दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सुनील शेट्टीला ‘अण्णा’ हे नाव कुणी दिले?
कधी कधी अनपेक्षितपणे कलावंताचे नव्याने बारसं होतं असतं. आधीचं नाव मागे पडतं आणि नव्या नावाने जग ओळखू लागतं. असाच काहीसा प्रकार अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty Anna) याच्याबाबत झाला होता. सुनील शेट्टी ‘बलवान’ या चित्रपटापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आला. मजबूत देहयष्टी आणि टिपिकल डायलॉग डिलिव्हरी यामुळे सुनील शेट्टी लवकरच लोकप्रिय ठरला.
“अंजली, मै तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा….!” हा सुनील शेट्टीचा ‘धडकन’ मधील डॉयलॉग आजही प्रचंड लोकप्रिय आहे. सुनीलचा जन्म कर्नाटकमधील मंगलोरचा. अक्षय कुमार सोबत रुपेरी पडद्यावर त्याची चांगली जोडी जमली होती. मोहरा, दे दनादन, हेरा फेरी, फिर हेरा फेरी, धडकन, आवारा पागल दिवाना, दीवाने हुए पागल, सपूत, आन या सिनेमात दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. आजचा किस्सा काहीसा वेगळा आहे. सुनील शेट्टी सिनेमात आल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी त्यांचे नवे रुपेरी बरसे झाले त्याचा.
संजय गुप्ता यांच्या ‘कांटे’ या २००२ साली प्रदर्शित चित्रपटात सुनील शेट्टी काम करत होते. या सिनेमात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, संजय दत्त, कुमार गौरव, लकी अली हे कलाकार देखील भूमिका करत होते. खरंतर या सिनेमाच्या मूळ स्टारकास्टमध्ये अक्षय कुमार देखील होता. पण त्याच्या बिझी शेड्युलमुळे तिथे ‘लकी अली’ची वर्णी लागली. (Suniel Shetty Anna)
शूटिंगच्या दरम्यान सुनील शेट्टी संजय दत्तला, नेहमी ‘पोक्त अनुभवाच्या’ शैलीत चार महत्त्वाच्या गोष्टी सांगत असायचा. त्याची अनुभव सांगण्याची स्टाईल भारी होती. खरंतर संजय दत्त सुनील शेट्टीला बऱ्यापैकी सीनियर असलेला अभिनेता जरी असला तरी सुनील शेट्टीची एक खासियत होती. तो संजय दत्तला कायम ‘समजावून’ सांगत असायचा. यामुळे गमतीने एकदा संजय दत्तने सुनील शेट्टीला ‘अण्णा’ म्हणून बोलवायला सुरुवात केली. दक्षिणेत मोठ्या भावाला ‘अण्णा’ असे म्हणतात. (सुनील कर्नाटकातील असल्याने त्याला हे ज्ञात होते).
त्यावेळी सुनील शेट्टी संजय दत्तला म्हणाला, “अरे मी तुझ्या पेक्षा कितीतरी लहान आहे. खरंतर मी तुला अण्णा म्हटलं पाहिजे.” त्यावेळी संजय दत्त त्याला म्हणाला, “लेकीन गुरु, आप मुझसे महान हो. भलेही मै आपसे उमर मे बडा हू. लेकिन आपके खयालात और सोचने समझाने वाला तरीका काफी बढीया है…” सुरुवातीला सुनील शेट्टीला थोडंसं विचित्र वाटलं पण नंतर हळूहळू सवय पडली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सुनील शेट्टीला ‘अण्णा’ म्हणून बोलवायला सुरुवात केली. चित्रपटाचे चित्रीकरण संपे पर्यंत युनिट मधील सर्वजण सुनील शेट्टीला ‘अण्णा’ म्हणू लागले होते. अशा पद्धतीने सुनील शेट्टीचे ओरिजनल नाव मागे पडून अण्णा हेच त्याचं नाव झालं. (Suniel Shetty Anna)
==================
हे ही वाचा: जेव्हा बाबूजींनी निशिगंधा वाड यांना चेहऱ्यावरचा मेकअप उतरवायला लावला तेव्हा …
भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण
==================
पुढे त्याचे फॅन देखील त्याला ‘अण्णा’ या नावाने संबोधू लागले. सुनील शेट्टीला देखील आपले हे नवे नाव आवडू लागले. पब्लिक प्लेसेस मध्ये त्यांचे चाहते, एअरपोर्टवरील अधिकारी, सर्वजण त्याला अण्णा या नावाने समजून लागले. पुढे आवारा पागल दिवाना, फाईट क्लब आणि शादी से पहले या सिनेमात सुनील शेट्टीला पडद्यावर ज्या भूमिका साकारायला मिळाल्या त्या सर्व कॅरेक्टरचे नाव ‘अण्णा’ होते. अशा पद्धतीने मजाक मजाक मध्ये संजय दत्त यांनी दिलेले नाव सुनील शेट्टीला जे कायमचं चिकटलं ते चिकटलं.
जाता जाता ‘कांटे’ या सिनेमाबद्दल दोन गोष्टी सांगायलाच हव्यात. एक तर कुमार गौरव आणि संजय दत्त हे दोघे बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटात एकत्र दिसले. यापूर्वी १९८६ साली महेश भट्ट यांच्या ‘नाम’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र भूमिका केली होती. या सिनेमाचे बरेच शूटिंग अमेरिकेतील ‘लॉस एंजल्स’ येथे झाले होते. खरंतर दिग्दर्शक संजय गुप्ता यांना अमेरिकेतल्या अनेक ठिकाणी देखील या सिनेमाचे शूटिंग करायचे होते. पण या चित्रीकरणाच्या दरम्यान ९/११ ची घटना घडली आणि चित्रीकरणावर मर्यादा आल्या. त्यामुळे दिग्दर्शकाला अक्षरश: काम उरकावे लागले.