दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मेहमूदच्या पहिल्या निकाहचा सिनेमात शोभून दिसेल असा भन्नाट किस्सा
हिंदी सिनेमातील ज्येष्ठ विनोदी कलावंत मेहमूद याने साठ आणि सत्तरचे दशक आपल्या विनोदी अभिनयाने प्रचंड गाजवले. या काळात त्याच्या अभिनयाची दहशत एवढी होती की, भलेभले मोठे अभिनेते देखील त्याच्यासोबत काम करायला कचरत असत. याच मेहमूदच्या पहिल्या निकाहची स्टोरी खूप भन्नाट आहे. (Love story of Mehmood)
मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज मध्ये काम करत होते. त्यामुळे मेहमूदचा सिनेमा जगताशी परिचय बालपणापासून झाला होता. लहानपणी मेहमूद खूपच व्रात्य, आळशी आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता. लहानपणापासूनच त्याने अनेक उचापती करायला सुरुवात केली होती. तरुणपणी अशोक कुमार, पी एल संतोषी यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून देखील काही वर्ष त्याने काम केले होते. तो टेबल टेनिस खूप चांगला खेळत असे. बॉम्बे टॉकीज मध्ये असताना तो अनेक कलाकारांसोबत टेबल टेनिस खेळत असे.
एकदा अभिनेत्री मीनाकुमारीने मेहमूदला टेबल टेनिस खेळताना पाहिले. तिला देखील हा खेळ शिकायचा होता. म्हणून तिने मेहमूदला आपल्या घरी टेबल टेनिस शिकवायला बोलावले. यासाठी तिने शंभर रुपये महिना फी देखील द्यायचे ठरले. त्या काळात शंभर रुपये ही खूप मोठी रक्कम होती. मेहमूद एका पायावर तयार झाला. आता मेहमूद रोज मीनाकुमारीला टेबल टेनिस शिकवण्यासाठी तिच्या घरी जाऊ लागला.
त्यावेळी मीनाकुमारीची धाकटी बहीण मधू ही देखील त्यांच्यासोबत टेबल टेनिस खेळू लागली. टेबल टेनिसचा खेळ सुरू झाला पण, त्याचवेळी मधू आणि मेहमूद यांच्यातील आँख मिचौलीचा खेळ देखील सुरू झाला. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. या लग्नाला मधुचे वडील अली बक्ष यांचा अर्थातच विरोध होता. कारण मेहमूद टवाळक्या करण्याशिवाय त्याकाळी काहीच करत नव्हता. एका आवारा पोराच्या हाती आपल्या पोरीचा हात कसा द्यायचा, असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी यांच्या लग्नाला विरोध केला आणि मेहमूदचा टेबल टेनिस क्लास बंद झाला. (Love story of Mehmood)
मधुला देखील घरातून बाहेर पडण्यासाठी बंधने घातली गेली, पण दोन तडपणाऱ्या प्रेमी जीवांना कोण थांबवू शकतो? प्रेमाची आग दोन्हीकडे सारखीच भडकली होती. एक दिवस मधू घरातून बाहेर पडली आणि थेट मेहमूदच्या घरी जाऊन पोहोचली. मेहमूदच्या आई आणि बहिणींना आश्चर्य वाटले. तिला घरात घेतल्यानंतर तिची विचारपूस केली. त्यावेळी मधू मेहमूदच्या आईच्या गळ्यात पडून रडायला लागली व म्हणाली, “माझे मेहमूदवर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.” त्यावर मेहमूदची आई लतीफुनिस्सा म्हणाली, “हे कसे शक्य आहे? तुमच्या आणि आमच्यामध्ये खूप अंतर आहे. तुम्ही श्रीमंत घरातल्या आणि इथे आमचे खायचे वांदे आहेत. तुझ्या घरी तुला जे सुख मिळते ते इथे अजिबात मिळणार नाही. त्यामुळे कृपा करून तू तुझ्या घरी निघून जा.”
मधूने हर प्रकारे मेहमूदच्या अम्मीला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण अम्मीने त्याला विरोध केला. मेहमूदला ती म्हणाली, “तिला घरी सोडून ये.” मेहमूदचा नाईलाज झाला. तो मधूला घेऊन घराच्या बाहेर पडला आणि तिला तिच्या घरी न नेता थेट मालाड स्टेशनवर गेला. तिथे एका बेंचवर त्याने तिला बसवले आणि सांगितले, “तू इथेच थांब. मी माझ्या घरच्यांना समजावून येतो.” (Love story of Mehmood)
तिथून तडक मेहमूद घरी गेला आणि अम्मीला म्हणाला, “तुम्ही मधूला घरातून काढले ठीक आहे. पण ती प्रेग्नेंट आहे. माझ्या मुलाची ती आई होणार आहे आणि तुम्ही जर तिला घरात नाही घेतले, तर ती आत्ता धावत्या रेल्वे खाली जाऊन आत्महत्या करणार आहे. तेव्हा तुम्ही काय करायचे ते ठरवा.” यावर अम्मी घाबरली. खरोखरच तिने असे काही केले, तर बाका प्रसंग निर्माण होवू शकतो. म्हणून ती मेहमूदला घेऊन मालाड रेल्वे स्टेशनवर गेली आणि मधूला सन्मानाने घरी घेऊन आली.
============
हे ही वाचा: आवर्जून पाहावेत असे, थरकाप उडवणारे दक्षिणेतील ‘सायकॉलिजिकल थ्रिलर’ चित्रपट
वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?
===============
मेहमूद आणि मधू खोटे बोलले होते. मधू काही प्रेग्नेंट नव्हती. मेहमूदचे खोटे बोलणे फार दिवस टिकू शकले नाही. कारण दोन दिवसांनी मेहमूदच्या अम्मीने एका दाईला घरी बोलावले आणि मधूची तपासणी करायला सांगितली. तिने सांगितले की, “मधू काही प्रेग्नेंट नाही.” (Love story of Mehmood)
पुन्हा घरात राडा झाला. पण मधू आणि मेहमूद काही माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला पाठिंबा देत दोघांचा निकाह लावून द्यायचे ठरवले आणि ३ सप्टेंबर १९५३ रोजी मधू आणि मेहमूद यांचा निकाह झाला. हा किस्सा मेहमूदने त्याच्या आत्मचरित्रात लिहिला आहे.