Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

खय्याम यांचा ‘शागीर्द’ बनून रफी यांनी घेतले संगीताचे धडे!
कोणत्याही कलावंतांचे मोठेपण अधोरेखित होतं त्याच्या वर्तनातून. लोकप्रियतेच्या, यशाच्या कितीही बुलंदीवर पोहोचलं तरी त्याचे पाय जमिनीवर असतील तर तो खरा सच्चा कलावंत असतो. मोहम्मद रफी यांच्याबाबत नेहमी असंच म्हटलं जातं की ते खरे सच्चे कलावंत होते. खुदा का नेक बंदा. अस्सल कलावंत. यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर पोचले तरी त्यांनी स्वतःला कधीच श्रेष्ठ समजलं नाही. ते कायम स्वतःला विद्यार्थी समजत होते आणि संगीतकार मोठा असो किंवा छोटा त्याच्याकडून ते सर्व ज्ञान घेऊन गाणं गात असे. हा साधेपणा, सात्विकपणा हा दुसऱ्याला सन्मान करण्याची प्रवृत्ती आणि सतत शिकण्याचा ध्यास रफी यांच्या पवित्र स्वरातून कायम दिसून आला. त्यांचे व्यक्तिमत्व देखील असंच साधं आणि सोपं होतं.

आज 31 जुलै . मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी. 31 जुलै 1980 या दिवशी म. रफी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आज ४५ वर्ष पूर्ण होत आहेत. पण रफी यांच्या गाण्यांची जादू पुढची पाचशे वर्ष रसिकांवर राहील एवढं नक्की. इतकी अतुलनीय अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे. वयाची साठी व्हायच्या आतच त्यांना हे जग सोडून जावं लागलं पण इतक्या कमी कालावधीत देखील त्यांनी इतका मोठा संगीत खजिना रसिकांसाठी दिला आहे की तो कितीदा जरी ऐकला तरी रसिक तृप्त होत नाहीत.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
मोहम्मद रफी कायम आपल्या स्वराला कायम नैसर्गिक ताजं टवटवीत आणि गोड ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. पन्नास च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि साठच्या दशकाच्या प्रारंभी रफी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात टॉप वर होते. त्यांना हर प्रकारचे गाणे गावे लागायचे. भारतीय चित्रपट संगीताचं तंत्र देखील त्यावेळेला बदलत होते. उडत्या चालीची गाणी जास्त लोकप्रिय होत होती. रफी यांचा पिंड हा शास्त्रीय संगीतावर पोसलेला होता त्यांना प्रत्येक प्रकारचे गाणे गायला शक्य च होते त्यांच्या स्वराला कुठल्याही प्रकारचे गाणं वर्ज्य नव्हते. पण त्यांची मूळ आवड ही क्लासिकल बेस्ड गाण्याची असायची.
त्याबरोबरच आपल्या गाण्यातील नैसर्गिक गोडवा मेलडी असावी असं त्यांना कायम वाटायचं. उडच्या चालीच्या गाण्यातून तो नैसर्गिक सूर हरवत चालला आहे असं देखील त्यांना वाटायचं. यासाठी त्यांनी खूप विचार केला आणि आपल्या गाण्याला पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला प्रॉपर कुठल्यातरी संगीतकाराकडून शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घ्यावं लागेल अशी त्यांना जाणीव झाली. आणि त्यांच्या डोळ्यापुढे नाव आलं संगीतकार खय्याम यांचे!
एकदा त्यांनी खय्याम आणि त्यांच्या पत्नीला आपल्या घरी जेवायला बोलावलं पण त्यांच्यापुढे हा विषय काढायचा कसा कारण त्यावेळी खय्याम देखील खूप बिझी संगीतकार होते. त्यामुळे या बैठकीत ते काही बोलू शकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांनी खय्याम यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं. म. रफी यांना कळालं नाही हे आपल्याला असं वारंवार का जेवायला बोलावत आहेत? जेवण झाल्यानंतर त्यांनी विचारलं “ रफी मियां आप बार बार हमे हमे दावत पे क्यू बुलाते हो?” या वेळी रफी यांचे भाऊ हमीदभाई देखील उपस्थित होते.

तेच पुढाकार घेऊन म्हणाले,” खय्याम साहेब, रफी यांना आपला स्वर सध्या उडत्या चालीसाठी जास्त वापरला जात आहे असे वाटते आहे. आणि त्यामुळे त्यातील मूळचा गोडवा हरवत चालला आहे असं वाटतं. त्यामुळे आपल्या स्वराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांना तुमच्या सारख्या गुरुची आणि शास्त्रोक्त शिक्षणाची गरज आहे. असं त्यांना वाटतं. म्हणून ते तुम्हाला बोलवतात. मागच्या भेटीतच ते सांगणार होते पण त्यांना संकोच वाटला. तुम्ही त्यांच्या गळ्यावर मेहनत घ्या आणि त्यांना पुन्हा एकदा गोड गळ्याने गायला शिकवा!”
खय्याम साहेब रफी कडे पाहून हसले आणि म्हणाले,” नक्की. पण यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण अशक्य काहीच नाही. पण या साठी माझ्या तीन अटी आहेत. पहिली अट म्हणजे तुम्हाला हे विसरून जावं लागेल की तुम्ही सध्या इतके मोठे गायक आहात. दुसरी अट माझ्यासोबत रियाज करताना फक्त आणि फक्त तुम्हीच पाहिजे. दुसरं कोणी मला नको. आणि तिसरी महत्वाची अट म्हणजे या संपूर्ण काळात तुम्ही हा विषय इतर कुणाशीही बोलायचा नाही कुणाला फोनवर देखील सांगायचं नाही. तुमचे संपूर्ण लक्ष शिक्षणावर असेल. मी मेहनत घ्यायला तयार आहे.
या अटी मान्य असतील आणि कठोर मेहनत घ्यायची इच्छा असेल तरच आपण कामाला सुरुवात करू.” रफी यांनी अटी मान्य केल्या आणि पुढच्या आठवड्यापासून रोज संध्याकाळी रफी खय्याम यांच्या घरी जाऊ लागले आणि शास्त्रोक्त संगीताचा रियाज करू लागले. रफी यांच्या स्वराला व्यावसायिक गाणी गाऊन त्यातील नैसर्गिक शास्त्रोक्त गायकीचा गोडवा हरवला होता त्यावर अभ्यासाने आणि अखंड रियाजाने पुन्हा तो आणण्याचा प्रयत्न सुरु झाला. रफी आता गुरु खाय्यान यांचे शागीर्द बनले होते. अखंड मेहनती नंतर मेहनत रंग लायी!
यानंतर खय्याम यांनी रफी यांना घेऊन एक गैर फिल्मी अल्बम तयार केला. यामध्ये मधुकर राजस्थानी या गीतकाराने लिहिलेलं ‘तेरे भरोसे नंदलाल’ हे पहाडी रागावरचं भजन गाऊन घेतलं . याच रेकॉर्डमध्ये एक गझल देखील होती. दाग दह्लवी यांनी लिहिलेली हि गजल होती ‘गजब किया तेरे वादे पे इकरार किया’ (राग : रागेश्री) या भजन आणि गजल ने रफी यांच्या स्वराचा कम्प्लीट मेक ओव्हर झालेला दिसला. रफी यांनी खय्याम यांचे आभार मानले. रफी यांना त्यांचा जुना स्वर पुन्हा मिंळाला होता. रफी आणि खय्याम दोघेही खूष होते. या रेकॉर्ड ला खूप लोकप्रियता मिळाली. नंतर ही गाणी रफीच्या अन्य गैरफीने अल्बम मध्ये देखील आली.
================================
हे देखील वाचा: अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
=================================
आज देखील जुन्या ध्वनीमुद्रक संग्रहाकाकडे ही गाणी आणि ही रेकॉर्ड आपल्याला अवश्य दिसते. खरं तर साठच्या दशकामध्ये टॉपचा गायक असताना रफी यांनी पुन्हा विद्यार्थी होऊन खय्याम यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि आपल्या आवाजाला पुन्हा नवी झळाळी प्राप्त करून घेतली. हा रफीचा ग्रेट नेस होता. आज एक गाणे गाऊन स्वत:ला तानसेन समजणारे अनेक आहेत तिथे रफी यांचे मोठेपण अधोरेखित होते. आज रफी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा एक वेगळा किस्सा. रफी यांच्या ‘तेरे भरोसे नंदलाल…’ या भजनाची लिंक मी खाली देत आहे तुम्ही नक्की ऐका खूप गोड आहे.
https://youtu.be/PcvMijlIDnw?si=Xjhkstna3IH__AOH (तेरे भरोसे नंदलाल या भजनाची लिंक)