
Amjad Khan यांचा डॅशिंग व्हिलन असलेला ‘इन्कार’ हा सिनेमा आठवतो का?
१५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या चित्रपटानंतर हिंदी सिनेमाची सर्व गणितं च बदलून गेली. ॲक्शन पॅक चित्रपटांची लाट सुरु झाली. अमजद खान याने रंगवलेल्या लार्जर दॅन लाईफ भूमिकेने चित्रपटातील खलनायकाची व्यक्तिरेखा यापुढे प्रत्येक चित्रपटातच विस्ताराने दाखवली जाऊ लागली. अमजद खान याने यानंतर भरपूर चित्रपटात व्हिलन रंगवला. या काळातील त्याची एक भूमिका ज्याची तशी फारशी चर्चा होत नाही पण खरोखरच ग्रेट होती. हा चित्रपट होता १९७७ साली प्रदर्शित झालेला ‘इन्कार’. या सिनेमात त्याने रंगवलेला डॅशिंग व्हिलन राज अतिशय जबरदस्त असा होता.

हा सिनेमा टेरिफिक ॲक्शन पॅक आणि फुल ड्रामा असलेला होता. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातील थरार संपूर्ण सिनेमात दिसून येत होता. इतका खूंखार व्हिलन ज्याच्या भूमिकेचं सावट पूर्ण सिनेमात दिसतं. अमजद खानने हा क्रूरकर्मा खलनायक जबरदस्त रंगवला होता. मुळात हा सिनेमा जपानच्या आकीरा कुरासिवा यांच्या १९६३ साली प्रदर्शित झालेल्या High and Low चा रिमेक होता. हा जपानी चित्रपट अमेरिकन लेखक Ed McBain यांनी १९५९ लिहिलेल्या आणि अफाट गाजलेल्या King’s Ransom या कादंबरीवर आधारीत होता. ‘इन्कार’ हा चित्रपट रोमु सिप्पी यांनी निर्मित केला होता तर या सिनेमाचे दिग्दर्शन राज एन सिप्पी यांनी केले होते. त्यांचा दिग्दर्शनातील हा पहिलाच सिनेमा होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी जबरदस्त यश कमावले होते. या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू, विनोद खन्ना, साधू मेहेर, विद्या सिंन्हा आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाच्या कथानकाला नैसर्गिक वेग होता, घटना भयंकर फास्ट घडत होत्या. सूड नाट्य चांगले रंगले होते.

चित्रपटाच्या कथानकात गर्भश्रीमंत उद्योगपती श्रीराम लागू यांच्या मुलाचे अपहरण होते आणि खंडणीसाठी कॉल येऊ लागतात. नंतर असे कळते की अपहरण डॉक्टर श्रीराम लागू यांच्या मुलाचे झाले नसून त्यांच्या नोकराच्या मुलाचे झाले आहे. तरी श्रीराम लागू त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी सीआयडी इन्स्पेक्टर अमर विनोद खन्ना यांच्याकडे हि केस येते. विनोद खन्नाचे आणि डॉक्टर लागू यांच्या बहिणीचे विद्या सिन्हा यांचा परिचय असतो पण त्यांच्या नात्यात काही कटूता आलेली असते पण या प्रकरणा नंतर ते पुन्हा जवळ येतात आणि मग सुरू होतो गुन्हेगारांचा पाठलाग.
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : हसवाफसवी आणि डॉ. लागूंचं ‘ते’ पत्र!
================================
अपहरण झालेल्या मुलाची सुटका हा थरार इतका जबरदस्त घेतला होता की आपण कुठलीतरी हॉलीवुड मूवी पाहतो आहेत असेच सत्तरच्या दशकातील लोकांना वाटतं. अमजद खान याने रंगवलेला खूंखार राज आणि त्याचे भेदक डोळे पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात देखील भीती निर्माण करतात. विनोद खन्ना त्याचा पाठलाग करत असताना हाताने भिंतीवरचे बल्ब फोडत जाणार त्याचा आवेश जबरदस्त होता. क्रूरकर्मा व्हिलन अमजद खानने फार ताकतीने या चित्रपटात रंगवला होता. चित्रपटाचा अपेक्षित शेवट प्रेक्षकांना माहीत असला तरी हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो ते राज सिप्पी यांच्या दिग्दर्शन कौशल्याने.

विनोद खन्नाचा डॅशिंग इन्स्पेक्टर अमर जबरदस्त होता. हँडसम विनोद खन्ना आणि लाजरी विद्या सिन्हा यांची केमिस्ट्री खूप जमून आली होती. या सिनेमाच्या शूट च्या वेळी दोघांच्या अफेअर ची चर्चा होत होती. चित्रपट ॲक्शन पॅक असला तरी यात तीन गाणी होती जी आज देखील लोकप्रिय आहे. आजही हा चित्रपट त्याच्यातील ॲक्शन पेक्षा आठवला जातो हेलन वर चित्रित असलेल्या आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मुंगडा मुंगडा मै गुड की दली….’ या दारू च्या अड्ड्यावरील गाण्यासाठी. हे गाणं म्हणजे त्या वर्षीचं ब्लॉकबस्टर. आज देखील या गाण्याला प्रचंड मागणी आहे. या गाण्यावर हेलन ने केलेला दिलखेचक केलेला डान्स अफलातून होता. उषा मंगेशकर यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे गाणं असावं.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
मागची पन्नास वर्ष हे गाणे सर्व सार्वजनिक उत्सवातील हाय लाईट असते. ‘अंदर बाहर’ , ‘ टोटल धमाल ‘ या सिनेमात देखील या गाण्याचा समावेश झाला होता. याचे रिमिक्स आणि रील आजही बनली जातात. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं ‘छोडो ये निगाहों का इशारा..’ आहे हे गाणं मस्त जमून आले होते. देखणा विनोद खन्ना यात जबरदस्त किलिंग लूक देतो. या सिनेमात राकेश रोशन गेस्ट अपिअरन्स म्हणून एका गाण्यात दिसतो. हे गाणं देखील खूप छान होतं. ‘दिल की कली युही सदा सजती रहे बगिया तुम्हारी महकते रहे..’ हे रफी यांनी हे गाणे गायले होते. चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत राजेश रोशन यांचं होतं. १९७७ साली ॲक्शन सिनेमाची रांगच लागली होती. त्यात ‘इन्कार’ देखील होता. ११ नोव्हेंबर १९७७ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे बजेट एक कोटी वीस लाख होते आणि या सिनेमाने चार कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. दुर्दैवाने या सिनेमाचे प्रमोशन नीट झाले नाही नसता हा सिनेमा आणखी बंपर हिट ठरला असता!