‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
नायिकाच आहेत गायिका!
अभिनयाबरोबर अभिनेत्रीचा गाता गळा असेल तर मग उत्तमच. त्या अनुषंगाने मग कथानकात तिला कधी गायिकेचा मान मिळतो तर कधी प्रसंगानुरूप तिला एखादं गाणं गायची संधी मिळते. यामुळे मालिकेतील एखादा प्रसंग प्रभावीपणे मांडता येतोच पण या नायिकांना गायिका म्हणूनही प्रेक्षकांसमोर स्वतः ला प्रेझेंट करता येतं.
‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती अनेकदा आपल्याला मालिकेत गाताना दिसते. मालिकेच्या कथानकात तिला गायिका म्हणून देखील चित्रीत करण्यात आलं आहे. ती स्वतः गाण्याच्या शिकवण्या घेते असं दाखवण्यात आलं आहे. अरूंधती आणि अनिरुद्धच्या पंचवीसाव्या वाढदिवशी अरुंधतीच्या तोंडी तिचं नवऱ्याप्रती असलेलं प्रेम दर्शविण्यासाठी मन शेवंतीचे फूल झाले हे गाणं गातांना दाखवण्यात आलं. तर नवऱ्याचं बाहेरच्या बाईशी असलेलं अफेअर ऐकल्यानंतर ती कोलमडते पण पुन्हा धीराने उभी राहते असं दाखवतांना स्वतः च्या मुलांनी हौसेने साजऱ्या केलेल्या वाढदिवस सोहळ्यात एकाच ह्या जन्मी जणू हे गाणं विश्वासाने गाताना तिला दाखवलंय. एका प्रसंगात आश्रमातील बायकांना उभारी देण्यासाठी आकाशी झेप घे रे पाखरा हे गाणं गातांना अरुंधती दिसली. वरील सर्व गाणी आई कुठे काय करते मालिकेची नायिका आई म्हणजेच ‘मधुराणी प्रभुलकर’ यांनी अतिशय भावपूर्ण गायली आहेत.
‘माझा होशील ना’ या मालिकेत देखील सई आणि आदित्यची लव्ह स्टोरी रंगवताना प्रसंगाला अनुरूप गाणी सई गाताना दिसतेय. आदित्य आणि सईचं मालिकेत भांडण होतं आणि मग काय सई आदित्यला मनवण्यासाठी अच्छा जी मैं हारी… हे गाणं गातांना पाहायला मिळालं. त्यानंतर सई आदित्यच अबोल प्रेम चितारतांना लेखकाने एका पावसाळी रात्री सई आदित्य एकत्र असताना सईला मेरी जा मुझे जान कहो मेरी जा… हे गाण गाताना दाखवलं. प्रत्येक मालिकेचा उत्कंठावर्धक प्रसंग म्हणजे नायक नायिकेचा लग्न सोहळा हा असतो. बाई नसलेल्या घरात सईचं लग्न होतं पण आदित्यचे मामा म्हणजे सईचे सासरेबुवा घरातील एखादी कर्ती बाई ज्याप्रमाणे पुरवेल अशी तिची सगळी हौस पुरवतात. तिची आणि आदित्यची हळद मोठ्या हौसेने करतात तेव्हा मामा गाणं गातात त्याला जोडून सई हळद लागली हळद लागली सून होण्याची आस जागली हे खास मालिकेसाठी लिहिलेल गाणं गाते अस दाखवलं. माझा होशील ना मालिकेमधील गाणी गौतमी देशपांडे या मालिकेच्या नायिकेने आपल्या सुरेल आवाजात सुंदर गायिली. त्यामुळे मालिकेतील चाफा रातराणी म्हणजेच सई आदित्यच्या प्रेमाचे प्रसंग पाहताना आणखी छान वाटलं.
अशा प्रकारे आता प्ले बॅक किंवा रेकॉर्डेड गाण्याचा वापर न करता नायिका स्वतः गायिका असल्याने त्या मालिकेत प्रत्यक्ष गातांना दिसत आहेत. आणि या नायिका उत्कृष्ट गायिका असल्याने कथानकाच्या प्रसंगांना चार चांद लागत आहेत. गाणी गातांना या नायिका अचूक भाव पकडून तो अभिनयातून रंगवत असल्याने मालिका पाहण्यासाठी रंजक होत आहेत.
– सिध्दी सुभाष कदम