‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सेटवरची नि थिएटरवरची शांतता…. नको नकोशी गोष्ट
रसिकांना सिनेमा आवडला नाही म्हणून थिएटर ओस पडलयं, जेमतेम दोन तीन रांगा भरल्यात तरीही ‘पडद्यावर शो’ सुरु आहे, असे अनेक चित्रपटांबाबत वर्षानुवर्षे घडतेय. स्टुडिओत प्रचंड मोठा सेट लागलाय आणि दिग्दर्शक कायमच ‘लेट लतिफ’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या स्टारची बराच काळ वाट पाहतोय, तो येईपर्यंत इतर स्टारचे क्लोजअपही घेऊन झालेत. तो एकदाचा आला, जेमतेम एका दृश्याचे शूटिंग झाले आणि तो निघून गेला. पुन्हा सेटवर शांतता… असेही फार पूर्वीपासून घडत आले आहे आणि अशा गोष्टी / किस्से / गप्पा / कथा / दंतकथा कायमच चघळल्या जातात.
राजेश खन्ना तर आपणच निर्मिलेल्या ‘जय शिव शंकर’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला गोरेगावच्या चित्रनगरीत काहीसा उशिराच आला हे मी अनुभवलयं. तर गोविंदाची भूमिका असलेल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगच्या रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना बोलावले की आम्ही अगदी आठवणीने उशिराच जात असू, कारण तो वेळेवर येणार नाही असा नेहमीचा अनुभव असे. हेही ठीक आहे. तोही एक मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे. अशा अनेक गोष्टींनी हे मनोरंजन विश्व व्यापलयं.
पण कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सिनेमागृहे (व नाट्यगृहेही) बंद आहेत (मध्यंतरी काही काळ सुरु झाली पण भरभरून प्रतिसादाने शो रंगला नाही) आणि सर्व प्रकारची शूटिंग बंद आहेत यातून निर्माण झालेली शांतता भयावह आहे. अर्थात, कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता अन्य अनेक गोष्टींप्रमाणे हेदेखील बंद ठेवण्याची गरज आहे. पण त्यामुळे किती कोटींचे नुकसान झाले यापलीकडे जाऊन यावर “फोकस” टाकायला हवा. कार्पोरेट युगात जवळपास प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात असल्याने या क्रियेटीव्ह क्षेत्रातील अनेक गोष्टींचा दुर्दैवाने विचारच होत नाही. अमूकतमूक चित्रपट किती कोटीत बनला, त्याने किती कोटी धो धो कमावले. काही काही चित्रपटांची तर ते रिलीज होण्यापूर्वीच विक्रमी कमाई झाल्याच्या ब्रेकिंग न्यूज (प्रेक्षकांनी सिनेमा न पाहताच त्याची कोटींची कमाई कशी होते हे कोडे हे कधी तरी सोडवा हो) अमूकतमूक स्टार्सने इतक्या इतक्या किमतीची महागडी गाडी, घर, पेन्ट हाऊस, रिसोर्टस, फार्म हाऊस, सेकंड होम, मोबाईल, स्मार्ट टीव्ही घेतला वगैरे वगैरे श्रीमंतीच्याच गोष्टी. वाचकांना / प्रेक्षकांना त्याच आवडतात म्हणे. त्यानेच टीआरपी वाढतो, लाईक्स वाढताहेत हेदेखील महत्वाचे आहे.
अशाच या ‘मनोरंजन क्षेत्र म्हणजे छोट्या मोठ्या पडद्यावर आणि प्रत्यक्षात उदंड पैसा’ असा ‘रोजच्या सवयीनेच’ वर्षभरात किती चित्रपटांचे किती शे कोटी अडकले आणि मालिकांचे किती कोटी नुकसान झाले यावरच फोकस राहिला. चित्रपट / मालिका / वेबसिरिज / रिअॅलिटी शो / जाहिराती / म्युझिक अल्बम /गेम शो यात कुठेही वन मॅन शो नाही. तर ही सगळी समूह निर्मिती आहे. म्हणजे अनेक जण मिळून याची निर्मिती करत असतात. फरक इतकाच की कोणी स्टार असतो, कोणी एखादा तंत्रज्ञ असतो तर कोणी कामगार असतो (खरं तर अनेक कामगार असतात) यात विविध स्तरांवर काम सुरु असते.
आर्थिक तर असतेच असते. पण ‘भरपूर पैसा आहे, म्हणून चांगला (अथवा वाईट) चित्रपट निर्माण होतो असे अजिबात नसते. (अनेक नवीन निर्मात्यांना नेमके तेच माहित नसते म्हणे) तर भावनिक / मानसिक / बौद्धिक / श्रमजीवी अशा अनेक प्रकारच्या केमिस्ट्रीतून मनोरंजन क्षेत्र वाटचाल करीत असते. त्याला लाॅकडाऊनच्या दिवसात सक्तीची मिळालेली विश्रांती सुरुवातीला बरी वाटली. पण नंतर ती नकोशी वाटू लागली. क्रियेटीव्ह क्षेत्रात अनावश्यक थांबणे नसते. चित्रपट असो अथवा वेबसिरिज आपल्याला जे रसिकांसमोर पोहचवायचे आहे, त्याला मार्ग मिळावाच लागतो. सध्या तेच नेमके थांबलेय. कदाचित असे थांबल्याने काही चांगल्या कल्पना कुजू शकतात, कालबाह्य होऊ शकतात. अथवा एखादी व्यक्तिरेखा साकारताना पुन्हा त्याचा ग्राफ सापडणे कदाचित अवघड ठरु शकते.
चित्रपटगृहे बंद आहेत हे आपल्या सिनेमावेड्या देशात खूपच निराशाजनक आहे. चित्रपटगृहाला टप्प्याटप्प्याने पर्याय येत गेले तरी चित्रपटगृहात हाऊसफुल्ल गर्दीत पिक्चर एन्जाॅय करण्याची आपली पब्लिक संस्कृती आहे. ती परंपराच भविष्यात आटणार काय ? सत्तरच्या दशकात दूरदर्शनचे आगमन झाले आणि शनिवारी जुने मराठी तर रविवारी जुने हिंदी चित्रपट पाह्यची घरबसल्या सोय झाली. मग त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला, मग चॅनलचे जग आले, असे करता करता हाच चित्रपट पेनड्राईव्ह, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवरही आला. पडदाभरचा चित्रपट मुठीत मावायला लागला.
आता तर ओटीटी प्लॅटफॉर्मनेही जम बसवला. तांत्रिक प्रगती होत राहते आणि नवीन गोष्टी जन्माला येतात. पन्नास वर्षांपूर्वी नवीन चित्रपटाचे आगमन म्हणजे जणू एक सार्वजनिक सण साजरा होई. हे मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहावर अनुभवलयं. एखाद्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मुकद्दर का सिकंदर’ अथवा ‘नमक हलाल’, ‘लावारिस’, ‘शराबी’चा फर्स्ट डे फर्स्ट शो चा पब्लिक रिपोर्ट ‘क्या पिक्चर है भाय… एकदम जबरा’ असा सकारात्मक आला की कधीही थिएटरवर जावे तर पिक्चर हाऊसफुल्ल. आणि याच प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जादुगर’चा फर्स्ट डे फर्स्ट शो चा पब्लिक रिपोर्ट एकदमच नरम आला आणि सेकंड शो लाच करंट बुकिंगची खिडकी उघडली आणि सिनेमा फ्लाॅप झाला यावर शिक्कामोर्तब झाले.
पब्लिकला पिक्चर आवडला की नाही याचा खरा रिपोर्ट ही थिएटर देतात हीच आपली चित्रपट प्रेक्षक संस्कृती आहे. ती या बंदच्या काळात फक्त आणि फक्त आठवणीत राहिलीय. काही फिल्म दीवाने तर अमूक थिएटरमध्ये तमूक चित्रपट एन्जाॅय केला, अनेकदा पाह्यला या आठवणीत जगतात आणि त्यात त्यांना आनंद वाटतो. अगदी आपण पाहिलेल्या चित्रपटांची तिकीटेही अतिशय काळजीपूर्वक जपणारे सिनेमा रसिक आहेत. अशी बांधिलकी असे वेड ओटीटीवर चित्रपट पाहण्यात नाही. कधी कधी ‘आपण एकटे आणि आपल्या लॅपटॉपवर आपण ऑनलाईन चित्रपट पाहतोय’ असे घडतेय. चित्रपट पाहण्यासाठीची शांतता त्यातून मिळत असेल, आपण एकटेच चित्रपटाशी कनेक्ट झालो आहोत याचा आनंदही वाटत असेल. भविष्यात सिनेमा पाहणे हे वन मॅन शो असेल. पण थिएटरचा फिल त्यात नाही. फार पूर्वी तर घरुन सिनेमाला जाताना देहबोलीत एक प्रकारचा आनंद निर्माण होई, मग कधी एकदा आतमध्ये जाऊन बसतोय, कधी एकदा भारतीय समाचार चित्र संपून मेन पिक्चर सुरु होतेय असे व्हायचे आणि बाहेरचे सगळे जगच विसरायला होई. आज थिएटर बंद असताना जुन्या काळातील थिएटरनाही हे सगळे आठवत असेल.
सिनेमा अथवा नाटकाचे थिएटर म्हणजे निर्जीव वास्तू नसते. तेथील शो अथवा प्रयोग संपला तरी त्या वास्तूत त्या चित्रपट अथवा नाटकाचे अस्तित्व असतेच असते. आमच्या गिरगावातील मॅजेस्टिक चित्रपटगृहाची इमारत १९७२ साली पाडली, आणि त्या जागी टाॅवर उभा राहिला आहे. पण याच मॅजेस्टिक चित्रपटगृहात आपल्याकडचा पहिला हिंदी बोलपट अर्देशीर इराणी दिग्दर्शित ‘आलम आरा’ (१९३१) आणि अगदी तस्साच पहिला मराठी बोलपट चित्रपती व्ही शांताराम यांचा ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) हे प्रदर्शित झाले याची आठवण आजही काढली जाते.
भव्य थिएटर डेकोरेशनसाठीही मॅजेस्टिक ओळखले जाई. प्रत्येक चित्रपटगृहाला आपले स्वतःचे असे व्यक्तिमत्व असते, ओळख असते. म्हणूनच तर ते दीर्घकाळ शांत असते अथवा अंधारात राहते ते कमालीचे क्लेशकारक असतेच असते. म्हणूनच वाटते, पुन्हा एकदा तो सायलेन्स… कॅमेरा… अॅक्शन यांचा ‘भरलेल्या सेटवरचा’ निर्मितीचा प्रवास अखंडपणे सुरु होऊदेत आणि तेथे जे जे पिकतेय, नवीन निर्मिती होतेय ती लहान मोठ्या पडद्यावरुन रसिकांपर्यंत पोहचत राहूदेत. हे सगळे पैशात मोजता न येणारे आहे, आणि ते पैशात मोजून त्याची किंमत कमी देखिल करु नका.