Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

जेव्हा Shammi Kapoor वर चित्रित गाणे शमशाद बेगमने गायले होते!
हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात बहुदा गायक आणि नायक यांच्या जोड्या फिक्स असायच्या. अर्थात एकाच चित्रपटात एकाच नायकावर दोन वेगवेगळ्या गायकांनी गायलेली गाणी देखील असायची. पण 1963 साली आलेल्या एका चित्रपटात नायकावर चक्क चार वेगवेगळ्या प्ले बॅक सिंगर्स नी गायलेली गाणी चित्रित झाली होती. पैकी त्यात एक गाणे तर चक्क गायिकेने गायले होते! हा कदाचित त्या काळातील विक्रम असावा. नायकावर गायिकेनं गायलेलं गाणं चित्रीत होणे असा एक गमतीशीर दुर्मिळ योगायोग तिथे जमून आला होता. कोणता होता तो चित्रपट आणि ते गाणं ? आणि कोणत्या नायकावर गायलेलं गाणं चित्रीत झालं?
सुप्रसिध्द सिनेमा दिग्दर्शक आणि मसाला सिनेमाचे बाप मनमोहन देसाई यांनी 1963 साली ‘ब्लफ मास्टर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटांमध्ये शम्मी कपूर, सायरा बानू, प्राण , ललिता पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट मसाला इंटरटेनमेंट होता. 1960 साली मनमोहन देसाई यांनी राज कपूर आणि नूतन यांना घेऊन ‘छलीया’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा त्यांचा दिग्दर्शनातील पहिलाच प्रयोग होता आणि जो यशस्वी झाला. यानंतर ते चांगल्या कथानाकाच्या शोधात होते. मराठी लेखक मधुसूदन कालेलकर यांची कथा त्यांच्या पसंतीस उतरली. त्यावर त्यांनी चित्रपट करायचे ठरवले.

या सिनेमातील हिरोची व्यक्तीरेखा शम्मी कपूरने साकारावी असे त्यांना वाटले. राजकपूर ला तशी त्यानी विनंती केली. राजने शम्मी आणि मनमोहन यांची भेट घडवून आणली. शम्मी चा ‘जंगली’ हा चित्रपट 1961 प्रदर्शित झाला यात त्याची नायिका सायरा बानू होती. दिग्दर्शक होते सुबोध मुखर्जी. या जोडीला घेऊन त्यांनी पुढचा चित्रपट काढायचे ठरवले. शम्मी ने सिनेमाचे नाव सुचवले ‘ब्लफ मास्टर’. परंतु मानधनावरून काहीसे मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट ड्रॉप केला.
शम्मी कपूर यांनी हा प्रोजेक्ट नंतर मनमोहन देसाई यांच्यासोबत करायचे ठरवले. सुभाष देसाई या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांचे बजेट कमी असल्यामुळे त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हा सिनेमा बनवायचे ठरवले. परंतु याच काळा मध्ये ‘जंगली’ प्रदर्शित झाला. सुपर हिट झाला. तो कलर होता. त्यामुळे सायरा बानू ने हट्ट धरला की ‘ब्लफ मास्टर’ हा सिनेमा रंगीत व्हावा. सायरा ची आई नसिम बानू आणि दिलीप कुमार यांनी देखील मनमोहन देसाई यांना हा सिनेमा कलर मध्ये बनवा असे सांगितले. परंतु मनमोहन देसाई यांचे बजेट तेवढे नव्हते त्यामुळे हा चित्रपट चक्क काही महिने बंद पडला!
मनमोहन देसाई यांनी एका मुलाखतीत सांगितले की,” मला त्यावेळी दिलीपकुमार यांचा खूप राग आला होता, त्यांच्या हट्टाने सायराला खत पाणी मिळत होते. त्याचवेळी मी ठरवले की आयुष्यात कधीही दिलीप कुमार सोबत काम करायचे नाही!” 1962 साली सायरा बानू चा ‘शादी’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचा नायक मनोज कुमार होता. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता. बऱ्यापैकी चालला. मनमोहन देसाई पुन्हा सायरा बनवला कडे अप्रोच झाले आणि चित्रपट सुरू करण्याची विनंती केली. आता सायराने देखील मान्य केले आणि चित्रपटाची शूट सुरू झाले.
सिनेमा कम्प्लीट फॅमिली ड्रामा म्युझिकल हिट होता. चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेली होती तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. या चित्रपटात शम्मी कपूर वर चित्रित झालेली गाणी चार वेगळ्या प्ले बॅक सिंगर्स गायली होती. त्यात एक गाणे तर चक्क शमशाद बेगम यांनी गायले होते. शम्मी कपूर साठी शमशाद बेगम हा एकमेव दुर्मिळ योगायोग या चित्रपटात दिसून आला होता! या चित्रपटात हेमंत कुमार यांनी ‘ऐ दिल अब कही न जा’ मुकेश यांच्या स्वरात ‘सोचा था प्यार हम ना करेंगे’ रफीच्या स्वरात ‘गोविंदा आला रे आला’ आणि शमशाद बेगम च्या स्वरात ‘चली चली हवा ये चली…’ ही गाणी होती. शमशाद ने गायलेलं गाणे सिनेमातील एक सिचुएशनल गाणे होते. जिथे स्त्री वेशातील शम्मीला शमशादच्या स्वरात गावे लागले.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
यातील ‘गोविंदा आला रे आला..’ हे गाणं आयकॉनक सॉंग बनले. मनमोहन देसाई मुंबईत गिरगावात राहणारे; त्यामुळे दहीहंडी हा मराठमोळा सण ते लहानपणापासून पाहत होते. संधी आली की या सिच्युएशनचं गाणं चित्रपटात घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. त्या पद्धतीने हे गाणं त्यांनी या चित्रपटात घेतले. या सिनेमाच्या शूट गिरगावातच झाले होते. शम्मी कपूर चक्क आठ दिवस या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे आला होता. आज देखील दर दहीहंडीला हे गाणं हमखास वाजवलं जातं. या चित्रपटात शम्मी कपूर आणि सायरा बानू यांच्यावरील एक मस्त युगल गीत आजही लोकप्रिय आहे. ‘अरे हुस्न चल कुछ ऐसी चाल दिवाने का पूछना हाल प्यार की कसम कमाल हो गया …’ यातील प्राणची भूमिका जबरदस्त होती त्याने रंगवलेला टेरर व्हिलन जबरदस्त होता.