Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते मनोज कुमार यांनी सुरुवातीला साठच्या दशकात म्युझिकल रोमँटिक चित्रपटातून भूमिका करून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. साठच्या दशकाच्या मध्यापासून मात्र त्यांनी देशभक्तीपर चित्रपट निर्माण करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सत्तरच्या दशकात तर त्यांच्या चित्रपटांनी चांगले यश मिळवले होते. खरंतर साठच्या दशकातील कलावंतांना सत्तरच्या दशकामध्ये फारसी लोकप्रियता राहिली नव्हती पण मनोज कुमार त्याला अपवाद होते. यांनी या दशकात देखील पूरब और पश्चिम ,शोर, रोटी कपडा और मकान, क्रांती या चित्रपटातून जबरदस्त यश मिळवले.
मनोज कुमार यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये किशोर कुमार यांचा स्वर पार्श्वगायक म्हणून कधीच वापरला नाही. कायम महेंद्र कपूर, मुकेश आणि रफी यांचा प्लेबॅक म्हणून त्यांनी वापर केला. किशोरचा स्वर कां वापरला नाही याचे त्यांनी कधीच स्पेसिफिक कारण दिलं नव्हतं पण हा योग जुळून आला नव्हता हे नक्की. पण ऐंशीच्या दशकात मात्र मनोज कुमारला किशोर कुमार यांच्या घरी जाऊन आपल्या एका चित्रपटाचे शीर्षक गीत गाण्याची विनंती करावी लागली होती! आयुष्यभर किशोर कुमारचा स्वर न वापरणाऱ्या मनोज कुमारला इथे मात्र किशोर कुमारच्या थेट घरी जाऊन आपल्या चित्रपटात गाण्याची इच्छा आणि विनंती व्यक्त करावी लागली होती हे विशेष. कोणता होता तो चित्रपट आणि कोणते होते ते गाणे?

मनोज कुमार यांचा धाकटा भाऊ राजीव गोस्वामी हा मनोज कुमारला अनेक चित्रपटांना असिस्टंट म्हणून काम करत होता. पण त्याची स्वतःची काही आयडेंटिटी निर्माण होत नव्हती. त्यामुळे मनोज कुमारचे आई-वडील दोघेही त्यांना “ आपल्या धाकट्या भावाकडे लक्ष दे. त्याचे करिअर घडवण्यासाठी एखादा चित्रपट निर्माण कर.” असे वारंवार सांगत होते. मनोज कुमार तेव्हा ‘क्रांती’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होता. या सिनेमासाठी देखील राजीव गोस्वामी त्याचा सहाय्यक होता.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
या चित्रपटानंतर मात्र त्याने राजीव करता एक चित्रपट बनवायचे ठरवले. चित्रपटाची कथा पटकथा संवाद गाणी स्वतः मनोज कुमार यांचेच होते. ही कथा त्यांच्याकडे वीस वर्षापासून त्यांनी जपून ठेवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कुमार यांचे मेहुणे अशोक भूषण यांनी केले होते. या चित्रपटातील गाणी मनोज कुमार सोबतच कमर जलालाबादी आणि कतील सिफाई यांनी लिहिली होती. संगीत उत्तम जगदीश यांचे होते. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाची नायिका होती मीनाक्षी शेषाद्री.चित्रपटाचे नाव ठरले ‘पेंटर बाबू’
या चित्रपटावर काम सुरू झाले हे जेव्हा मनोज कुमारच्या आई-वडिलांना याबाबत कळाले तेव्हा त्यांना सुरुवातीला खूप आनंद वाटला. आपल्या धाकट्या मुलाचे करिअर देखील मार्गी लागेल असे त्यांना वाटले. पण ज्यावेळी त्यांनी या चित्रपटाची स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्स पाहिले तेव्हा त्यांना थोडासा राग आला. कारण ते सर्व नवीन होते. त्यांनी रागातच मनोज कुमारला विचारले,” राजीव गोस्वामी साठी जो चित्रपट तू तयार करत आहेस त्या चित्रपटाचे संगीत चांगल्या संगीतकाराकडे का दिले नाही? सध्या लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन यांचा जमाना आहे. असे असताना तू नवोदित उत्तम जगदीश यांच्याकडे संगीत का दिले? या चित्रपटाची गाणी तू स्वतः का लिहित आहेस ? आनंद बक्षी सारखा लोकप्रिय गीतकार का वापरत नाही? या चित्रपटातील गाणी महेंद्र कपूर यांना गायला का देतो आहेस?

किशोर कुमार सारखा उत्तम गायक असताना त्याला गाण्यासाठी का बोलवत नाही? तुला नक्की तुझ्या धाकट्या भावाचे राजीव गोस्वामी यांचे करिअर घडवायचे आहे की बिघडवायचे आहे? मला तर वेगळाच संशय येतो आहे! तू जाणूनबुजून तर असे करत नाहीस न?” मनोज कुमार यांनी वडिलांना हर पद्धतीने समजून सांगितले पण त्यांचे समाधान झाले नाही. त्या रात्री मनोज कुमार याला देखील झोप लागली नाही. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर कुमार यांचे घर गाठले. किशोर कुमारला देखील मनोज कुमार आपल्या दारात आलेले पाहून आश्चर्य वाटले. कारण यापूर्वी त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केले नव्हते. किशोर कुमारने मनोज कुमार चे स्वागत केले आणि मनोज कुमारने त्याला आपली खंत बोलून दाखवली. किशोर कुमारने त्याच्या खांद्यावर टाकत सांगितले,” अरे यार, तुझ्या भावा साठी मी नक्की गाणं गाईन. डोन्ट वरी” अशा पद्धतीने ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातील शीर्षक गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले. म्हणजे किशोरकुमार आणि मनोजकुमार यांचा संबंध गीतकार-गायक म्हणून आला.
‘पेंटर बाबू’. चित्रपटातील गाणी त्या काळात रेडिओ सिलोन वर खूप चालली. चित्रपट मात्र फ्लॉप झाला. मीनाक्षी शेषाद्री मात्र क्लिक झाली. खरं तर मीनाक्षी ने साईन केलेला हा पहिला सिनेमा होता. पण सिनेमाचे शूटिंग रेंगाळले. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुभाष घई यांनी मीनाक्षीला घेऊन ‘हिरो’ हा चित्रपट साईन केला पुढे हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. पण मीनाक्षीने सर्वात आधी साईन केलेला सिनेमा हा मनोज कुमारचा ‘पेंटर बाबू’ हाच होता. या ‘पेंटर बाबू’ ची कथा मनोजकुमार ने वीस वर्षापासून सांभाळून ठेवली होती. उत्तम सिंग आणि जगदीश खन्ना यांनी ‘उत्तम – जगदीश’ या नावाने सिनेमाला संगीत दिले होते. त्यांचा हा पहिलाच सिनेमा होता.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेली गाणी कदाचित रसिकांना आठवत असतील. ‘ओ मेरे सजन बरसात में आ….’हे लताचे गाणे खूप सुंदर आहे. ‘कब तलक शम्मा जली याद नही’, ‘जब याद की बदली छाती है’..हि गाणी मस्त जमली होती. पण चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे ही गाणी मागे पडली. पेंटर बाबू हा चित्रपट 31 मे 1983 या दिवशी प्रदर्शित झाला.. पण पहिल्याच आठवड्यात सुपर फ्लॉप झाला जूनच्या पहिल्या आठवड्यात राजेश खन्नाचा ‘सौतन’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि पेंटर बाबू अक्षरशः थेटर मधून उतरवून टाकावा लागला! राजीव गोस्वामी ला सिनेमात करीअर काही करता आले नाही. १९९१ साली त्याने ‘देशवासी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते!
जाता जाता एक छोटी आठवण. याच ‘पेंटर बाबू’ चित्रपटात नीलिमा नावाची एक मराठी अभिनेत्री देखील होती. जिने पुढे सचिनच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटात भूमिका केली होती. अशोक सराफ सोबतचे तिचे गाणे ‘निशाणा तुला कळला ना…’ हे खूप लोकप्रिय ठरले होते.