दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिल चाहता है: ऋतिक रोशन आऊट आमीर खान इन!
एकविसाव्या शतकाच्या आगमनासोबतच भारतीय चित्रपटांमध्ये देखील आमुलाग्र असा बदल होऊ लागला. सिनेमा जास्तीत जास्त युथफुल होऊ लागला. दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) या चित्रपटातून ‘सिनेमा आता तरुण तर होतो आहेच पण तो तरुणांच्या हातात जातो आहे’ हे दाखवून दिले. दिग्दर्शक फरहान अख्तर याचा हा पहिलाच चित्रपट होता आणि अतिशय जबरदस्त असा हा चित्रपट त्यांनी बनवला होता. या चित्रपटाची स्टार कास्ट होती आमिर खान, प्रीती झिंटा, सैफ अली खान,अक्षय खन्ना, डिम्पल कपाडिया आणि सोनाली कुलकर्णी !
पण तुम्हाला माहिती आहे का या सिनेमांमध्ये ऋतिक रोशन देखील काम करणार होता. फरहानची खूप इच्छा होती की आपल्या पहिल्याच चित्रपटात ऋतिकने भूमिका करावी. ऋतिक आणि फरहान हे दोघेजण बालमित्र. त्यामुळे फरहान जेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आला; त्यावेळेला पहिल्या चित्रपटात ऋतिक रोशन या भूमिका करावी असे त्याला वाटणे साहजिक होते. फरहानने ऋतिकला फोन करून सांगितले की, ”मी एक चित्रपट दिग्दर्शित करीत आहे आणि त्यातील एक भूमिका तुला करायचीच आहे!” ऋतिकने देखील त्याला होकार दिला.
सर्व काही व्यवस्थित चालले होते. परंतु अचानक सुभाष घई यांनी ऋतिक रोशनला घेऊन एका चित्रपटाची घोषणा केली. ऋतिक रोशन आता कन्फ्युजन मूडमध्ये आला कारण सुभाष घई यांचा चित्रपट हा सोलो हिरो असलेला चित्रपट होता. तर फरहान अख्तर याच्या चित्रपटात (Dil Chahta Hai) तीन तीन हिरो होते. त्यामुळे सहाजिकच त्याने सोलो हिरो असलेल्या सुभाष घई यांच्या चित्रपटाला पसंती दिली आणि फरहान अख्तर यांचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट सोडला. नंतर या भूमिकेसाठी फरहानने अक्षय खन्ना याची निवड केली. दोन्ही सिनेमे एकाच वेळी सुरू झाले.
सुभाष घई यांचा चित्रपट होता ‘यादें’. दोन्ही सिनेमा दोन आठवड्याच्या अंतराने प्रदर्शित झाले. ‘यादें’ २७ जुलै २००१ ला प्रदर्शित झाला तर ‘दिल चाहता हैं’ १० ऑगस्ट २००१ रोजी प्रदर्शित झाला. ‘यादें’ बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाला. तर ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. आपण सोलो हिरोच्या हट्टा पायी ‘दिल चाहता है’ हा चित्रपट सोडल्याचा पाश्चाताप ऋतिक रोशनला कायम होत राहिला.
‘यादें’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याने फरहानला फोन करून सांगितले, ”मित्रा मला माफ कर. माझी निवड चुकली. पण यापुढे तू सांगशील तो चित्रपट आणि तू सांगशील ती भूमिका मी करायला एका पायावर तयार आहे!” फरहान अख्तर याने त्याच्या पुढचा ‘लक्ष्य’ हा चित्रपट ऋतिक रोशन याला घेऊन केला. चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाले पण ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) या सिनेमाचे यश काही औरच होते. ऋतिक रोशनला कायम हा चित्रपट सोडल्याचा पश्चाताप वाटत असे.
जाता जाता: थोडंसं ‘दिल चाहता है’ या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात ऋतिक रोशन याला खरंतर आकाशची भूमिका देण्यात येणार होती. जी भूमिका नंतर आमिर खानने केली. आधीच्या स्टार कास्ट नुसार या चित्रपटात ऋतिक रोशन,अक्षय खन्ना आणि सैफ अली खान हे कलाकार होते. पण ऋतिक नकार दिल्यानंतर तिथे अभिषेक बच्चनला ती भूमिका ऑफर झाली. पण त्याने देखील नकार दिल्यावर तिथे आमिर खान आला आणि आमिर खानने आकाशच्या भूमिकेची मागणी केली.
========
हे देखील वाचा : … यामुळे विजय तेंडुलकरांना स्मिता पाटीलबाबत निर्णय बदलावा लागला.
========
चित्रपटाला संगीत शंकर एहसान लॉय यांचे होते. खरं तर या चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत असावे असे दिग्दर्शकाची इच्छा होती. परंतु दिग्दर्शकाने शंकर अहसान लॉय यांचे नाव सुचवले आणि या चित्रपटाला अतिशय सुंदर असे संगीत या त्रयीने दिले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक महिना आधीच आमिर खानचा ब्लॉकबस्टर ‘लगान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) रिलीज झाल्यानंतर देखील ‘लगान’ ची गर्दी काही कमी होत नव्हती!