Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

सर रिचर्ड अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची भूमिका कशी मिळाली?
आज २ ऑक्टोबर. राष्ट्रपिता म. गांधी यांचा जन्मदिन! संपूर्ण भारत वर्षालाच नव्हे तर साऱ्या विश्वाला महात्मा गांधी या महामानवाने अहिंसेचा मंत्र दिला. अल्बर्ट आईस्टांइन यांनी म. गांधी यांच्या बाबत असे म्हटले होते की “ पुढच्या शतकातील व्यक्तींना कदाचित हे पटणार नाही की गांधी सारखा हाडामांसाचा देह या जगात होवून गेला.” सर रिचर्ड अॅटेनबरो यांनी १९८२ साली ‘गांधी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. वीस वर्षाच्या अथक परिश्रमाचे हे फळ होते.

भारतातील हा सर्वात यशस्वी पॉलिटिकल बायोपिक समजला जातो.या चित्रपटाला आठ ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाले. आज देखील जगभरात या सिनेमाचा बोलबाला आहे. यातील प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग अतिशय अभ्यासपूर्ण आणि गांभीर्याने दिग्दर्शकाने घेतला होता. आज चाळीस वर्ष उलटून गेली तरी या सिनेमाची मोहिनी प्रेक्षकांवर अद्याप आहे. या चित्रपटाला प. रविशंकर यांचे संगीत होते.

यातील कस्तुरबाची भूमिका रोहिणी हट्टंगडीला कशी मिळाली? रोहिणी त्या वेळी एन एस डीचा अभ्यासक्रम पूर्ण करून रंगभूमीवरती काम करीत होती. डॉली ठाकूर या भारतीय रंगकर्मी विदुषीकडे पात्र निवडीची जवाबदारी होती. एकदा दिल्ली हून लंडनला जाताना अॅटेनबरो मुंबईला काही तासा करीता थांबले होते त्या वेळी डॉलीने रोहिणीला भेटायला बोलावले. दुसऱ्या दिवशी डॉली ने रोहिणीला महिनाभरात आठ किलो वजन कमी करायला सांगितले.रोहिणी करीता हा आश्चर्याचा धक्का होता. तिने लगेच मुंबईच्या आपल्या डॉक्टरचा सल्ला घेवून डाएट प्लान बनवला.
================================
हे देखील वाचा : स्ट्रगल पिरीयडमध्ये बनवलेली धून झाली १५ वर्षांनी सुपर हिट
================================
अक्षरशः लिक्विड डाएट, योगा, आणि व्यायामाने वजन कमी केले. या भूमिकेकरिता स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे या देखील स्पर्धेत होत्या. रोहिणी पेक्षा दोघीही सिनियर आणि अनुभवी होत्या. स्क्रीन टेस्ट करीता तिला लंडन ला बोलावण्यात आले. त्यावेळी रोहिणी कडे पासपोर्ट ही नव्हता! हंगामी पारपत्रावर तिने लंडन गाठले. आणि भूमिका मिळवली.आज इतक्या वर्षानंतर रोहिणी हत्तंगडी त्यांच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबाबत भरभरून बोलतात. “दिग्दर्शकाचा स्पष्ट उच्चारांवर खूप भर असायचा त्या करीता ते भरपूर मेहनत करवून घेत.चरखा चालविण्याचे शिक्षण त्यांनी घ्यायला लावले. अभिनयात सहजता आणण्यावर त्यांचा भर असे. ” या सिनेमाच्या वेळी रोहिणीचे वय अवघे २६ वर्षे होते!
गांधीजींच्या भूमिकेकरिता बेन किंग्सले, नसिरुद्दीन शहा आणि जॉन हर्ट या तिघांची स्क्रीन टेस्ट झाली. पण यात सरशी बेन किंग्सले यांची झाली.बेन किंग्सले यांचे वडील भारतीय वंशाचे गुजराती होते. शेक्सपियर यांच्या नाटकातून त्यांनी साकारलेल्या भूमिका रिचर्ड यांनी बघितल्या होत्या. पीटर ब्रुक यांच्या ‘मिडसमर नाईटस ड्रीम ‘ आणि ‘हॅम्लेट’ मधील भूमिकांचा मोठा बोलबाला होता. गांधीच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाचा त्यांनी खूप सखोल अभ्यास केला.

गांधीच्या व्यक्तीमत्वातील अध्यात्मिकता, अहिंसेचे तत्व ज्ञान आणि सत्याचा आग्रह या गुण समुच्चयाचा त्यानी खूप बारकाईने अभ्यास केला. या सिनेमाच्या वेळी त्यांचे वय ३७ वर्ष होते.या सिनेमात अनेक गुणी भारतीय कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. रोशन सेठ (पंडीत नेहरू),सईद जाफरी (वल्लभभाई पटेल), पर्ल पदमसी (बरी स्टर जिना), वीरेंद्र राजदान (मौलाना आझाद),डॉ श्रीराम लागू (ना गोखले) याशिवाय जलाल आगा ,अनंग देसाई , एम के रैना , ओम पुरी, अमरीश पुरी, मोहन गोखले , सुप्रिया पाठक, नीना गुप्ता , सुनील बर्वे, विजय कश्यप यांच्याही भूमिका होत्या.
म गांधी यांचा भारतीय समाज मनावरील पगडा जबरदस्त असला तरी सिनेमात गांधी तसे अभावानेच दिसले. रिचर्ड अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ सिनेमाला ऐंशीच्या दशकात मिळालेल्या उदंड यशामुळे काही सिनेमातून गांधी प्रेक्षकांना भेटत राहिले. २००६ साली राजकुमार हिरानी यांनी ‘लगे रहे मुन्नाभाई ‘या सिनेमातून दाखवलेली गांधीगिरी तरुणाईला खूष करून गेली. दिलीप प्रभावळकर यांनी गांधींची भूमिका केली होती.
================================
हे देखील वाचा : महात्मा गांधींनी आयुष्यभरात पाहिला एकच हिंदी चित्रपट!
=================================
कमल हसन यांच्या ‘हे राम’ २००० साली आलेल्या या सिनेमात त्यांनी गांधी हत्येचा निराळ्या पध्दतीने वेध घेतला होता.यात गांधी नसिरुद्दीन शाहने रंगवला होता. फिरोझ अब्बास खान यांनी २००७ साली ‘गांधी माय फादर ‘ हा सिनेमा बनविला होता ज्यात गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नाते संबंधावर प्रकाश टाकला होता. केतन मेहता यांच्या ‘सरदार’(१९९४) या सिनेमात अन्नू कपूर यांनी गांधी रंगवला होता.श्याम बेनेगल यांच्या ‘मेकिंग ऑफ महात्मा’ (१९९६) यांच्या सिनेमात रजत कपूर गांधीच्या भूमिकेत होते.मराठी रंग भूमीवर मात्र अनेक नाटकांमधून गांधी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले!