
Hum : जुम्मा चुम्मा दे देचा वाद केवढा गाजला
गाण्याची चाल एक, पण गाणी दोन असं अधूनमधून घडलयं…
पण पहिली चाल कोणाची, ती सुचली कशी, एखादी विदेशी ट्यून ऐकून सुचली का, आणि मग या दोन चित्रपटातील दोन गाण्यात जास्त सरस कोण? कोणते गाणे पडद्यावर भारी ठरलयं? लक्षवेधक ठरलयं? जास्त लोकप्रिय ठरलयं अशी प्रश्न मंजुषा आपोआपच जन्माला येते… (Hum)
रोमेश शर्मा (Romesh Sharma) निर्मित व Mukul S. Anand दिग्दर्शित “हम” (Hum) ( मुंबईत रिलीज १ फेब्रुवारी १९९१. मेन थिएटर मेट्रो) च्या प्रदर्शनास चक्क चौतीस वर्ष पूर्ण होत असतानाच ‘एक चाल दोन गाणी‘ हा गाजलेला वाद आठवला…
‘हम’ चित्रपटातील आनंद बक्षी लिखित व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले जुम्मा चुम्मा दे दे हे जबरदस्त वेगवान (फोर्सफुल्ल) गाणं आजही लोकप्रिय आहे हे वेगळे सांगायलाच नको.

सुदेश भोसले यांनी ते Amitabh Bachchan च्या आवाजात गायलयं तर कविता कृष्णमूर्तींनी किमी काटकरला आवाज दिला. या गाण्याच्या शूटिंगची पूर्वतयारी सुरु असतानाच अमिताभने हे गाणे ऐकायचे ठरवले. स्वाभाविक असते हो हे. आपण पडद्यावर कोणते गाणे साकारणार आहोत याची कलाकार माहिती करुन घेणारच. गाणे ऐकताच अमिताभचा पहिला प्रश्न होता, हे गाणे आपण कधी गायले? आपण हे गाणे नक्कीच गायले नाही याची बच्चनसाहेबांना पूर्ण खात्री होतीच. तेव्हा त्यांना उत्तर मिळाले, हा आवाज सुदेश भोसलेचा आहे. त्याने अमिताभ बच्चनचा आवाज, त्यांच व्यक्तिमत्व, या गाण्याची उत्फूर्त शैली, त्यांची नृत्य अदा, त्याचे चित्रीकरण या सगळ्याचा विचार करत हे गाणे गायले. (Hum)

अमिताभ बच्चनची नायिका बनण्याचा भारी “मौका” मिळाल्याने Kimi Katkar प्रचंड सुखावली होती. अशी उंची संधी मिळेल याची तिने साधी कल्पनाही केली नव्हती. अमिताभच्या अष्टपैलु अभिनय, लोकप्रियता, वक्तशीर व्यावसायिकता, उंची फिटनेस अशा समीकरणात फिट्ट बसणारी अभिनेत्री आणायची कुठून हा ऐंशीच्या दशकातील एक प्रश्नच होता आणि रति अनग्निहोत्री (कुली), अमृता सिंग (मर्द) यांनाही अमिताभची नायिका बनण्याची या दिवसांत संधी मिळाली. श्रीदेवी, जयाप्रदासोबत त्याची जोडी जमली तरी ‘हम‘ (Hum) साठी मुकुल आनंदने वेगळा विचार केला. मुकुल आनंदने अमिताभ बच्चनला विविध प्रकारचा नायक करत अग्निपथ (१९९०), हम (१९९१), खुदा गवाह (१९९२) असे तीन चित्रपट केले. या तीनही चित्रपटांच्या भव्य दिव्य दिमाखदार मुहूर्ताचा लाईव्ह अनुभव मी मिडियात असल्याने घेवू शकलो. मिडिया बरेच काही देत असतेच. त्या आस्वादात इतरांना सामावून घ्यायलाच हवे.
मला आठवतय, ‘हम’ (Hum) चा मुहूर्त वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत रंगला. अमिताभ, रजनीकांत व Govinda यांच्यावर अतिशय कलरफुल असे मुहूर्त दृश्य चित्रीत झाले. त्या काळात प्रत्यक्षात हिंदी चित्रपटसृष्टीत भटकंती करताना मला हिंदी चित्रपटांचे मुहूर्त म्हणजे जणू एक सणच वाटे. फार गोड पेढा वाटला जाई. हे फिल्मवाले स्वतः त्या मुहूर्ताचा आनंद घेत असत आणि त्यात आम्ही सिनेपत्रकार व त्यांच्या पाहुण्यांना सामील करुन घेत असत. असे ‘आठवणीतील मुहूर्त’ मी अनेक सांगू शकतो.

‘हम’ (Hum) च्या मुहूर्तापर्यंत या चित्रपटातील नायिका व अन्य कलाकार निश्चित झाले नव्हते. ते होत होत गेले. बख्तावर या क्रूर खलनायक भूमिकेत Danny Denzongp (हा पुण्यात एफटीआयआयमध्ये अभिनय प्रशिक्षण घेत असताना जया बच्चन व रोमेश शर्मा यांचा मित्र होता), अनुपम खेर, कादर खान ( याचेच संवाद होते), दीपक शिर्के ( अमिताभच्या वडिलांच्या भूमिकेत), दीपा साही, शिल्पा शिरोडकर (गोविंदाची नायिका) वगैरे कलाकार साईन होत गेले. शूटिंगसाठीच्या तारखा घेतल्या जावू लागल्या (चित्रपट निर्मितीतील हे सर्वात अवघड काम). शूटिंगचे स्पाॅट ठरु लागले तरी अमिताभ बच्चनची नायिका कोण हा प्रश्न सुटत नव्हता…
अखेर किमी काटकरचे नाव येताच सगळेच आश्चर्यचकित. कदाचित तीदेखील असेल. ‘टारझन’ च्या यशानंतर किमी काटकर हिंदी चित्रपटसृष्टीची “बो डेरेक” म्हणून ओळखले जावू लागली. बोल्ड आणि ब्युटीफुल म्हणून ती गाॅसिप्स मॅगझिनच्या ग्लाॅसी पेपर्सवर आणि रुपेरी पडद्यावर दिसू लागली. अभिनय तिच्या आसपासही फिरु शकणार नाही याची जणू खात्रीच होती. अशा वेळीच ती अमिताभची नायिका? ब्रेकिंग न्यूज हो जणू आणि मग जुम्मा चुम्मा दे दे गाण्याचा तडका. गाण्याची ध्वनिफीत प्रकाशित होतेय तोच गाणे लोकप्रिय आणि अशातच एक सूर आला, याच चालीवर राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘थानेदार‘ या चित्रपटातील इंदीवर लिखित व बप्पी लाहिरीने संगीतबद्ध केलेले आणि बप्पी लाहिरी व अनुराधा पौडवाल यांनी गायलेले तम्मा तम्मा लोगे… गाणे आले. (Hum)
==============
हे देखील वाचा : Deewaar : “दीवार”चे डायलॉग ऐकायलाही रस्त्यावर गर्दी होई
==============
चाल एकच, गाणी मात्र दोन आणि ती एकाच वेळेस गाजू लागली. ‘हम’चे जुम्मा चुम्मा… जास्तच जोरात होते. या गाण्याच्या फोटोतील अमिताभ व किमी काटकरची प्रचंड सकारात्मक देहबोली जास्त आकर्षक होती. तम्मा तम्मा गाण्यावर संजय दत्त व माधुरी दीक्षितचा नृत्य धमाका. संजय दत्त नृत्यासाठी कधीच ओळखला गेला नाही. माधुरी दीक्षित कम्माल डान्सर अभिनेत्री. सेटवर ती आपल्या नृत्यावर प्रचंड मेहनत घेणारी. त्या काळात तिचं नृत्य असलेल्या शूटिंगच्या सेटवर आम्ही सिनेपत्रकार रिपोर्टिंगसाठी आवर्जून जात असू. माधुरी दीक्षितची अफाट मेहनत पाहून थक्क व्हायला होई. (Hum)

जुम्मा चुम्मा विरुद्ध तम्मा तम्मा या वादावर गाॅसिप्स मॅगझिनमधून बरेच उलटसुलट लिहिले गेले. एका दक्षिण आफ्रिकन गाण्याच्या ट्यूनची काॅपी हे गाणे आहे असेही मुद्या गुद्द्यात आले. पाश्चात्य देशातील चित्रपट गोष्टी, प्रतिकात्मक दृश्य, कॅमेरा ॲन्गल, गाण्याची चाल हे आपल्याकडील चित्रपटात येणे हे या काळात वाढले होते. याचं कारण विदेशातील चित्रपट व संगीत यांच्या व्हिडिओ कॅसेट आपल्या देशात मोठ्याच प्रमाणावर आयात होवू लागल्या होत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे विदेशात मोठ्याच प्रमाणावर स्टेज शोज रंगू नाचू लागले. (Hum)
या शोजसाठी रिहर्सल दुपारी आणि शोज रात्री आणि मधले काही दिवस भटकंती, शाॅपिंग आणि स्थानिक चित्रपट व संगीतावर लक्ष्य. त्यावरुन प्रभावित होऊन इकडे आल्यावर नवनिर्मिती. अशा परिस्थितीत एकाच वेळेस दोघांना एक ट्यून आवडू शकते. महत्वाचे आहे ते त्याचे हिंदीकरण आणि रुपेरी पडद्यावरील सादरीकरण जमले कोणाला?
==============
हे देखील वाचा : Dimple Kapadia : डिंपल कापडिया सूडनायिका
==============
उत्तर सोपे आहे, जुम्मा चुम्मा दे दे जबरा सुपरहिट. इतके की अमिताभने त्या काळात अनेक देशातील स्टेज शोजमध्ये हे आणि ‘लावारीस’चे मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है ही गाणी गात नाचत सादर केली… जुम्मा चुम्मा दे दे गाणे खरं तर रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘राम की गीता श्याम की गीता‘ या चित्रपटांसाठी निश्चित झाले होते. अमिताभ व दुहेरी भूमिकेत श्रीदेवी यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. आपला अजय वढावकरही या चित्रपटात होता. (Hum)
मला आठवतय अंधेरीतील नटराज स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. पण काही कारणास्तव हा चित्रपटमध्येच बंद पडला. त्यासाठीचे गाणे ‘हम’मध्ये चालले, गाजले, इतकेच नव्हे तर या चित्रपटाची ओळख ठरले. “हम” (Hum) म्हटले की जुम्मा चुम्मा आठवणारच…