
Lucky Ali : लकी अलीचा पहिला म्युझिक अल्बम ‘सुनो’…
नव्वदच्या दशकामध्ये भारतीय चित्रपट संगीताने पुन्हा कात टाकली आणि सुरील्या वळणावर पुन्हा संगीत जाऊ लागले. संगीतात एक मेलडी आली होती याच काळामध्ये इंडियन पॉप म्युझिकला देखील खूप मागणी मिळू लागली. रिमिक्सचे पेव याच काळत फुटले. भारताने खाऊजा (पक्षी: खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण) धोरण स्वीकारल्याने नव्वदच्या दशकामध्ये चॅनल्सची संख्या वाढली होती. MTV सारखे म्युझिकल चॅनल्स घराघरांमध्ये खूप आवडीने पाहिले जात होते. त्यामुळे इंडियन पॉप म्युझिक आणि त्यासोबत त्यांचा व्हिडिओ याला खूप मागणी होती. याच काळात एक अल्बम आला होता ‘सुनो’… लकी अली (Lucky Ali) यांनी गायलेल्या गाण्यांचा हा अल्बम होता.

आज देखील हा अल्बम त्यातील व्हिडिओ आणि लिरिक्समुळे रसिकांच्या मनात ताजा आहे. पण हा अल्बम तयार होण्यासाठी लकी अली यांना बहुत पापड बेलने पडे थे! खूप संघर्ष करावा लागला; तेव्हा कुठे हा अल्बम रसिकांच्या समोर आला. लकी अली यांच्यासाठी हा अल्बम खूप लकी ठरला कारण या अल्बमनंतर एक इंडियन पॉप सिंगर म्हणून त्यांची आयडेंटिटी तयार झाली. नेमका काय संघर्ष करावा होता लकी अली यांना? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Untold stories)
लकी अली (Lucky Ali) ख्यातनाम अभिनेते आणि विनोदीवीर मेहमूद यांचे चिरंजीव. मकसूद मोहम्मद अली (जन्म: १९ सप्टेंबर १९५८) हे नाव जरी असलं तरी लकी अली म्हणून ते जास्त लोकप्रिय आहेत. कारण यांच्या जन्मानंतरच मेहमूद यांची खरी फिल्मी करिअर सुरू झाली. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी छोटे नवाब या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली. म्युझिकची आवड लहानपणापासून होती पण कुठलेही विधिवत शिक्षण घेतलं नव्हतं. अभिनय की गाणं मनात द्वंद्व चालू होतं.

ऐंशीच्या दशकामध्ये ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटात लकी अली यांनी एक गाणं गायलं होतं ‘नशा नशा’… हे गाणं त्या काळात चांगलं गाजलं होतं. पण लकी अलीला काहीतरी वेगळं करायचं होतं. पण नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे लोक सल्ला पण भरपूर देत होते. बासू चटर्जी यांनी लकीला तू अभिनय कर पण खलनायकाची भूमिका करू नका असे सांगितले. तर एका मोठ्या संगीतकाराने तर तू गायक बनू शकत नाहीस अभिनयावर लक्ष केंद्रित कर असा सल्ला दिला. मार्केटमध्ये मेहमूदचा मुलगा अशी जरी ओळख असली तरी लकी अलीला याचं कायम ओझं वाटत होतं. कारण कायम तुलना ही मेहमूद यांच्यासोबत होत होती.
लकी अली (Lucky Ali) गाणे गातच होता पण ब्रेक मिळत नव्हता. त्याच काळात लंडनहून एक म्युझिकल ग्रुप भारतात आला होता. त्यांनी लकीचे गाणे ऐकले आणि त्यांना लंडनला येण्याचे निमंत्रण दिले. लकी अली लंडनला गेले एका आफ्रिकन बँडसोबत त्यांचं बोलणं देखील झालं होतं. पण पुन्हा काहीतरी असे घडले की हात हलवत त्यांना परत यावे लागले. त्या काळात लकी अली यांचे लग्न देखील झाले होते. आता एक कुटुंबाची वेगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. लकीच्या पत्नीने त्यांना पुन्हा लंडनला पाठवले. आता मात्र सर्व योग चांगल्या पद्धतीने जुळून आले. ‘सुनो’ या अल्बमचे रेकॉर्डिंग लंडनला झाले. लकी अली यांचा आवाज वेगळा होता. या आवाजात एक मिठास होती. एक दर्द होता. अल्बम तर तयार झाला. लकी अली भारतात परत आले. पण कोणतीही म्युझिक कंपनी हा अल्बम विकत घ्यायला तयार नव्हते. जवळपास एक वर्ष हा अल्बम तसाच पडून राहिला. आता लकी अली यांचे टेन्शन वाढत होते.

अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल या कंपनीशी देखील बोलणे झालं. पण त्या वेळेला ती कंपनीच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांनी हा अल्बम स्वीकारला नकार दिला. सगळीकडून नकार घंटा येत होत्या. वडिलांकडून पैसा घ्यायचा नाही असं लकी अली (Lucky Ali) ने सुरुवातीलाच ठरवलं होतं. नंतर बीएमजी क्रिसेंडो या कंपनीने गाणी घ्यायचं ठरवलं याची. ऑडिओ सीडी तयार करण्यास कबूल केलं. पण यासोबत लागणारा व्हिडिओ मात्र तुमचा तुम्ही करा असे सांगितले. हा देखील एक खर्चाचा भाग होता. लकीने त्याचा लहानपणीचा मित्रासोबत कॉन्टॅक्ट केला.
ऍडव्हर्टायझिंग दुनियामध्ये त्याचे मोठे नाव होतं. त्यांनी ‘शाम सवेरे तेरी यादे आती है ओ सनम…’ या गाण्याचा व्हिडिओ करायच ठरवलं. या व्हिडिओमध्ये लकी अली आणि त्यांची पत्नी दोघेच घेतले. उद्देश पैसे वाचवणे हाच होता. कारण बजेट खूपच कमी होते. इजिप्तच्या पिरॅमिड परिसरात या अल्बमचे शूट झालं आणि हे गाणं रिलीज झालं. पहिल्या दिवसापासून या गाण्याला रसिकांनी प्रचंड मागणी दिली. नंतर हळूहळू सर्व गाण्याचे शूट झाले आणि हा अल्बम सुपर डुपर हिट झाला. ज्या अल्बमला करायला बरीच वर्ष लकी अलीला संघर्ष करावा लागला पण जेव्हा अल्बम लोकांसमोर आला तेव्हा लकी अली (Lucky Ali) स्टार बनला. नंतर तो सिनेमात देखील गाऊ लागला.
=============
हे देखील वाचा : Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
=============
हृतिक रोशनच्या पहिल्याच कहोना प्यार है या चित्रपटात लकी अली त्याचा स्वर बनला. इक पल का जीना या गाण्याने संपूर्ण भारतभर हा स्वर पोचला. यानंतर लकीने कधीच मागे पाहिलेच नाही. अनेक अल्बम आणि चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या समोर येत राहिला. न तुम जानो न हम (कहो ना प्यार है) सफरनामा (तलाश) आ भी जा आभी जा (सूर) गोरी तेरी आंखे…. लकी अली (Lucky Ali) ची ही गाणी आज देखील रसिकांना खूप आवडतात. या सर्व गाण्यांना नव्वद च्या दशकाचा फ्लेवर आहे. ‘सुनो’ या अल्बम मधील तुमच्या आवडीचं गाणं कुठलं ते नक्की सांगा.