‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची एकाच दिवशी एक्झिट !
फिरोज खान आणि विनोद खन्ना या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री जबरदस्त होती. या दोघांनी अनेक सिनेमा एकत्र केले. प्रत्यक्ष जीवनात देखील त्यांची खूप चांगली मैत्री होती. दोघेही आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण, समस्या एकमेकांसोबत शेअर करायचे. या त्यांच्या मैत्रीचे प्रतिबिंब त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीमध्येसुद्धा दिसायचे. १९८० साली आलेल्या ‘कुर्बानी’(Qurbani) या चित्रपटात दोघे जानी दोस्त दाखवले होते. एकमेकांसाठी प्रसंगी जान देखील कुर्बान करायची अशी त्यांची या चित्रपटात मैत्री होती. या मैत्रीवर चित्रपटात एक गाणं देखील होते.
‘कुर्बानी’(Qurbani) हा सिनेमा सुरुवातीपासूनच एक बिग बजेट आणि मोठ्या स्केलवर बनवला जात होता. या सिनेमाचे चकाचक लोकेशन्स असतील, सिनेमाचे म्युझिक, नाझिया हसनचे ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये‘ हे गाणे असेल, बिड्डूचे एका गाण्यापुरते संगीत असेल आणि सर्वच चकाचक मोहौल! यामुळे सिनेमा सुपरहिट होणार याची कल्पना फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वांना आली होती.
या चित्रपटाच्या दरम्यान फिरोज खान आणि विनोद खान यांची मैत्री इतकी जबरदस्त होती की फिरोज खानने मुंबईमधील चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूशनचे हक्क विनोद खन्नाला दिले होते. २५ जून १९८० या दिवशी ‘कुर्बानी’(Qurbani) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच बंपर हिट झाला. इतका की भारतातील काही चित्रपटगृहात सलग आठ शो या सिनेमाचे होत होते. पहाटे तीनच्या आणि सहाच्या शोला देखील पब्लिक प्रचंड गर्दी करत होती. या सिनेमाने फिरोज खानला मालामाल करून टाकले. त्याचप्रमाणे विनोद खन्नाला देखील! पण मुंबईमधील डिस्ट्रीब्यूशनची सारी कमाई विनोद खन्नाने एका झटक्यात ओशो आश्रमला देऊन टाकली होती. त्यामुळे फिरोज खान प्रचंड नाराज झाले होते.
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला विनोद खन्नाची पुण्याच्या ओशो आश्रमात जाण्याची वारंवारता वाढली होती. हळूहळू ते फॅमिलीपासून अलिप्त होऊन पुण्याला ओशो आश्रमात राहू लागले होते. चित्रपटाचे अनेक निर्माते त्यांना आश्रमापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. यात फिरोज खान देखील होते. परंतु सर्व प्रयत्न निष्फळ झाले आणि १९८१ मध्ये विनोद खन्ना ओशो यांच्या आश्रमात चित्रपटसृष्टीला रामराम करत निघून गेले!
हा बॉलीवूड साठी मोठा धक्का होता. कारण त्यावेळी विनोद खन्ना अनेक मोठ्या प्रोजेक्टसोबत काम करत होते. फिरोज खानसुध्दा विनोद खन्नासोबत पुढच्या नव्या चित्रपटाचे प्लॅनिंग करत होते. चित्रपटाचे नाव होते कसक. परंतु विनोद खन्ना आता कोणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते पुण्याहून थेट ओशो आश्रम अमेरिकेला रवाना झाले आणि सर्व प्रश्न संपला! ‘कुर्बानी’च्या(Qurbani) डिस्ट्रीब्यूशन मधून आलेला सर्व पैसा त्यांनी ओशो यांना देऊन टाकला.
फिरोज खान यांनी त्या काळात एका मुलाखतीत असे म्हटले होते की, ”हा पैसा जर मी विनोद खन्नाला दिला नसत ‘कुर्बानी’सारखे(Qurbani) आणखी तीन चार सिनेमे मी सहज बनवू शकलो असतो.” ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात विनोद खन्ना पुन्हा चित्रपट सृष्टीत आले. फिरोज खान यांनी पुन्हा त्यांना आपल्या मित्राचे जोरदार स्वागत करत ‘दयावान’ या महत्वपूर्ण चित्रपटात प्रमुख भूमिकेत घेतले. तसं म्हटलं तर फिरोज खान आणि विनोद खन्ना हे दोन मित्र अवघ्या तीन चित्रपटात एकत्र आले पण हे तीनही चित्रपट कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. १९७६ साली ‘शंकर शंभू’ या चित्रपटात हे दोघे एकत्र आले.
=========
हे देखील वाचा : ‘ये गलीया ये चौबारा’ या गाण्यात राजकपूरने नकळत सांगितली आपली ‘मन की बात’
=========
त्यानंतर १९८० साली ‘कुर्बानी’(Qurbani) आणि १९८८ साली ‘दयावान’ या चित्रपटात या दोघांची मस्त जोडी जमली होती. फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची मैत्री शेवटपर्यंत अबाधित राहिली. दोघांचे निधन कॅन्सर या जीवघेण्या आजाराने झाले आणि मृत्यूची तारीख देखील दोघांची एकच होती २७ एप्रिल. साल मात्र वेगवेगळे होते फिरोज खानचे निधन २००९ साली झाले तर विनोद खन्नाचे निधन २०१७ साली झाले.