
Mukesh ‘आसू भरी ये जीवन की राहे..’ गाण्याच्या रेकॉर्डींग चा भन्नाट किस्सा!
पार्श्वगायक मुकेश यांचे हे पन्नासावे स्मृती वर्ष आहे. पन्नास वर्षे झाली मुकेश यांना आपल्यातून जाऊन पण त्यांनी गायलेली गाणी आज देखील रसिकांना तो काळ आठवून देतात. मुकेश यांच्या स्वरातील दर्द अवर्णनीय होता. त्यामुळे त्यांनी गायलेली दर्दभरी गाणी आज देखील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून गायली जातात. ऐकवली जातात. मुकेश यांनी गायलेले सर्वात अप्रतिम लोकप्रिय असं दर्दभरे गीत कोणते असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाची उत्तर वेगळे येईल. पण एका उत्तरावर मात्र सर्वजण सहमत होते ते म्हणजे ‘परवरिश’ (१९५८) या चित्रपटातील ‘आसू भरी ये जीवन की राहे कोई उनसे कह दे हमे भूल जाये’ मुकेश यांच्या स्वरातून या गाण्यात जे दुःख विरघळून गेलं आहे त्याला तोड नाही.

कोणत्याही प्रेमभंग झालेल्या व्यक्तीला हे गाणं म्हणजे त्याच्या ‘मर्मबंधातल ठेव ही’ असे आहे या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा खूप भन्नाट आहे हे गाणं संगीतकार दत्ताराम यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि लिहिलं होतं हसरत जयपुरी यांनी. १९५८ साली एस मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘परवरिश’ या चित्रपटात हे गाणं होतं. या चित्रपटात राज कपूर, माला सिन्हा, ललिता पवार, मेहमूद, नासिर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीतकार दत्ताराम वाडकर हे सुरुवातीपासून संगीतकार शंकर जयकिशन यांचे सहाय्यक होते. ते स्वतः उत्तम तबलावादक होते. ढोल डफ ही वाद्य देखील ते लीलया वाजवायचे. त्या काळात हिंदी सिनेमात दत्ताराम यांच्या ढोलकचा ठेका खूप लोकप्रिय होता. त्याला ‘दत्तू का ठेका’ म्हणून ओळखले जायचे. शंकर जयकिशन यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या या ठेक्याची कमाल दाखवली आहे.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
आर के फिल्मच्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटातील ‘मेरा नाम राजू घराना अनाम’ या गाण्यातील डफ दताराम यांनीच वाजवला आहे. दत्ताराम अनेक वर्ष शंकर जयकिशनच्या ऱ्हिदम सेक्शन चे इन्चार्ज होते. 1948 ते 1975 पर्यंत ते शंकर जय किशन यांच्यासोबत होते. त्यानंतर ते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले. सहाय्यक असतानाच त्यांनी स्वतंत्र रित्या काही चित्रपटांना संगीत दिले. दत्ताराम यांनी एकूण 19 चित्रपटांना संगीत दिले पण दुर्दैवाने यातील फार कमी चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले. पण यातील गाणी मात्र आज देखील लोकप्रिय आहेत. आर के फिल्म्सचा ‘अब दिल्ली दूर नही’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट.

संगीतकार दत्ताराम यांच्याकडे जेव्हा ‘परवरिश’ या चित्रपटाचे संगीत आले त्यावेळेला त्यांनी खूप मेहनतीने या चित्रपटाचे संगीत बनवण्याचे काम सुरु केले. या चित्रपटात मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘मस्ती भरा है समा हम तुम है दोनो जवा’ हे युगलगीत दत्तूच्या ठेक्यामुळे खूप गाजलं होतं. पण या चित्रपटातील हायलाईट गाणे ठरले ‘आंसू भरी है जीवन की राहे’ दत्ताराम यांना देखील कदाचित माहित नसावे की हे गाणं मुकेशच्या सर्वोत्कृष्ट दर्द भरे गीतांमध्ये स्थान मिळेल. पण हे गाणं बनताना अनंत अडचणी आल्या होत्या. एकतर त्या काळामध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ मिळणं हे खूप दुर्लभ होतं. कारण सर्व चोटीचे संगीतकार रेकॉर्डिंग स्टुडिओ आधीच बुक करून टाकत. त्यामुळे छोट्या संगीतकारांना रेकॉर्डिंग स्टुडिओ मिळणं खूप अवघड असे. त्या काळातील रेकॉर्डिंग स्टुडिओचे भाडे वादकांचा खर्च अफाट असायचा. त्यामुळे दिलेल्या वेळात काम पूर्ण करणे गरजेचे असायचे.
================================
हे देखील वाचा : Mukesh : दरिया दिल मुकेशचा दिलदारपणा!
================================
‘परवरिश’ या चित्रपटातील ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’ या गाण्यासाठी दत्ताराम यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला. पण नेमकं त्यादिवशी वादकांचा संप सुरू झाला. त्यामुळे कोणीही वादक रेकॉर्डिंग ला यायला तयार नव्हते. दत्ताराम सारख्या छोट्या संगीतकाराला रेकॉर्डिंग कॅन्सल करणे परवडणार नव्हते. परंतु त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि केवळ तबला आणि सारंगी या दोन वाद्यांना घेऊन त्यांनी हे गाणे पूर्ण केले! तबला त्यांनी स्वतः वाजवला तर सारंगी जहूर अहमद यांनी वाजवली. राग यमन वर आधारित हे दर्द भरे गाणे मुकेश यानी काळजाला पिळ पडेल अशा भावनेने गायले. यातील अंतराच्या वेळी मुकेश यांचा टिपेला पोहोचला. स्वर कुठेही बेसुरा झाला नाही. या गाण्यांमध्ये दत्ताराम यांनी तबल्यावर झपतालचा वापर केला होता जनरली गाण्यांमध्ये केहरवा चा वापर केला जातो. पण इथे संगीतकाराने वेगळा प्रयोग केला होता त्यामुळे गाण्याला वेगळी उंची प्राप्त झाली. ‘परवरिश’ या चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाले पण संगीतकार दत्ताराम यांना मात्र फारसे चित्रपट पुढे मिळाले नाहीत.राजकपूर यांचे हे अत्यंत लाडके गाणे होते.