
Sonali Bendre : ‘दिल ही दिल में’ ची २५ वर्ष; डिजिटल पिढीतील प्रेमाची गोष्ट
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट,
रुपेरी पडद्यावर नायक व नायिका प्रेमात पडले रे पडले की एका झाडामागे जात आणि कॅमेरा झाडाच्या वरच्या भागात जात आपल्याला दोन फुले एकमेकांच्या जवळ आलेली दिसत. प्रतिकात्मक असे ते प्रेम दृश्य असे. ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल काळातील चित्रपट प्रेमगीतांमधून अतिशय मोठ्याच प्रमाणावर प्रेमरस वाहत आला आहे. कथा, कादंबरी, कविता, नाटक या सगळ्यापेक्षा चित्रपटातून ( त्यातही हिंदी पिक्चर) प्रेम, इश्क, लव्ह हे भरपूर प्रमाणात येत राहिले. (Bollywood movies)

बदलत्या सामाजिक सांस्कृतिक काळानुसार त्यात बदलही होत गेले. राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ ( १९७३) त्यात ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’ असे अतिशय धाडसी वळण आणले, प्रेमिकांमधील संकोच बाजूला पडत गेला. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (१९९५) मध्ये विदेशात ( खास करुन युरोपमध्ये) राहणाऱ्या भारतीय युवक युवतीचे चकाचक प्रेम दिसले. आज तीस वर्षांनंतरही दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात डीडीएलजे मॅटीनी शोला दाखवला जातोय. प्रेमपट कधीच कालबाह्य होत नाहीत. ते कायमच चिरतरुण असतात. काळ बदलत बदलत डिजिटल युगापर्यंत आला. आज एका क्लिकवर जगभरातील माहिती व मनोरंजनाचे अफाट दालन आपल्यासमोर सज्ज होत आहे. त्यात तत्थ किती हेही जाणून घेण्यात हेही कोणाला जाणून घेण्यात रस नाही. .(Entertainment untold stories)
इंटरनेट युगात रुपेरी पडद्यावरील प्रेमपटातही काही नावीन्य यायला हवेच. ए. रतनम निर्मित व कातिर दिग्दर्शित ‘दिल ही दिल में’ या चित्रपटात ते दिसले. तेही चक्क पंचवीस वर्षांपूर्वी. हा मूळ तमिळ चित्रपट. Kadhalar Dhinam असे त्याचे नाव. १९९९ साली तमिळनाडूसह दक्षिणेकडील अन्य राज्यात प्रदर्शित झाला. तो हिंदीत आणताना काही भागांचे हिंदीत चित्रीकरण. तर बराचसा भाग हिंदीत डब आणि मग.मुंबईत तो २१ एप्रिल २००० रोजी प्रदर्शित झाला. त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखिल. आणि आज आपले एकूणच आयुष्य जणू डिजिटलच्या जाळ्यात सापडलेय. आभासी जगात वावरायची जणू सवय झालीय. आणि त्यात ऑनलाईन प्रेम जुळू तर लागलयं. लग्नही होताहेत. (Bollywood update)

या चित्रपटातही राजा ( कुणाल सिंग) व रोजा ( सोनाली बेन्द्रे) यांचीही ओळख इंटरनेटवरच होते. ती वाढत वाढत जाते. त्यांच्यात प्रेमाचे धागे विणले जातात. आता लाईक्स आणि काॅमेन्टस यापेक्षा पुढे जायचे ठरवतात आणि एकमेकांना आपले फोटो पाठवून मग प्रत्यक्षात भेटायचेही ठरवतात. गंमत म्हणजे दोघेही जण आपण विदेशात असतो असे एकमेकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगतात. प्रत्यक्षात ते चेन्नईतील एकाच महाविद्यालयात शिकत असतात. पहिल्याच भेटीत त्यांच्या ते लक्षात येते, तरी त्यांचा एकमेकांवरचा विश्वास व प्रेम कायम असते. पण हीच गोष्ट पुढे सरकताना दोघांचेही एकमेकांबद्दलचे गैरसमज होत होत जातात. चित्रपटाचा शेवट मात्र गोड. तमिळ भाषेतील चित्रपटात अखेरीस त्यांचे लग्न होते. दोन्ही चित्रपटात नासर, रंभा वगैरे कलाकार काॅमन. तर हिंदीत अनुपम खेर, जॉनी लिव्हर, राजू श्रेष्ठ असे काही. (Sonali bendre projects)
मेहबूब यांच्या गीतांना ए. आर. रहमान यांचे संगीत. त्या काळातील असे आणखीन काही तमिळ, तेलगू चित्रपट हिंदीत डब होऊन येताना मूळ चालीतील संगीतावर गाणी आली. रोजा, अंजली, बाॅम्बे, अप्पू राजा, हिंदुस्थानी असे अनेक मूळ तमिळ चित्रपट हिंदीत डब होऊन येताना त्यांची गाणीही आली. त्यातील बरीच गाणी लोकप्रियदेखिल झाली. ‘दिल ही दिल मेॅ’ची रोमॅन्टीक गाणी पाह्यला चांगली आहेत. पण आठवणीत राहणारी नाहीत. (Hindi iconic movies)

त्या काळात मुंबईतील चित्रपटसृष्टीत वावरत असतानाच अनेक कलाकार ( विशेषत: अभिनेत्री) दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटात काम करत. तिकडची कामाची शिस्त व पैसा या गोष्टींचे नेहमीच कौतुक असते. सोनाली बेन्द्रेनेही तमिळ भाषेतील चित्रपटात भूमिका साकारत आपले अनुभव विश्व समृद्ध केले. आणि असे चित्रपट हिंदीत डब होऊन येत असल्याने तर हिंदी चित्रपटांच्या रसिकांसमोर राहता येते. दक्षिणेकडील काही प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे मुंबई वा महाराष्ट्रात चित्रीकरण होत असते. म्हणजेच वातावरण ओळखीचे. (Bollywood tadaka)
========
हे देखील वाचा : Apne Rang Hazar : ‘अपने रंग हजार’ची ५० वर्ष; रंगत आली नाही हो….
========
‘दिल ही दिल में’ चित्रपटातील इंटरनेट प्रेमाची गोष्ट हे मात्र त्या काळात बरेच वेगळेपण ठरले. असे काही नवीन पाह्यला मिळाले तर बरे वाटते. आज डिजिटल युगानुसार प्रेमपट पाह्यला नक्कीच आवडतील. पण त्यात हम प्यार मे जलनेवालों को चैन कहा आराम कहा ( चित्रपट जेलर) सारखी ओढ नसेल नि आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे ( चित्रपट अनपढ) सारखी उत्कटता नसेल याचे मात्र दु:ख आहेच. एवढे आपण टेक्नोसॅव्ही झालो आहोत. अरेरे…रुपेरी पडद्यावरील राज कपूर, देव आनंद , दिलीपकुमार, राजेश खन्ना यांनी प्रेयसीवर भरभरुन केलेले प्रेम पाहतांनाच आपणही कोणाच्या तरी प्रेमात पडावे असे हमखास वाटे आणि नायिकाही त्याच प्रेमाच्या बरसातमध्ये सुखावत, तसे आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे असे युवतींना वाटे, ते खरे चित्रपटाचे दिवस. (Entertainment news)