या सिनेमात उर्मिला मातोंडकरने चक्क एक मुलगा म्हणून काम केले होते!
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आता चित्रपटात काम जरी करत नसली तरी अधून मधून काही राजकीय विधान करून चर्चेत येत असते. नव्वदच्या दशकात तिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात बोल्ड सीन देऊन धमाका केला होता. उर्मिला मातोंडकर यांची चित्रपट कारकीर्द तशी फार मोठी म्हणावी अशी नव्हती आणि फार उल्लेखनीय अशी देखील नव्हती. पण बालकलाकार म्हणून तिने केलेल्या काही चित्रपटांची आठवण आजदेखील रसिकांना होते.
विशेषतः गुलजार यांच्या ‘मासूम’ या चित्रपटातील तिची भूमिका आज देखील आठवली जाते. याच काळात तिने ‘कच्ची धूप’ या दूरदर्शनवरील एका मालिकेत चक्क भाग्यश्री पटवर्धन आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत भूमिका केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का एका चित्रपटात उर्मिलाने (Urmila Matondkar) चक्क मुलगा म्हणून काम केले होते. चित्रपटात ती पूर्ण वेळ मुलगा बनली होती. अर्थात त्यावेळी ती लहान होती. बालकलाकार होती. पण या चित्रपटात ती मुलीच्या भूमिकेत नव्हती तर मुलाच्या भूमिका होती. कोणता होता तो चित्रपट हा चित्रपट?
१९८१ साली ‘कलियुग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. या सिनेमाची निर्माते होते अभिनेते शशी कपूर. या चित्रपटात मोठी स्टार कास्ट होती. राज बब्बर, रेखा, गुणभूषण खरबंदा, सुप्रिया पाठक.. या सिनेमाची कथा पटकथा गिरीश कर्नाड यांनी लिहिलेली होती. हा चित्रपट महाभारताच्या कथानकावर आधारित होता. महाभारताच्या कथानकाला आधुनिक पेहराव देऊन हा चित्रपट बनला होता. यात शशी कपूर यांनी महारथी कर्ण यांच्यासारखी भूमिका निभावली होती. एका मोठ्या इंडस्ट्रियालिस्टच्या कुटुंबाची कथा या चित्रपटात होती.
द्रोपदी सारखे कॅरेक्टर या चित्रपटात रेखाने निभावले होते. तिच्या पतीच्या भूमिकेत राज बब्बर होते. त्यांची भूमिका बऱ्यापैकी महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर यांच्यासारखी होती. या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखाचे नावदेखील धर्मराज असेच होते. या चित्रपटात रेखा आणि राज बब्बर यांच्या मुलीची नाही तर मुलाची भूमिका उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने केली होती. या संपूर्ण चित्रपटात ती मुलगा म्हणूनच वावरली होती.
आज उर्मिला आपली ही भूमिका पाहून नक्कीच हसत असेल. या भूमिकेसाठी श्याम बेनेगल यांना तीच का हवी होती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कारण या काळामध्ये अनेक बालकलाकार जे मुलांची भूमिका करत होते ते अस्तित्वात होते. पण श्याम बेनेगल यांनी उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिला मुलाची भूमिका दिली. या चित्रपटातील सर्व पात्र ‘महाभारता’ वर आधारीत होते.त्यातील व्यक्तिरेखेचे नाव महाभारताशी साधर्म्य दाखवणारे होते. शशी कपूर (करण सिंग- कर्ण)राजबब्बर (धरम्राज- युधिष्ठीर), कुलभूषण खरबंदा (बलराज- भीम),रेखा(सुप्रिया-द्रोपदी),अमरीश पुरी (किशन चंद – श्री कृष्णा), व्हिक्टर बनर्जी (धनराज-दुर्योधन),सुषमा सेठ (सावित्री-कुंती) विजया मेहता(देवकी-गांधारी), ए के हंगल(भीष्म चंद-भीष्म), अनंत नाग (भारत राज-अर्जुन)
===================
हे देखील वाचा : ‘ये जीवन है…’ गाण्यात किशोर कुमार यांनी इमोशनल टच कसा आणला?
===================
या वर्षीच्या म्हणजे २९ व्या फिल्मफेअर अवार्ड सेरेमनी मध्ये ‘कलयुग’ या सिनेमाला पाच नामांकन मिळाले होते. सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट सहायक नायिका (सुप्रिया पाठक) सर्वोत्कृष्ट ध्वनी (हितेंद्र घोष), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (श्याम बेनेगल), सर्वोत्कृष्ट कथा (श्याम बेनेगल/गिरीश कर्नाड) यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहायक नायिका, सर्वोत्कृष्ट ध्वनी हे तीन फिल्म फेअर पुरस्कार मिळाले. इतकंच नाही तर ऑस्करसाठी भारतातून ‘कलयुग’ हा सिनेमा अधिकृतपणे पाठवला होता.