Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’
Aishwarya Rai : गुणवत्ता सरस तरी गाॅसिप्सने रंगत
कोणत्याही प्रकारच्या टीकाकारांना अतिशय चोख उत्तर देण्याचा सरळ सोपा मार्ग म्हणजे, “आपलं काम बोलले पाहिजे…” ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ने ते केले म्हणून ती आपल्या अभिनय कारकिर्दीतील यशस्वी अठ्ठावीसाव्या वर्षीदेखील आपलं अस्तित्व टिकवून आहे, आजही ती फोकसमध्ये आहे…
माॅडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात आलेल्या चेहर्यांना कसले आलेय एक्स्प्रेशन (भावमुद्रा)? अभिनय म्हणजे काय माहीत आहे का ? त्यांना नृत्य जमेल काय? त्या तर शोभेच्या बाहुल्या. चार दोन चित्रपटात चमकतील आणि मग पुन्हा जाहिरातपटात दिसत राहतील, चमकत राहतील असे अगदी सहज बोलले जाई. (बोलणे सोपेच असते म्हणा) काही सेकंद वा दीड दोन मिनिटाच्या जाहिरातपटात गोड गोड दिसणे सोपे आहे पण सोळा अठरा रिळाच्या अथवा एकशेसाठ ते एकशेऐंशी मिनिटांच्या चित्रपटात प्रेमदृश्यापासून विरह प्रसंगापर्यंत कॅमेऱ्यासमोर व्यक्त होत राहणे वेगळे असं म्हटलं जाणे स्वाभाविकच. (Aishwarya Rai)
त्यात १९९४ साली ऐश्वर्याने विश्व सुंदरी आणि सुश्मिता सेन (Sushmita sen) ने जगत सुंदरी हे जगविख्यात मुकुट पटकावून सौंदर्याच्या बाबतीत आपल्या देशाला जागतिक पातळीवर एक प्रकारचे यशच मिळवून दिले. आपल्या देशात खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरण यांचे वारे रुजत असल्याचा तो काळ होता आणि Aishwarya Rai व Sushmita sen या सौंदर्यवती म्हणूनच लोकप्रिय होत्या. अभिनेत्री म्हणून त्यांचा विचारच होत नव्हता. सुनील दर्शन दिग्दर्शित “राजा हिन्दुस्तानी” (१९९६) साठी खरं तर तिच आमिर खानची नायिका म्हणून निवडली गेली असती. पण ते घडले नाही.
मला आठवतय, त्या काळात आम्ही सिनेपत्रकार मोठ्याच प्रमाणावर नवीन चित्रपटाच्या मुहूर्तावर जवळपास “पानभर” कव्हरेज देत असू (त्याला चक्क वाचकप्रियता होती). अशातच जुहू येथील मयूर महल बंगल्यावर दीपक आनंद दिग्दर्शित ‘लगते जिगर‘च्या मुहूर्ताला आपल्या आईसोबत ऐश्वर्या राय आल्याचे दिसले. ती कायमच आपल्या आईसोबत चित्रपटसृष्टीत वावरे (Rishi Kapoor व करिश्मा कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आठवडाभरच्या शूटिंगमध्येच गुंडाळला गेला) David Dhawan दिग्दर्शित ‘बडे मियां छोटे मिया‘ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या पार्टीतही आपल्या आईसह ऐश्वर्या (Aishwarya Rai) आल्याचे दिसले. ऐश्वर्या अभिनेत्री म्हणून पुढच पाऊल टाकू इच्छितेय हे या सगळ्यातून दिसत होते. चित्रपटाच्या जगात कान, डोळे, नाक उघडे ठेवून भटकंती केली तर बरेच काही दिसते. ते एक्स्युझिव्हज असते.
ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai) सुनील शेट्टीची नायिका म्हणून अनिझ बज्मी (Anees Bazmee) दिग्दर्शित ‘हम पंछी एक डाल के‘ व ‘राधेश्याम सीताराम‘ या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटांचे शूटिंग सुरु झाले पण गती येत नव्हती. (काही महिन्यातच हे दोन्ही चित्रपट बंद पडले). मणि रत्नम दिग्दर्शित ‘इरुवर‘ (तमिळ) आणि राहुल रवैल दिग्दर्शित ‘और प्यार हो गया‘ (नायक बाॅबी देओल) हे चित्रपट मिळाले आणि ऐश्वर्या रायच्या अभिनेत्री कारकिर्दीला हिरवा कंदिल मिळाला. और प्यार हो गयाच्या मुहूर्ताची अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील शानदार पार्टी आजही आठवतेय. विश्व सुंदरीचा चित्रपट असे त्या मुहूर्ताचे वैशिष्ट्य होते.
‘iruvar’ हा तमिळनाडूतील राजकारणावर आधारित चित्रपट. ऐश्वर्या पुष्पांजली व कल्पना अशा दुहेरी भूमिकेत. (यातील तिच्या क्लब नृत्याची बरीच चर्चा रंगली. पहिल्याच चित्रपटात तिने असे नृत्य करावे असा त्यात प्रश्नार्थक सूर होता.) पहिल्याच चित्रपटात ऐश्वर्याला मोहनलाल, प्रकाश राज, गौतमी, रेवती, तब्बू, नासर अशा मान्यवरांसह काम करायला मिळाले. हे खूप महत्वाचे असते.
‘इरुवर’ हा ऐश्वर्या रायचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट. १४ जानेवारी १९९७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. (म्हणून ही दखल. )
ऐश्वर्या रायला अभिनेत्री म्हणून सर्वप्रथम कधी स्वीकारले गेले?
संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम‘ (१९९९) पडद्यावर आल्यावर. त्यातील तिची नंदिनीची भूमिका तिला बरेच काही देणारी ठरली. तिच्याकडे अभिनय सामर्थ्य आहे, योग्य तो संयम आहे, दिग्दर्शकाच्या अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट देते, नृत्याची उत्तम जाण आहे अशी प्रमाणपत्र मिळाली. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वोत्तम चलनी नाणे ते ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ला मिळाले आणि एका यशस्वी वाटचालीला सुरुवात झाली. त्यात सुभाष घई दिग्दर्शित ताल, संजय लीला भन्साली दिग्दर्शित देवदास व गुजारीश, मणि रत्नम दिग्दर्शित गुरु, रावण तसेच तमिळ भाषेतील महामनोरंजक चित्रपट पेल्वीन सेल्वन (पहिला व दुसरा), आदित्य चोप्रा दिग्दर्शित मोहब्बते, ऋषि कपूर दिग्दर्शित आ अब लौट चले, करण जोहर दिग्दर्शित ये दिल है मुश्किल, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर, संजय गढवी दिग्दर्शित धूम 2 असे अनेक महत्वाचे चित्रपट व त्यात विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा.
=============
हे देखील वाचा : Deva : शाहिद कपूरचा आणि अमिताभ बच्चनचा
=============
हा ग्राफ असा काही कौतुकाचा की, ही माॅडेल काय अभिनय करणार या टीकेला पडद्यावरुन चोख उत्तर. तिची भूमिका असलेल्या पहलाज निहलानी निर्मित ‘इंडियन‘ या चित्रपटाचा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील एका रात्री झालेला जंगी मुहूर्त आठवतोय. Sunny deol नायक होता. मुहूर्त दृश्यात देशभक्तीवर प्रभावी संवाद होते. हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. अन्यथा ऐश्वर्या रायच्या प्रगती पुस्तकात आणखीन गुण वाढले असते…
ही झाली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ची एक छानशी बाजू. त्यात ग्लॅमर, अभिनय, गुणवत्ता, व्यावसायिकता असे अनेक गुण आहेत. तेच कलाकाराला घडवतात. अमिताभ व जया बच्चनची ती सून झाली. अभिषेक बच्चनची पत्नी झाली. जुहूच्या दहाव्या रोडवरील अमिताभच्या प्रतिक्षा बंगल्यात अतिशय थाटात लग्न सोहळा रंगला. मिडियानेही रंगतदार उत्तम हाईप दिला.
सगळे कसे झक्कास आहे तरी, आता कहानी मे टर्न आणि ट्विस्ट
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) च्या कारकीर्दाला आणखीन एक रंग आहे, तो चटकदार गाॅसिप्सचा. तिची मेहनत, यश, गुणवत्ता झाकून टाकावी अशाही गोष्टी जणू बिघडल्या. एक कलाकार एकाच कारकिर्दीत काय काय अनुभवतो बघा. त्याच्या प्रशस्त घर आणि नवीन माॅडेलच्या गाडीपेक्षा ही बाजू महत्वाची ठरते.
सलमान खान तिच्या प्रेमात असा काही “पडला” की त्याने अजून लग्नच केले नाही. (आणि आता कधी करणार म्हणा.) तो तिला भेटायला “देवदास“च्या चित्रनगरीतील सेटवर जायचा या गोष्टी लपल्या नाहीत. अशा गोष्टीत मसाला मीठ तेल जिरं तिखट टाकून त्या पसरतात. एकदा तर रात्रभर तिच्या वांद्र्यातील निवासस्थानाबाहेर तो बसला होता ही “ब्रेकिंग न्यूज” गाजली. तोपर्यंत अशा फिल्मी गोष्टीतून टीआरपी वाढतो हे सिध्द न झाल्याने तेव्हा याचे रात्रभर लाईव्ह कव्हरेज झाले नाही. अरेरे. भारी फूटेज मिळाले असते.
सहजा-सहजी हार मानेल तो सलमान खान कसला? त्याने ऐश्वर्या रायसारख्याचा दिसणार्या स्नेहा उल्लालला “लकी नो टाईम फाॅर लव्ह” या चित्रपटात आपली प्रेमिका केली. कोणत्याच ॲन्गलने स्नेहा उल्लाल ऐश्वर्या दिसत नव्हती. सलमान खान ऐश्वर्या (Aishwarya Rai) च्या अखंड प्रचंड प्रेमात असल्यानेच त्याला तसे दिसले वा वाटले असेल आणि या सगळ्यातून तो ऐश्वर्यामय असल्याचे जणू अधोरेखित होत राहिले.
याच सलमान खानला खिजवण्यासाठी ऐश्वर्याने म्हणे काही महिने विवेक ओबेरॉयला आपलासा केले. त्याने त्यातही अलिप्त राहणे पसंत केल्याने ही “स्टोरी” फार गाजली नाही आणि आता बच्चन खानदानाची ही सून अभिषेकपासून वेगळी राहतेय, त्यांच्यात “अभिमान”ची स्टोरी घडलीय, वगैरे वगैरे अनेक गोष्टी उलटसुलट गाजत असतानाच हे दाम्पत्य मुलीसह विमानतळावर दिसले. (विमानतळावरील कलाकार ही एक वेगळीच स्टोरी. चित्रपट माध्यम व व्यवसाय यापेक्षा असेच काही चमचमीत जास्त लोकप्रिय होतेय त्याला कोण काय करणार?) ऐश्वर्या रायने विविधांगी भूमिकेतून पडद्यावर उठवलेला ठसा, तिच्याबद्दलच्या गाॅसिप्समधील झळाळीने काहीसा काहीसा नक्कीच झाकलाय. (Aishwarya Rai)
=============
हे देखील वाचा : Mela : मेला चित्रपटाची पंचवीशी ना धड “कारवा”, ना “शोले”
=============
एका यशस्वी अभिनेत्रीचे आयुष्य असे अनेक वळणे घेत घेत आकार घेत असते. भविष्यात म्हणजे आणखीन पंचवीस तीस वर्षांनी ऐश्वर्या रायवर चरित्रपट वा वेबसिरीज निर्माण होईलही. त्यासाठीचा मसाला खूप आहे (तीन नायक तर नक्कीच असतील त्यात) पण तिच्या व्यक्तिमत्वातील नैसर्गिक गोडवा कोठून आणणार? चरित्रपटात तोच मोठा लोच्या असतो. मेकअप आणि कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करुन एखाद्या व्यक्तिमत्वासारखे बनवता येईल पण ते व्यक्तिमत्व घडणार नाही. अठ्ठावीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ला शुभेच्छा.