Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Bollywood Gossips : घटस्फोट हाच मार्ग? वेगळेही राहता येते….
हा मजकूर मी लिहून तो तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या मनोरंजन क्षेत्रात आणखीन एक दाम्पत्य एकमेकांपासून वेगळे होत त्यांनी आपल्या घटस्फोटाची पोस्ट तर टाकली नसेल ना अशी भीती वाटतेय. कोणी सतरा वर्षांचा तर कोणी पाच वर्षांचा संसार मोडतेय, इतकं सोपे असते का संसार मोडणे? मुळात संसार मुरायला काही काळ जातो आणि त्यातूनच तो अधिकाधिक प्रमाणात घट्ट होत जातो. संसार म्हणजे फास्ट फूड नाही की मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना नाही. मुळात पती पत्नी नात्यातील गरजा व गंमत जसजशी वाढत वाढत जाते त्यातूनच ते एकरुप होतात. पण मनोरंजन क्षेत्रात बहुतेक एका चित्रपटाचे म्हणा वा मालिकेचे म्हणा, चित्रीकरण संपल्यावर कलाकार त्यातून बाहेर पडतो तोच अलिखित नियम काहीजण संसाराला लावताहेत की काय?(Bollywood couple divorce news)
या सगळ्याची सोशल मिडियातून माहिती देणे म्हणजे तुम्ही खाजगी आयुष्यात इतरांना डोकावायची संधी देत आहात. आणि सोशल मिडियात देश विदेशातून कोणीही, कशीही व कधीही बरी वाईट प्रतिक्रिया देवू शकतोय. कधी त्या फार वाह्यात वा गचाळही असू शकतात. आणि त्या पचवायची तयारी हवी. एकूणच ज्या पध्दतीने मनोरंजन क्षेत्रातील संसार मोडताहेत त्यावरुन या क्षेत्रातील कलाकारांशी बाहेरच्या जगातील कोणी लग्न करेल का असा प्रश्नच आहे. बाहेरच्या जगातही ‘वेगळे व्हायचयं आम्हास’ याचे प्रयोग वाढताहेत पण त्यात अजूनही ती खाजगी बाबच राहिलीय.

पूर्वीचे फिल्मवाले जास्त समंजस होते म्हणापचे. त्यांच्याही घनघोर भांडणे होत, मोठ्याच प्रमाणावर इगो प्रॉब्लॅम होत. गॉसिप्स मॅगझिनमधून त्यांच्यावर काय काय वाट्टेल ते प्रसिद्ध होई. इंग्लिशमधील त्या भानगडी मग हिंदी व प्रादेशिक भाषेतील मुद्रित माध्यमातून रंगवून रंगवून प्रसिद्ध होत. पण पती व पत्नी हे नाते कायम ठेवून ते वेगळे राहत.
====================================
हे देखील वाचा : Famous Studio आता पडद्याआड चालला!
====================================
राजेश खन्ना व डिंपल एक उत्तम उदाहरण. या सुपर स्टार व बॉबी गर्लचे लग्न हीच धक्कादायक गोष्ट होती. डिंपलसाठी हे नाते सोपे नव्हतेच. दोन मुलींचा जन्म झाल्यावर खरं तर राजेश डिंपलच्या संसारात स्थिरता यायला हवी होती. पण राजेश खन्नाचा पडता काळ यात विघ्न आणणारा ठरला. डिंपलने राज कपूरकडे शब्द टाकून राजेशला आर. के. फिल्म बॅनरचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट मिळवून दिला पण घरात दोन हिरो (शशी कपूर व ऋषि कपूर) असताना बाहेरचा हिरो कशाला? अशी शम्मी कपूरने ओरड करताच राज कपूरने राजेश खन्नाच्या जागी शशी कपूरला घेतले. काही वर्षातच राजेश व डिंपलमधील आशीर्वाद बंगल्यातील भांडणे गॉसिप्स मॅगझिनमधून येत राहिली आणि एके दिवशी डिंपल आपल्या दोन्ही मुलींना (ट्विंकल व रिंकी) घेऊन आपले पिता चुन्नीलाल कापडिया यांच्या समुद्र महल बंगल्यात राहायला गेली आणि तिने दुसरे पाऊल चित्रपटसृष्टीत टाकून ‘बॉबी’ नंतर दशकभराने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. (Entertainment News)

राजेश खन्ना व डिंपल वेगळे राहू लागले पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. काही वर्षातच ते राजेश खन्ना निर्मित व एस. व्ही. चंद्रशेखर दिग्दर्शित ‘जय शिव शंकर’ या चित्रपटात एकत्र आले. मला आठवतंय गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील देवळातील या चित्रपटाच्या मुहूर्ताला आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित केले असता हे दोघेही उत्तम व्यावसायिक समजदारी सांभाळून वावरले. खूप कालांतराने राजेश खन्नाच्या आजारपणात डिंपल त्याच्या सेवेत व सोबत होती. हेच जर ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले असते तर?
गुलजार व राखी या पती व पत्नी नात्यातही तेच दिसते. यांचाही विवाह १९७३ सालीच झाला. गुलजार साहित्यिक व सिनेमावाले देखील. राखी आघाडीची अभिनेत्री होती. देव आनंद व शशी कपूर यांच्यासोबत तिची रुपेरी जोडी छान जमली व शोभली. अमिताभ बच्चनची ती नायिका (जुर्माना वगैरे) व आई (चित्रपट शक्ती) अशीही भूमिका साकारली. बोस्की या मुलीला जन्म दिल्यावर गुलजार व राखी यांनी वांद्र्यातील पाली हिलवर बोस्कियाना हा बंगलाही बांधला. पण संसारात रमतानाच राखीला पुन्हा चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमरस क्षेत्रात यावेसे वाटले. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ‘कभी कभी’ मध्ये तिला संधी दिली देखिल.

संसारातील वाद विवाद आणखीन वाढू लागल्यावर हे दोघे स्वतंत्र राहू लागले. राखीने सांताक्रूझ येथील मुक्तांगण येथे राहणे पसंत केले. पनवेल जवळील तारा गावाजवळ तिने एक फार्महाऊसही घेतले. मात्र दोघांचाही बोस्कीवर प्रचंड माया. मला आठवतय बोस्की दिग्दर्शित ‘फिलहाल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळेस उशीरा आल्याने राखी चौथ्या रांगेत बसली. हे गुलजार यांना समजताच ते राखीजवळ आले आणि तिला अतिशय आग्रहाने पहिल्या रांगेत बसवले. राखी मध्यंतरी बरीच वर्ष आपल्या फार्महाऊसवर राहत होती आणि गुलजार व बोस्की अधूनमधून तिला भेटायला जात. दुर्दैवाने त्यांच्यात घटस्फोट झाला असता तर हे शक्य झाले असते काय?(Bollywood retro news)
================================
हे देखील वाचा : Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
=================================
संसारातील भांडणे, धुसफूस, तणाव, राग या गोष्टी काळाच्या ओघात ओसरतात, पातळ होत जातात. आणि पुन्हा मूळ नाते जोडले जाते. आयुष्याच्या साठीनंतर हीच एकमेकांना चिकटलेली साथ उपयोगी पडले. कारकिर्द भन्नाट वेगात असताना भरपूर पैसा कमावला, हॉटेल सुरु केले (सध्या कलाकारांच्या मालकीची हॉटेल ही बहुचर्चित गोष्ट झाली आहे. पैसा कशात गुंतवायचा याचे हे उत्तम उदाहरण.) नवीन छंद जोपासले. कामे कमी केल्यावर देश विदेशातील भटकंती वाढवली म्हणजेच एकटेपण जाणवत नाही ही गोष्ट समज व गैरसमज यांच्यातील न सुटणारा गुंता आहे. त्यापेक्षा उतारवयात पती व पत्नीचे एकरुप झालेले नाते असेल तर बहोत खूब. कदाचित अल्पकालीन संसार गाथेत हे मिसफिट वाटत असेलही.