किशोर कुमारने ‘लव्ह स्टोरी’ची गाणी गायला का नकार दिला?
हिंदी सिनेमाच्या साठच्या दशकातील ज्युबिली कुमार म्हणजे अभिनेता राजेंद्र कुमार(Rajendra Kumar)! याला ज्युबिली कुमार हे नाव यासाठी दिलं होतं की त्या काळी त्याचा प्रत्येक सिनेमा हा सिल्वर ज्युबिली होत असे. राजेंद्र कुमार चित्रपटाचा नायक असंण ही यशाची गॅरंटी असायची. या काळात त्याची ‘ससुराल’पासून सुरू झालेली यशाची गाडी सत्तरच्या दशकापर्यंत चालू होती. या काळात ‘मेरे मेहबूब’, ‘आई मिलन की बेला’, ‘आरजू’, ‘झुक गया आसमान’, ‘संगम’, ‘अमन’, ‘सूरज’, साथी’.. हे त्याचे सर्व सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.
अभिनेता राजेंद्र कुमार हा बऱ्यापैकी दिलीप कुमारची नक्कल करत मोठा अभिनेता झाला होता. दिलीप कुमार प्रमाणेच त्याने मोहम्मद रफीचा आवाज स्वतःसाठी वापरला. राजेंद्रकुमार आणि रफी हे कॉम्बिनेशन देखील त्या काळात खूप लोकप्रिय झाले होते. अर्थात मुकेश यांनी देखील काही सिनेमांमधून राजेंद्रकुमार (Rajendra Kumar) आवाज दिला. पण पडद्यावरचा प्रामुख्याने राजेंद्र कुमारचा स्वर हा मोहम्मद रफी यांचा होता. सत्तरच्या दशकापासून मात्र पार्श्वगायनाच्या क्षेत्रात किशोर कुमारने मोठी झेप घेतली. त्यामुळे आयुष्यभर ज्यांनी कधीच किशोर कुमारचा स्वर वापरला नाही त्यांना देखील किशोर कुमारचा आवाज वापरावा लागला.
दिलीप कुमारसाठी किशोर कुमार ‘सगीना’ या चित्रपटात गायला. राजेंद्र कुमार (Rajendra Kumar)साठी किशोर कुमार या कॉम्बिनेशनचा जेव्हा विचार होऊ लागला त्या काळात राजेंद्र कुमारचे दोन सिनेमे फ्लोअर होते एक होता कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेला गीत आणि दुसरा होता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेला ‘आप आये बहार आयी’. पैकी ‘गीत’मध्ये एक गाणं कल्याणजी यांना किशोर कुमार कडून गाऊन घ्यायचे होते पण राजेंद्र कुमारने त्याला नकार दिला. एल पी यांनी मात्र ‘आप आये बहार आयी’ या चित्रपटातील इतर सर्व गाणी रफी निघालेले असताना ‘तुझको भी कुछ ऐसा ही कुछ होता होगा ओ सजना…’ हे गाणे किशोर कुमार कडून गाऊन घेतले.
यानंतर १९७५ साली ‘सुनहरा संसार’ हा चित्रपट आला होता यात राजेंद्रकुमार हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत नौशाद यांचे होते. नौशाद यांनी तोवर एकदा ही किशोर कुमारचा स्वर आपल्या संगीतात वापरला नव्हता परंतु डिस्ट्रीब्यूटरचा दबाव असल्यामुळे या सिनेमातील एक गाणे किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घ्यावेच लागले पण राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) प्रमाणे नौशाद यांचा देखील किशोर कुमार बद्दलचा एक नकारात्मक पवित्रा होता. त्यामुळे भलेही या चित्रपटातील एक गाणे किशोर कुमारच्या आवाजात रेकॉर्ड केले जरी असले तरी चित्रपटात मात्र ते गाणे नव्हते.
जेव्हा किशोर कुमारला आपले गाणे सिनेमात कट केले आहे असे लक्षात आले तेव्हा त्याने नौशाद यांना फोन करून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ”ते गाणे व्यवस्थित रेकॉर्ड झाले नव्हते आणि राजेंद्रकुमार यांना आवडले नसल्यामुळे चित्रपटात घेतले नाही!” किशोर कुमारने आता राजेंद्रकुमार या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे असे समजून यापुढे कधीही राजेंद्र कुमारसाठी प्लेबॅक द्यायचा नाही असे निश्चित केले.
पुढे १९७८ साली ‘बिन फेरे हम तेरे‘ या चित्रपटाचा नायक राजेंद्र कुमार होता आणि त्यातील एक गाणे संगीतकार उषाखन्ना यांनी किशोर कुमारकडून गाऊन घ्यायचे ठरवले. पण जेव्हा किशोर कुमारला लक्षात आले की चित्रपटाचा नायक राजेंद्र कुमार आहे त्याने साफ नकार दिला. पण चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार टाक यांनी सांगितले की हे गाणे आम्ही राजेंद्र कुमार यांच्या तोंडी नव्हे तर पार्श्वभागी आम्ही वापरणार आहोत. म्हणून किशोरने यातील शीर्षक गीत रेकॉर्ड केले.
यानंतर १९८० साली जेव्हा राजेंद्रकुमार आपल्या मुलाला कुमार गौरवला लॉन्च करण्यासाठी ‘लव स्टोरी’ चित्रपटाची निर्मिती करत होता. तेव्हा आपल्या कुमार गौरवसाठी किशोर कुमारचा प्लेबॅक घ्यायचे ठरवले. त्या पद्धतीने आर डी बर्मन यांनी किशोर कुमारला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावले. परंतु ज्या वेळेला किशोर कुमारच्या लक्षात आले की या चित्रपटाची निर्मिती राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) करत आहे तेव्हा त्याने तिथून पळ काढला आणि चित्रपटात गाणी गायला नकार दिला.
=========
हे देखील वाचा : हरिहरन: गायकीवर प्रचंड हुकूमत असलेला प्रतिभा संपन्न कलाकार
=========
पंचम यांनी हरतऱ्हेने समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण किशोर कुमारने काहीच ऐकले नाही. शेवटी आर डी बर्मन यांनी मध्यस्थी करून किशोर कुमार नाही तर अमित कुमार यांच्या आवाजात लव्ह स्टोरीची गाणी रेकॉर्ड केली आणि ही सर्व गाणी गाजली. अमित कुमार याचा खऱ्या अर्थाने उदय या चित्रपटापासून झाला. या सिनेमातील एका गाण्यासाठी त्याला फिल्म फेअर देखील मिळाले. पण राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) आणि किशोर कुमार यांच्यातील मतभेद मात्र कायम राहिले. केवळ एक गाणे राजेंद्र कुमारने किशोर कुमार साठी गाणे गायले.