देव आनंद आणि टीना मुनीमची पहिली भेट!
अभिनेता देव आनंद (Dev Anand) ज्याला खरंतर ‘आधुनिक ययाती’ म्हटलं पाहिजे कारण तो कायम चिरतरुण राहिला. त्याने आपल्या वयाच्या निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत देखील नायकाच्या भूमिका केल्या पण तो कुठे अनफिट वाटला नाही. सदैव वर्तमानकाळात जगणारा हा कलाकार भूतकाळात कधीच रमत नव्हता. नवनवीन मुलींना शोधून रुपेरी पडद्यावर आणण्याचा एक मोठा विक्रम त्याच्या नावावर आहे.
हा किस्सा सत्तरच्या दशकाच्या मध्यावरचा आहे. तेव्हा देव आनंद (Dev Anand) आपल्या एका चित्रपटाचे शूट मुंबईत करत होता. हे चित्रीकरण पाहण्यासाठी भरपूर तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. एक शॉट झाल्यानंतर गर्दीतून एका मुलीचा जोरात आवाज आला “लवली शॉट!” देवने चमकून त्या मुलीकडे बघितले. देव आनंदची (Dev Anand) नजर आपल्यावर पडल्यानंतर ती मुलगी त्या गर्दीतून धावत पळत देवपाशी आली आणि म्हणाली, ”या पद्धतीने एकदम तुमच्याकडे येण्याबद्दल माफी मागते. पण मला तुमचा हा शॉट आणि तुमचा अभिनय प्रचंड आवडतो.”
देव आनंदला (Dev Anand) अशा फीडबॅकची नेहमीच सवय होती, विशेषतः मुलींकडून त्याला असे फीडबॅक कायम मिळत असायचे. पण या मुलीच्या आवाजात एक कशिश होती. जी देव आनंदला (Dev Anand) तिच्याकडे खेचून घेत होती. त्या मुलीने आपल्या पर्समधून एक ऑटोग्राफ बुक काढले आणि देव आनंदला विचारले, ”क्या मै आपका ऑटोग्राफ ले सकती हू?” त्यावर देव आनंदने स्टायलीश उत्तर दिले, “शुअर..व्हाय नॉट?” त्या मुलीने ऑटोग्राफ बुक देव कडे दिले. देव आनंदने बघितले तर ते ऑटोग्राफ बुक पूर्णपणे कोरे होते! देव आनंद (Dev Anand) थोडासा रोमँटिक होत हळुवार आवाजात त्या मुलीला म्हणाला, ”या ऑटोग्राफ बुक मध्ये सर्व ऑटोग्राफ माझेच असतील! आपण ज्या ज्या वेळेला भेटू त्या त्या वेळेला तू माझा ऑटोग्राफ घेत जा!”
तेव्हा ती मुलगी म्हणाली, ”ये ऑटोग्राफ बुक मैने सिर्फ आप ही के लिये खरीदा है!” देव आनंदने (Dev Anand) तिच्याकडे बघत विचारले, ”काय कॉलेजला जातेस का?” ती म्हणाली, ”हो, जाते. पण आता जाणार नाही!” देव आनंदने (Dev Anand) विचारले, ”का?” त्यावर ती मुलगी म्हणाली, ”मी एका ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला होता आणि त्यात माझा पहिला नंबर देखील आला आहे!” देवने लगेच तिच्याशी शेक हॅन्ड करत सांगितले, ”congratulation ,आता तर मला तुझा ऑटोग्राफ घेतला पाहिजे!” यावर ती मुलगी खळखळून हसली.
त्यावर देव आनंद (Dev Anand) म्हणाला, ”आता पुढे काय करायचे ठरवले आहे?” ती मुलगी म्हणाली, ”अजून काहीच ठरवलं नाही.” त्यावर देव म्हणाला, ”असं कसं? तू काहीतरी ठरवायला पाहिजे.” त्यावर ती मुलगी म्हणाली, ”माझ्या घरचे देखील असेच म्हणतात. पण मला कुठली फारशी Ambition नाही!” त्यावर देव म्हणाला, ”का नाही? माणसाने मोठे स्वप्न कायम पाहिले पाहिजे. तू देखील मोठी Ambition ठेवली पाहिजे.“ त्यावर ती मुलगी म्हणाली, ”हो आता त्याचा विचार करेल.”
त्यावर देव (Dev Anand) म्हणाला, ”सिनेमात काम करण्याबाबत तुझा काय विचार आहे?” ती मुलगी म्हणाली, ”अजून काहीच ठरवले नाही.” देव म्हणाला, ”जर मी तुझी स्क्रीन टेस्ट घेतली तर तुझी काही हरकत आहे का?” ती मुलगी म्हणाली, ”कोणत्या चित्रपटासाठी?” त्यावर तो म्हणाला, ”ते स्क्रीन टेस्ट नंतर ठरेल. पण तू आधी स्क्रीन टेस्ट तर दे.” ती मुलगी खूष झाली आणि निघून गेली.
=============
हे देखील वाचा : देव आनंद खरोखरच झीनत अमानच्या प्रेमात पडला होता?
=============
नंतर देव आनंदने (Dev Anand) तिला स्क्रीन टेस्ट साठी बोलावले. तिचे विविध फोटो घेतले. तिच्याकडून काही डायलॉग बोलून घेतले. तिची बॉडी लँग्वेज, तिचा अभिनय तपासला. त्या दिवशी आणखी दोन मुलींच्या स्क्रीन टेस्ट झाल्या होत्या. त्यानंतर त्या पैकी एका मुलीचे सिलेक्शन झाले. ती मुलगी होती ऑटोग्राफ घेणारी! जिला पुढे देव आनंदने (Dev Anand) आपल्या नवकेतनच्या ‘देस परदेस’ या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. ती मुलगी होती टीना मुनीम!