मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
दीक्षा केतकर : न्यूयॉर्क ते मुंबई प्रवास
सध्या सोनी मराठीवर ‘तू सौभाग्यवती हो’ ही नवी मराठी मालिका सुरु झाली आहे. त्यात ‘ऐश्वर्या’ ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे दीक्षा केतकर. तिने फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर न्यूयॉर्क येथील ‘दि ली स्ट्रेसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट’ मधून एम एफ ए अर्थात मास्टर ऑफ फाईन आर्ट ही पदवी मिळवली. दीक्षाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजला देखील अनेक एकांकिका स्पर्धातून ती सहभागी झाली होती ‘मृगदर्पण’ या प्रायोगिक नाटकात देखील तिची भूमिका असून या नाटकासाठी २०१५ मध्ये झी गौरव सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
न्यूयॉर्क मधून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ती आय टी ए या संस्थेत अभिनयाचे प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना देत असे. पुण्यातील ‘थियट्रॉन’ या नाट्यसंस्थेतर्फे सुद्धा तिने नाटकातून भूमिका केल्या आहेत. त्यात ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ मध्ये तिची भूमिका होती. ‘तू सौभाग्यवती हो’साठी दीक्षाने ऑडिशन दिली, मग लूक टेस्ट झाली आणि मग तिला या मालिकेत ‘ऐश्वर्या’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दीक्षा म्हणते, “ऐश्वर्या ही एका छोट्याशा गावातील मुलगी आहे. ती स्वभावाने अल्लड आहे. तिचे तिच्या सावत्र आईशी सुद्धा उत्तम नातं आहे. हे नातं अगदी मैत्रिणीसारखे आहे. तिचे प्राण्यांवर सुद्धा खूप प्रेम आहे. अशी अल्लड, प्रेमळ, निरागस मुलगी साकारताना खूप चांगले वाटत आहे.
मनवा नाईक या ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेच्या निर्मात्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर या कलाकारांबरोबर काम करताना खूप चांगले वाटत आहे, सेटवर वातावरण देखील खूप खेळीमेळीचे असते, असेही तिने सांगितलं. दीक्षा ही सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर याची बहीण आहे. शशांक कडून काही टिप्स घेतेस का? असे विचारल्यावर ती म्हणाली, “आम्ही कधीच एकमेकांना कोणत्या बाबतीत टिप्स देत नाही. पण मला या मालिकेत काम मिळाले, याचा शशांकला अर्थातच आनंद झाला आहे आणि या क्षेत्रात मी करिअर करणार, या गोष्टीला त्याचा भाऊ या नात्याने कायमच पाठिंबा असेल.”