Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

कल्ट क्लासिक मुव्ही : Mera Gaon Mera Desh
‘शोले’ या 1975 साली प्रदर्शित चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वात मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे. या चित्रपटावर अनेक पाश्चात्त्य सिनेमांचा प्रभाव होता. त्याचा वेळोवेळी उल्लेख केला जातोच. पण एका भारतीय चित्रपटाचा देखील शोले वर निश्चितच प्रभाव होता आणि हा चित्रपट होता 1971 साली प्रदर्शित झालेला ‘मेरा गाव मेरा देश’! राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 25 जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या मेकिंगची कहाणी आपल्या वाचकांना निश्चितच आवडेल. या चित्रपटात धर्मेंद्र, विनोद खन्ना, आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. डाकूच्या जीवनावर आधारित हा सिनेमा ॲक्शन आणि ड्रामा च्या बाबतीत टेरिफिक असा होता.

भारतामध्ये साठच्या दशकात डाकू पटाची सुरुवात झाली.1961 साली दिलीपकुमार चा गंगा जमुना आला. यात दिलीप ने गंगा डाकू साकारला होता. आर के फिल्म चा ‘ जिस देश मे गंगा बहती है’ हा सिनेमा डाकू पटच होता यात प्राण ने राका डाकू साकारला होता.अजंता आर्ट्स च्या सुनील दत्त च्या ‘मुझे जीने दो’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. चंबळच्या खोर्यातील डाकूंनी भारतामध्ये मोठा धुमाकूळ घातला होता या दरोडेखोरांच्या अनेक सुरस कथांनी समाज मन व्यापले होते. या कथांच्या वर अनेक सिनेमे तयार होत होते.मराठी सिनेमा देखील याला अपवाद नव्हता. ‘मेरा गाव मेरा देश’ हा सिनेमा देखील याच पठडीतला असला तरी त्यातील क्रौर्य, भयानकता आणि परिणामकारकता जबरदस्त होती!
या सिनेमाच्या मेकिंग ची कहाणी देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. दिग्दर्शक राज खोसला यांनी 1970 चाली ‘दो रास्ते’ हा एक कौटुंबिक चित्रपट बनवला होता. यानंतर त्यांच्या डोक्यात ॲक्शन मुव्ही बनवायचे होते. त्यातूनच या चित्रपटाची कल्पना पुढे आली. या सिनेमाची पटकथा ग रा कामत यांनी लिहिली होती. तर त्यातील चमकदार संवाद अख्तर रोमानी यांनी लिहिले होते. अभिनेता विनोद खन्ना हा त्या काळात खलनायक म्हणूनच काम करीत होता. 1969 साली आलेल्या ‘मन का मीत’ या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर प्रवेश केला होता.

सुरवातीचे काही काळ त्याने खलनायक रंगवत असतानाच 1971 सालीच गुलजार यांनी त्याला ‘मेरे अपने’ या चित्रपटात मुख्य भूमिका दिली होती. तेव्हा पासून त्याच्या अभिनयाकडे रसिकांचे लक्ष गेले. त्याने ‘मेरा गाव मेरा देश’ मध्ये रंगवलेला डाकू जब्बार सिंग हा भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत खलनायकाच्या मांदियाळीत उठून दिसावा अशी ही जबरा व्यक्तिरेखा होती. अतिशय प्रभावी पद्धतीने विनोद खन्ना ने ती साकारली होती. त्यातील त्याचा अटायर जबरदस्त होता. पांढरे धोतर ,काळा शर्ट ,खांद्याला लटकवलेली मोठी रायफल, कपाळावर काळा टिळा, अक्कडबाज मिशा, लांब कल्ले, लाल तर्राट भेदक नजर, चेहऱ्यावर अतिशय क्रुद्ध भाव, चावत चावत एकेक शब्द फेकण्याची अदा आणि सुसाट वेगाने घोड्यावरुन येताना काळजात धडकी भरवणारा अंदाज! सिम्पली ग्रेट. त्या वेळी खलनायकासाठी कुठलेही अवार्ड नसायचे नाहीतर ते नक्कीच विनोद खन्ना ला मिळाले असते.
सिनेमातील नायकाच्या भूमिका धर्मेंद्रने मोठ्या ताकदीने निभावली होती. यात धर्मेंद्र एक अनाथ तरूण असतो आणि तो भुरट्या चोऱ्या करत असतो एका चोरीच्या प्रकरणात त्याला अटक होते आणि त्याला शिक्षा भोगून झाल्यानंतर एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून(जयंत) बोलावणे येते. (अभिनेता जयंत म्हणजे शोले तील गब्बर सिंग ची भूमिका करणाऱ्या अमजद खान चा बाप) जयंत धर्मेंद्र ला आपल्या गावात ठेवून घेतो आणि आपल्या मुला प्रमाणे त्याचा सांभाळ करू लागतो. या गावाला डाकू जब्बार सिंगने प्रचंड त्रास दिलेला असतो. गावातील अनेकांची हत्या केलेली असते. अनेकदा गावाची लूट केलेली असते. या जब्बार सिंगच्या विरुद्ध धर्मेंद्र उभा राहतो त्याला गावकऱ्यांची साथ मिळते आणि मग तो जबरदस्त मुकाबला सुरू होतो.
या चित्रपटात ‘लक्ष्मी छाया’ या अभिनेत्रीने अप्रतिम भूमिका केली आहे. गंमत म्हणजे नायिका आशा पारेख पेक्षा जास्त गाणी लक्ष्मी छाया ला मिळाली आहेत! लक्ष्मी छाया चित्रपट यापूर्वी ब्लफ मास्तर , गुमनाम, तीसरी मंजिल या सिनेमातून रसिकांच्या पुढे आली होती. पण ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटात तिला पहिल्यांदाच अशी फुल लेन्थ भूमिका मिळाली होती. ‘मार दिया जाये या छोड दिया जाये’, ‘आया आया अटरिया पे कोई चोर’, हाय शरमाऊ किस किस को बताउ अपनी प्रेम कहानिया..’ हि लताच्या स्वरातील तब्बल तीन गाणी लक्ष्मी छाया वर चित्रीत होती.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
या चित्रपटात रफी आणि लता च्या स्वरात एक युगलगीत होते जे धर्मेंद्र आणि आशा पारेख वर चित्रित झाले होत ‘कुछ कहता है ये सावन क्या कहता है’ तसेच आशा पारेख च्या वाट्याला ‘सोना ले जा रे चांदी लेजा रे’ हे गाणे आले होते. चित्रपटातील सर्व गाणी आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती तर त्याला संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते. या चित्रपटात मास्टर भगवान, असित सेन, बिरबल, मोहन चोटी यांनी छोट्या छोट्या विनोदी भूमिका करून मजा आली होती. या चित्रपटात पूर्णिमा वर्मा हिने एका वेड लागलेल्या स्त्रीची अतिशय सुंदर भूमिका केली होती. ही पूर्णीमा वर्मा म्हणजे दिग्दर्शक महेश भट ची मावशी होती. महेश भट देखील या चित्रपटाचे निगडीत होते आणि ते राज खोसलाचे सहाय्यक म्हणून काम करीत होते.
संपूर्ण चित्रपटात डाकू ची दहशत, त्याचा मुजोरपणा, संपूर्ण गावावर असलेल्या जब्बार सिंगच्या भीतीची छाया दिग्दर्शकाने जबरदस्त रीतीने दाखवली आहे. या सिनेमाचे छायाचित्रण प्रताप सिन्हा तर संकलन वामन भोंसले यांनी केले होते. या चित्रपटांचे चित्रीकरण उदयपूर जिल्ह्यातील चिवुरा या गावी झाले होते. या गावातील गावकऱ्यांना देखील चित्रीकरणासाठी मोठी साथ दिली होती. राजस्थानातील निसर्गरम्य परिसरातील या सिनेमाने प्रेक्षकांचे डोळे सुखावले. चित्रपट 1971 सालच्या सुपरहिट सिनेमाच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर होता. पहिला क्रमांक राजेश खन्नाच्या ‘हाथी मेरे साथी’ चा होता तर तिसरा क्रमांक राजेश खन्ना च्या ‘दुश्मन’ या चित्रपटाचा होता. या वर्षी आनंद ,मेहबूब की मेहंदी, कटी पतंग, मर्यादा, अंदाज, कांरवा हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले होते. ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटाचे बजेट एक कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जवळपास तीन कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. देश आणि परदेशात या चित्रपटाने सहा कोट्यवधी रुपये कमावले होते.

दिग्दर्शक राज खोसला हे गुरुदत्त यांच्या तालमीत तयार झालेले दिग्दर्शक होते. सीआयडी काला पानी, वह कौन थी, मेरा साया हे त्यांचे गाजलेले सिनेमे! मेरा गाव मेरा देश या चित्रपटाच्या यशाने त्यांनी 1973 साल की आणखी एक डाकूपट बनवला होता ‘कच्चे धागे’ या चित्रपटात देखील विनोद खन्ना होता. धर्मेंद्र देखील या डाकूपटाच्या प्रभावाने प्रेरित होऊन पुढे समाधी, पत्थर और पायल आणि ‘शोले’ या डाकू पटातून भूमिका करू लागला.
‘शोले’ या चित्रपटावर पूर्वी म्हटल्या प्रमाणे ‘ मेरा गाव मेरा देश’ चा मोठा प्रभाव होता. या दोन्ही चित्रपटातील साम्य स्थळे पहा.दोन्ही तील नायक हा चोर असतो.दोन्ही कडे जेल मधून बाहेर आल्यावर निवृत्त पोलीस अधिकारी/ लष्करी अधिकारी त्यांना आपल्या सोबत ठेवून घेतात. डाकू सोबत मुकाबला करण्यासाठी त्यांना लढायला सज्ज करतात. महत्वाचे निर्णय दोन्हीकडे नायक नाणेफेक करून घेत असतो. या चित्रपटात लष्करी अधिकाऱ्याचा एक हात तुटलेला दाखवला आहे तर शोले त ठाकूर (संजीव कुमार) चे दोन्ही हात गायब! शोले प्रमाणेच या चित्रपटाचा नायक हा गावच्या गोरीच्या प्रेमात पडतो. एवढेच नाही तर खलनायकाचे नावे देखील थोडीफार सारखी अशीच आहेत. ‘मेरा गाव मेरा देश’ मधील खलनायकाच्या नाव आहे डाकू जब्बार सिंग तर शोले तील खलनायक आहे डाकू गब्बरसिंग!
धर्मेंद्र- आशा पारेख साठच्या दशकातील हिट पेयर होती. आये दिन बहार के, आया सावन झुमके , शिकार हे त्यांचे यापूर्वीचे गाजलेले सिनेमे होते.इंडियन आयडॉल च्या एका सिझनला हे दोघे उपस्थित होते त्या वेळी त्यानी या सिनेमाच्या अनेक आठवणी जागवल्या होत्या. आशा पारेख चा रुपेरी पडद्यावरील प्रवास हा धर्मेंद्रच्या एक वर्ष आधी सुरु झाला होता. सुबोध मुखर्जी यांच्या ‘दिल देके देखो’ या 1959 सालच्या चित्रपटापासून आशा पारेख रुपेरी पडद्यावर आली, तर अर्जुन हिंगोरानी दिग्दर्शित 1960 सालच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमापासून धर्मेंद्र रुपेरी पडद्यावर आला. या सिनेमाला कुठलीही पारितोषिक मिळाले नाहीत फक्त फिल्मफेअर चे सर्वोत्कृष्ट नायकाचे नामांकन धर्मेंद्र यांना मिळाले होते परंतु हे पारितोषिक राजेश खन्ना ला आनंद चित्रपटासाठी मिळाले.
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
आज ‘मेरा गाव मेरा देश’ कल्ट क्लासिक मुव्ही बनली आहे. यातील मुख्य नायक नायिकेचा अपवाद वगळता बाकी पडद्यावरचे आणि पडद्यामागचे अनेक कलाकार आता या दुनियेत नाहीत. पण रसिक मात्र या सिनेमाला अजून विसरलेले नाहीत. ‘शोले’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाला देखील या सिनेमाची प्रेरणा होती हे नव्या पिढीला कळावे आणि या सिनेमाचा सुवर्ण महोत्सवा ची आठवण करून द्यावी त्या करीता हा लेखप्रपंच. हा सिनेमा यु ट्यूब वर उपलब्ध आहे.