्व एरीयावर गंगूबाईची पकड बसते. गंगूबाई या एरीयातील अनाथ मुलांसाठी काम करते. या वस्तीतील वेश्यांना चांगलं जीवन मिळावं म्हणून आंदोलन करते. अगदी थेट पंतप्रधानांपर्यंतही पोहचते. लेखक एस हुसैन जैदी यांचे पुस्तक माफिया क्वीन्स ऑफ मुंबईवर आधारीत हा चित्रपट आहे.
संजय लिला भन्साळी यांचा हा चित्रपट येण्यासाठी पुढच्या वर्षीही वाट पहावी लागणार आहे. बहुधा मार्च मध्ये महिलादिनाच्या आसपास रिलीज होण्याची शक्यता आहे. सडक-2 मध्ये आलिया आपली काहीच छाप पाडू शकली नाही. त्यामुळे आता गंगूबाई काठियाडीमध्ये आलिया काय जादू करते हे बघण्यासाठी काही महिने वाट पहावी लागणार आहे.