Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Yaadein : जगातील पहिल्या एकपात्री चित्रपटाला ६१ वर्ष
सुनील दत्त (Sunil Dutt) च्या अनेक वैशिष्ट्यांतील एक उल्लेखनीय गोष्ट, चित्रपट निर्माता म्हणून प्रामुख्याने वेगळी वाट धरली. वेगळे धाडस केले.
रंगभूमीवर एकपात्री प्रयोग ही गोष्ट, त्यात कथाकथन, मग स्टॅन्ड अप शो, स्टॅन्ड अप काॅमेडी या गोष्टी अनेक वर्ष आहेत. संपूर्ण रंगमंचावर एकट्याने प्रयोग रंगवण्यात कौशल्य, कसब आहे. एकट्याने रसिकांना गुंतवून ठेवणे सोपे नाहीच. चित्रपट माध्यमात एकपात्री प्रयोग हेही आव्हानात्मक. संपूर्ण चित्रपटभर एकच कलाकार ही गोष्टच उत्सुकता वाढवणारी. सुनील दत्तनी ते आव्हान स्वीकारले आणि “यादें” (Yaadein) हा चित्रपट पडद्यावर आला आणि जगातील पहिला एकपात्री चित्रपट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अजंठा आर्ट्स निर्मित “यादें” या हिंदी चित्रपटाची नोंद झाली. या चित्रपटाची कथा Nargis Dutt यांची, पटकथा ओमकार साहेब यांचे तर संवाद Akhtar ul Iman यांचे. एकाच व्यक्तीरेखेभोवती चित्रपट लिहिणे खूपच आव्हानात्मक.

“यादें” (Yaadein) मुंबईत ५ फेब्रुवारी १९६४ रोजी प्रदर्शित झाला. (याची जाहिरात माझ्या कलेक्शनमध्ये आहे) म्हणजेच जगातील पहिल्या एकपात्री चित्रपटाला एकसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत हा चित्रपट मराठा मंदिर चित्रपटगृह ( मुंबई सेन्ट्रल), चित्रा टाॅकीज (दादर), नवरंग (अंधेरी) आणि काही मोजक्याच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. मात्र समिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेल्या या चित्रपटाचे रसिकांनी मात्र फारसे स्वागत केले नाही. कदाचित चित्रपट माध्यमातील एकपात्री प्रयोग ही कल्पना तात्कालिक चित्रपट रसिकांनी रुचली नसावी. खरं तर हा काळाच्या खूपच पुढचा प्रयत्न होता. पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटाच्या चौकटीपेक्षा हे काही वेगळे होते. पण त्याच्या स्वागतासाठीच्या वातावरण निर्मितीत काही कमतरता राहिली असावी.
या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक आणि एकमेव कलाकार सुनील दत्त आहे. अवघ्या अकरा रिळांच्या या कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाची सुरुवात अतिशय नाट्यमय आहे. दिवे बंद असलेल्या एका काळोखातील घरातील दूरध्वनी वारंवार वाजतोय पण तो लॅण्डलाईन फोन कोणी उचलत नाहीत. आपल्या चावीने अरुण (सुनील दत्त) दरवाजा उघडून विचारतो, घरात कोणी आहे की नाही? मी सारखा दूरध्वनीवर संपर्क साधतोय पण कोणीच कसा तो उचलत नाही…. पहिल्याच दृश्यापासून “यादें” (Yaadein) आपली उत्सुकता वाढवतो.

“यादें” (Yaadein) फर्स्ट रननंतर क्वचितच मॅटीनी शोला आला. अन्यथा तो कायमचाच चित्रपट इतिहासात गणला गेला. अशा वेगळ्या प्रवाहातील चित्रपटाची फ्लॅशबॅकमध्ये जात दखल घ्यायली हवी. या चित्रपटाची गीते आनंद बक्षी यांची असून संगीत Vasant desai यांची आहे. लता मंगेशकर यांनी गायलेली दोन गाणी बॅकग्राऊंडला आहेत. राधा तू है दीवानी आणि देखा है सपना कोई ही ती गाणी आहेत. चित्रपटात एका दृश्यात नर्गिस दत्त यांची सावली आपल्याला दिसते. सुनील दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत त्या आहेत.
या अतिशय वेगळ्या प्रवाहातील चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांनी परेल येथील कारदार स्टुडिओत घराचा सेट लावला होता (आज कारदार स्टुडिओचे अस्तित्व बसस्थानकावरील नावापुरते आहे.) सुनील दत्तचा भाऊ सोम दत्त या चित्रपटाचा सहनिर्माता होता. छायाचित्रणकार S. Ramachandra आहेत तर संकलन प्राण मेहरा यांचे.
==============
हे देखील वाचा : Amitabh Bachchan ची “सेकंड इनिंग” जास्त प्रभावी
==============
सुनील दत्त चित्रपट निर्माता म्हणून अतिशय कौतुकास्पद. सुनील दत्त व नर्गिस दत्त या दाम्पत्याने अजंठा आर्ट्स या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन सर्वप्रथम मौनी भट्टाचार्य दिग्दर्शित “मुझे जीने दो” (१९६३) या डाकूपटाची निर्मिती केली. डाकूमधील माणूसपण हे या चित्रपटाचे कथासूत्र. त्यानंतर सुनील दत्त यांनी निर्मितीबरोबरच दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकताच “यादें” (Yaadein) सारखा एकपात्री प्रयोग केला. ते करताना त्या काळातील अन्य चित्रपट निर्मिती संस्थेत आपले वेगळेपण अधोरेखित केले.
त्यानंतर अजंठा आर्ट्स या बॅनरखाली रेश्मा और शेरा (१९७१), डाकू और जवान (१९७८), राॅकी (१९८१), दर्द का रिश्ता (१९८२), यह आग कब बुझेगी (१९९१) या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन सुनील दत्त यांनी केली. अजंठा आर्ट्स याच बॅनरखाली ए. सुब्बाराव दिग्दर्शित “मन का मीत” (१९६९) या चित्रपटात सोम दत्त नायक, लीना चंदावरकर नायिका आणि विनोद खन्ना खलनायक हे तीन नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर आले. अजंठा आर्ट्सनेच राज खोसला दिग्दर्शित “नेहले पे देहला ” (१९७६) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सुनील दत्त, सायरा बानू व विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Bollywood tadka)

अजंठा हे दत्त कुटुंबियांचे पाली हिलवरील निवासस्थान. त्यात चित्रपट संकलन करण्यास एक जागा होती तसेच तळघरात एक प्रशस्त काही मोजक्या सीटसचे मिनी थिएटरदेखील होते. मी मिडियात आल्यावर या मिनी थिएटरमध्ये अनेक हिंदी चित्रपट पाहिले तसेच यह आग कब बुझेगी या चित्रपटाचा मुहूर्त याच अजंठा बंगल्यात अनुभवला. कालांतराने संजय दत्तने हा बंगला आणि मिनी थिएटरच्या जागी भव्य चकाचक इमारत उभारली…. (Untold stories)
अजंठा आर्ट्स काही वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांची “यादें” (Yaadein) देण्यात यशस्वी ठरलयं. आज चित्रपटांची (आणि त्यांच्या पूर्वप्रसिध्दीचीही) बजेट फार वाढलीत, तांत्रिकदृष्ट्याही प्रगती झालीय, व्हीव्हीएसचा वापर वाढलाय, त्यात काही वेगळा प्रयोगही अपेक्षित…
(जगातील हा पहिलाच एकपात्री चित्रपट “यादें” यू ट्यूबवर उपलब्ध आहे.)