मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
हम छुपे रुस्तम है….
‘छुपा रुस्तम’ (Chhupa Rustam) हा गोल्डी टच ओसरायची सुरुवात ठरली. आपला आवडता दिग्दर्शक अनपेक्षितपणे अपेक्षा पूर्ण करत नाही तो धक्का पचवणे जगभरातील अस्सल चित्रपट रसिकांना पचवणे अवघड असते. माझ्या आवडत्या टाॅप पाच दिग्दर्शकांनी माझ्यावर तशी वेळ आणली म्हणून जास्त बोचरी ठरली.( उर्वरित चौघांवर नंतर कधी तरी फोकस.) विजय आनंद अर्थात गोल्डी हा आपला अतिशय आवडता दिग्दर्शक आहे असे सांगणारे माझ्यासारखे अनेक फिल्म दीवाने जगभरात आहेत. त्यांना विजय आनंद दिग्दर्शित ‘छुपा रुस्तम’ (Chhupa Rustam) ( रिलीज १८ मे १९७३) आज पन्नास वर्षांनंतरही आठवत असेल की तो न आठवलेला बरा. विसरलेला बरा.
विजय आनंदने दिग्दर्शनात पाऊल टाकताच त्यांच्याच नवकेतन फिल्म्सच्या ‘नौ दो ग्यारह’ (१९५७) पासूनच त्याची व देव आनंदची छान जोडी जमली. गोल्डीचा जमाना सुरु झाला. चेतन आनंद हा त्यांचा आणखीन एक भाऊ. त्यांची आपली वाटचाल सुरु होतीच. पण दिग्दर्शक व त्याचा हीरो यात एकमेकांना एकमेकांपासून नेमके काय हवे, कसे हवे, एकमेकांची ताकद काय, मर्यादा किती याची असलेली कल्पना चित्रपटाच्या पथ्यावर पडते. समिक्षक, विश्लेषक, प्रेक्षक यांचाही आपला एक दृष्टीकोन तयार होत जातो. गोल्डी व देवसाहेब यांचे काला बाजार ( १९६०), तेरे घर के सामने ( ६३), गाईड ( ६५), ज्वेल थीफ ( ६७), कहीं और चल ( ६८),जाॅनी मेरा नाम ( ७०), तेरे मेरे सपने ( ७१) अशी यशस्वी वाटचाल होताना एका पिढीतील चित्रपट पुढील पिढीत जात राहिले आणि हे चित्रपट सत्तरच्या दशकातील आम्हा शालेय व काॅलेजवयीन तरुणांनाही आपलेसे वाटले. साहजिकच या हिट जोडीचा नवीन चित्रपट कधी येतोय नि पाहतोय असं झाले. त्यातही गोल्डी म्हणजे, अगोदर गोष्टीत दम हवा, मग दिग्दर्शन असा पवित्रा घेणारा. आपल्या चित्रपटाची ट्रायल न दाखवताच वितरकांनी त्याचे घसघशीत पैशात हक्क घ्यावेत असा आग्रह धरणारा अशी त्याच्याबद्दल वदंता. पिक्चर्सही त्याने तशीच दिली. आपली क्रेडिबिलीटीही त्याने तशीच निर्माण केला. गोल्डीचा जमाना होता. गोल्डीचे युग होते. गोल्डीला देवची क्षमता आणि मर्यादा चांगलीच माहित होती. देवमध्ये उत्तम अभिनेत्याचे गुण आहेत असे एका मुलाखतीत गोल्डी म्हणाला होता. पण देव आनंद आपल्या ‘स्टार’ पणावर खुश राहतो हे त्याचे निरीक्षण योग्य होते.(Chhupa Rustam)
गोल्डीला संगीताचा उत्तम कान आणि डोळे असल्याचे एव्हाना सर्वज्ञात असल्याने ‘छुपा रुस्तम ‘ची गाण्याची तबकडी मार्केटमध्ये येताच गाणी हिट झाली. नीरज आणि खुद्द गोल्डीची गाणी आणि नवकेतन फिल्मचे हुकमी संगीतकार सचिन देव बर्मन यांची हम छुपे रुस्तम है (पार्श्वगायक किशोरकुमार), बोलो हम क्या दोगे (किशोरकुमार व आशा भोसले) ही गाणी लोकप्रिय ठरलीच पण धीरेसे जाना गाण्यात किशोरकुमारची के. एल. सैगलची आठवण देणाऱ्या शैलीत गायची हौस पूर्ण केली. यावरुन त्या काळात केवढं लिहिलं गेले की, विचारुच नका. कधी एकदा पिक्चर रिलीज होतोय आणि तो पाहतोय असं झालं.
मुंबईत मेन थिएटर मराठा मंदिरला जबरदस्त आकर्षक डेकोरेशनने पिक्चर रिलीज झाला पण त्यात फार ‘गोल्डी टच’ दिसला नाही. काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. ‘तेरे मेरे सपने’च्या अपयशाने गोल्डी खचला असावा. तरी बरं या चित्रपटाची पटकथा गोल्डी, कौशल्य भारती व सूरज सनिम यांनी लिहीली होती. म्हणजेच आपण या पिक्चरमध्ये नेमके काय मांडतोय याची गोल्डीला कल्पना होती आणि संकलनही त्याचेच असल्याने (आणि तो उत्तम संकलक होताच). मूळ गोष्ट सूरज सनिमची, कौशल्य भारतीने सूरज सनीम व गोल्डीची भेट घालून दिली. ‘मॅकॅनाॅज गोल्ड’ या विदेशी चित्रपटावर आधारित याची थीम. पण ते करताना गीत संगीताच्या माध्यमातून पटकथा आकार घेईल, चित्रपट पुढे जाईल याचे गोल्डीला भान. देव आनंद गुन्हेगार नायक. हेही जाल ( १९५२), पाकिटमार ( ५६), बारीश ( ५७), दुश्मन ( ५७), जाली नोट ( ६०) अशा चित्रपटात दिसले होतेच. पण त्या काळात परिस्थितीने बनलेला गुन्हेगार नायक असा फंडा असे.
भारत व तिबेट यांच्या सीमेवर पुराण वस्तू संशोधक सोन्याच्या खाणींचे शोधकार्य सुरु करतात, त्याच वेळेस विविध स्तरांवरचे चोर तोच खजिना शोधण्याचा आणि मग लुटण्याचा प्लॅन आखतात, यातून घडणारे नाट्य म्हणजे, ‘छुपा रुस्तम’. पिक्चरमध्ये देव आनंद आहे म्हणजे रोमान्स हवाच आणि थीममधला रोमांच यांची खिचडी म्हणजे हा चित्रपट. देव आनंद अश्विनीकुमार, तोच नटवरलाल आणि तोच छुपा रुस्तम(Chhupa Rustam). देव आनंदने आपल्या सर्व लकबी सांभाळत, आपण देव आनंद आहोत हे न विसरता आपल्या कामाचा आनंद घेतला. त्याचा रोमान्स ऋतू ( हेमा मालिनी) हिच्याशी. तिचा पिता राजेंद्र जैन (सज्जन) हिची व्हीलनने हत्या केलेली. विक्रम सिंग (अजित) आणि त्याचा मुलगा बहादूर सिंग (प्रेम चोप्रा) हे व्हीलन सोन्याची खाण लुटायचा प्लॅन आखतात, प्रयत्न करतात. गोल्डीने जीमी फर्नांडिस साकारलाय. यांच्यासह या चित्रपटात बिन्दू, ए. के. हनगल, रशीद खान, सुधीर, वीणा आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका. नवकेतनचे हुकमी कला दिग्दर्शक टी. के. देसाई यांना सोन्याचा खजिना उभारण्याची मोठीच संधी मिळाली. व्ही. राव यांचे छायाचित्रण आहे. ‘छुपा रुस्तम ‘ला साधारण यशावर थांबावे लागले. त्या काळात ‘चोरी ‘ या सूत्राभोवती अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपट येत. कुठे किमती हिऱ्याची चोरी, कुठे खजिन्याची चोरी. त्यात जो जास्त उत्सुकता आणेल त्याचं पिक्चर हिट हे समीकरण घट्ट होते.
======
हे देखील वाचा : फायटिंगलाही ॲक्टींग लागते यावर शिक्कामोर्तब!
======
‘छुपा रुस्तम’ (Chhupa Rustam) नंतर ‘बुलेट’ (१९७६) विजय आनंदच्या दिग्दर्शनात देव आनंद दिसला. तो चित्रपट एकदमच फसला. विजय आनंदच्या दिग्दर्शनात अगदी कालांतराने ‘जाना ना दिलसे दूर’ या चित्रपटात देव आनंद दिसला. मला आठवतय केतनव डबिंग थिएटरमध्ये देव आनंदने मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी या चित्रपटाची ट्रायल ठेवली होती. स्वत: देव आनंदने आमचे स्वागत केले. चित्रपट संपेपर्यंत तो थांबला. पण त्या चित्रपटात गोल्डी टच जराही दिसला नाही. ‘छुपा रुस्तम ‘च्या अगोदरचा गोल्डी आणि ब्लॅक मेल ( १९७३), राम बलराम ( ८०), रजपूत ( ८२), मै तेरे लिए ( ८८) च्या काळातील घसरण झालेला विजय आनंद यांत बराच फरक आहेच.