‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

मीठ भाकर ते Vadapav चित्रपटाच्या नावात खाद्य पदार्थांची परंपरा पाऊणशे वर्षांची…
नाव ही चित्रपटाची पहिली ओळख. ते फारच विचारपूर्वक ठेवणं केव्हाही चांगले. कारण एकदा ठेवल़ेले नाव त्याची कायमस्वरुपी ओळख असते. रसिकांच्या पिढ्या बदलल्या तरी ते नाव त्या चित्रपटाची ओळख असते. याच चित्रपटाच्या नावात एक प्रकार खाद्य पदार्थाचे नाव चित्रपटाला देणं. विशेष उल्लेखनीय गोष्ट, अशा नावांचीही बरीच मोठी वैशिष्ट्यपूर्ण पाऊणशे वर्षांची परंपरा आहे.

भालजी पेंढारकर यांची कथा, पटकथा, संवाद, गीते, निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘मीठ भाकर’ (१९४९) ते प्रसाद ओक अभिनित व दिग्दर्शित ‘वडापाव’ (२०२५) अशी ती परंपरा आहे. त्यातील काळानुसार झालेले बदल यावर फोकस हवाच. मीठ भाकर हा कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा काळ. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा लगेचचा काळ. चित्रपट माध्यम व व्यवसाय हळूहळू आकार घेत होता. या चित्रपटाची निर्मिती कोल्हापूरच्या प्रभाकर पिक्चर्सच्या वतीने करण्यात आली. या चित्रपटात मा. विठ्ठल, चंद्रकांत, सुलोचना , झुंजारराव पवार, जयशंकर दानवे, प्रभाकर पेंढारकर इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. तो सिंगल स्क्रीन थिएटरच अर्थात एकपडदा चित्रपटगृहांचा काळ होता. आणि कोल्हापूर येथे प्रदर्शित झालेला चित्रपट पुणे शहरात व मुंबईत प्रदर्शित व्हायला काही महिन्यांचा कालावधी लागे.
‘मीठ भाकर’ हा सामाजिक चित्रपट. त्यानंतर खाद्य पदार्थाचे नाव चित्रपटाला असे अनेक योग आले. त्यातील काही सांगायलाच हवेत. त्या नावातून त्या चित्रपटाच्या गोष्टीची सर्वसाधारण कल्पना यावी. राम गबाळे दिग्दर्शित ‘दूधभात’ (१९५२). या चित्रपटात उषा किरण, सुलोचना, इंदिरा चिटणीस, विवेक, चित्तरंजन कोल्हटकर यांच्या प्रमुख भूमिका. दिनकर द पाटील दिग्दर्शित ‘मूठभर चणे’ (१९५५). या चित्रपटात चित्तरंजन कोल्हटकर, इदिरा चिटणीस, नाना पळशीकर यांच्या प्रमुख भूमिका. शांताराम आठवले दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ (१९५५). या चित्रपटात बेबी नंदा, चित्तरंजन कोल्हटकर, शकुंतला, चंद्रकांत गोखले यांच्या प्रमुख भूमिका. हे सर्व कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट काळातील चित्रपट आहेत. आशयघन गोष्ट आणि अतिशय साधी सोपी मांडणी हे त्या काळातील वैशिष्ट्य. त्याचबरोबर त्या काळातील सामाजिक कौटुंबिक कथा या चित्रपटात पाहायला मिळतात.
चित्रपटाला खाद्य पदार्थाचे नाव ही परंपरा त्यानंतरही अशीच पुढे सुरु राहिली. त्यातील काही नावे सांगायलाच हवीत. अरुण कर्नाटकी दिग्दर्शित ‘तिखट मिरची घाटावरची’ (१९७९). या चित्रपटात अपर्णा देवी, सुधीर दळवी, सुनील रेगे इत्यादींच्या प्रमुख भूमिका. जी. जी. भोसले दिग्दर्शित ‘डाळिंबी’ (१९८२) या चित्रपटात अरुण सरनाईक, उषा चव्हाण, रविन्द्र महाजनी, सुहास भालेकर, निळू फुले,माया जाधव यांच्या प्रमुख भूमिका.

ही अशी नाव संस्कृती अशीच पुढे सुरु आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित गुलाब जाम, वरुण नार्वेकर दिग्दर्शित मुरंबा, सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद असे करत करत ‘वडापाव’ चित्रपटापर्यंत हा प्रवास सुरू आहे. यात आणखी काही चित्रपट असून त्यांनी जनसामान्यांच्या आवडीची भूक पूर्ण केली आहे. चित्रपटाचं नाव हा प्रवास असा देखील आहे हे लक्षात येतेय. यात एक मल्टी स्टार कास्ट चित्रपटही आला. तो होता. व्ही. के. नाईक दिग्दर्शित ‘खिचडी’ (१९८५). या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू, रंजना, जयश्री गडकर, अशोक सराफ, सदाशिव अमरापूरकर, अर्चना जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका.
‘वडापाव’ हा इंग्लंडमध्ये जाऊन एका मराठी माणसाने अतिशय जिद्द, कष्ट, मेहनत या गुणांवर उभ्या केलेल्या वडापाव व्यवसायावर आधारित आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण इंग्लंडमध्ये झाले आहे. ‘वडापाव’ हा कॉमेडी, भावनिक क्षण आणि नातेसंबंधांवर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “‘वडापाव’ म्हणजे प्रत्येक घराघरातल्या नात्यांची आणि भावनांची चव आहे. नाती जशी गोड–तिखट असतात, तसाच या सिनेमातला प्रत्येक क्षण आहे. ट्रेलरला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून मला खात्री आहे की, चित्रपट प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही तर डोळ्यांत पाणी आणून नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायलाही भाग पाडेल. रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमुळे ट्रेलर लाँच सोहळा अविस्मरणीय झाला आणि आमचं मनोबलही दुणावलं.”
================================
हे देखील वाचा : Ramayana वर आधारित दाक्षिणात्य कलाकृतींचा भांडार!
================================
निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणाले, “‘वडापाव’ची कथा प्रत्येक घराघरात पोहोचेल आणि नात्यांची खरी चव प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.” प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत.
‘वडापाव’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा काळ हा मल्टीप्लेक्स, ऑनलाईन तिकीट, ओटीटी यांचा आहे. ‘दशावतार’, ‘वेंगुर्ला ते कुर्ला’, ‘साबर बोंडं’, ‘आरपार’, ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाच्या यशाने आज मराठी चित्रपट रसिकांना मराठी चित्रपट आवर्जून पाहायचेत हे अधोरेखित केले आहे आणि त्यात वडापावची झणझणीत टेस्ट मिळतेय.