Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

Salim Khan : पटकथा संवाद लेखकाला ग्लॅमर आणले
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला पटकथा संवाद लेखक सलीम खान म्हटलं की, सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान यांचे पिता अशी ओळख असेल. पण सत्तरच्या दशकातील आम्ही चित्रपट रसिकांना सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी म्हणजे, चित्रपट पटकथा आणि संवाद लेखक जोडी म्हणून माहीत आहेत. सलीम खान यांच्या वाढदिवसानिमित्त (जन्म दिनांक २४ नोव्हेंबर १९३५) त्यांच्या यशस्वी वाटचालीवर फोकस टाकताना तीच गोष्ट महत्त्वाची आहे.
सलीम खान यांचा जन्म मध्य प्रदेशातील बालाघाट येथील. बालपण आणि शिक्षण इंदौर शहरात झाले आणि साठच्या दशकात ते चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत ते वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे लाईनलगत राहत. के. अमरनाथ दिग्दर्शित ‘बारात’ (१९६५) या चित्रपटात त्यांनां भूमिका मिळाली आणि चित्रपटसृष्टीत त्यांची वाटचाल सुरू झाली. एस. एम. सागर दिग्दर्शित ‘सहदरी लुटेरा'( १९६६) या चित्रपटात भूमिका साकारत असताना जावेद अख्तर हे सागर यांचे सहायक दिग्दर्शक होते. तेव्हा सलीम खान आणि जावेद अख्तर यांची पहिली भेट झाली. एस.एम. सागर दिग्दर्शित ‘दो भाई’ ( १९६६) या चित्रपटाची कथा कल्पना सलिम खान यांची! विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंजिल’ (१९६७) या चित्रपटात क्लबमधील ड्रम वादक ही भूमिका साकारत असताना सलीम खान यांचा परिचय हेलन या अभिनेत्रींशी झाला. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि मग त्यांनी लग्न केले, तेव्हा सलीम खान विवाहित होते.

साठच्या दशकाच्या अखेरीस साऊथचे चित्रपट निर्माते चिन्नापा देवर यांना हत्तीच्या कळपाभोवती कथानक असलेल्या आपल्या एका तमिळ चित्रपटाची हिंदी भाषेत रिमेक करायची होती.आणि तीदेखील राजेश खन्नाला भरपूर मेहनताना देऊन हा चित्रपट निर्माण करायचा होता. राजेश खन्नाला ही संधी सोडायची नव्हती. त्याने यावेळी सलिम खान आणि जावेद अख्तर यांना एकत्र आणून पटकथा लिहिण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांच्या कामासाठी एका जागेची व्यवस्था केली आणि त्यांनी पहिला चित्रपट लिहिला, ‘हाथी मेरे साथी’. हा चित्रपट पहिल्याच खेळापासून सुपरहिट ठरला आणि सलीम जावेद जोडी जमली आणि एक नवीन पर्व सुरु झाले.
सलीम खान आणि जावेद अख्तर यांना आपलं स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आहे ही गोष्ट विशेष उल्लेखनीय. प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) ची पटकथा आणि संवाद लेखक सलीम जावेद यांचे आहे. पण पोस्टरवर आपलं नाव नाही हे समजताच सलीम खान यांनी काय केले माहितेय? त्यांनी दोन रंगारी बोलवले आणि एका रात्री वांद्रे ते अंधेरीतील ‘जंजीर’च्या सगळ्या पोस्टरवर जेथे जेथे जमेल तेथे तेथे सलीम जावेद असं नाव लिहायला सांगितले. यातून सलीम खान यांचा आपल्या कामाबद्दलचा अभिमान आणि आत्मविश्वास दिसतो.

एक वैशिष्ट्यपूर्ण आठवण सांगतो, विजय आनंदचे दिग्दर्शन असे म्हणता क्षणीच ‘गाईड, ‘ज्वेल थीफ’, ‘तिसरी मंझिल’, ‘जॉनी मेरा नाम’ असे अनेक चित्रपट एव्हाना डोळ्यासमोर आले असतील तर त्यात आश्चर्य ते काय? याच विजय आनंदने देव आनंद, शशी कपूर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, राखी, ऋषि कपूर, टीना मुनिम, परवीन बाबी, अमजद खान अशी जबरदस्त स्टार कास्ट घेऊन ‘एक दो तीन चार’ या चित्रपटाचा जोरदार शोरदार मुहूर्त केला. १९७८ सालची ही गोष्ट. या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन सलीम जावेद यांचे होते. यांच्या पटकथेवर विजय आनंदचे दिग्दर्शन हा एक जबरदस्त योग आला….
बरेच दिवस या मुहूर्ताच्या बातम्या प्रसिद्ध होत राहिल्या. तेवढीच त्या चित्रपटाची प्रगती. गतवर्षी सलीम खान व जावेद अख्तर या यशस्वी पटकथा व संवाद लेखक जोडीच्या लघुपटाच्या निमित्ताने पटकन आठवले ते ‘एक दो तीन चार’ या भव्य दिव्य चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त. सत्तरच्याच दशकातील असाच एक सॉलिड गाजलेला वाद. एका गॉसिप्स मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत सलीम जावेद यांनी म्हटलं, आम्ही पटकथाच अशी बारीकसारीक तपशीलवार देतो की, दिग्दर्शकाला काम ते काय राहते? आम्ही आमच्या पटकथेतील प्रत्येक व्यक्तीरेखीची तपशीलवार वैशिष्ट्य देतो, प्रत्येक प्रसंग कसा असेल हेही लिहितो वगैरे वगैरे. गॉसिप्स मॅगझिनमधली मुलाखत म्हणजे असेच काही असणार यात आश्चर्य नव्हतेच. मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांना हे अजिबात रुचले नाही. तसे ते स्पष्टवक्तेपणासाठी ख्यातनाम. त्यात पुन्हा मनमोहन देसाई यांनी सलीम जावेद यांच्या पटकथेवर फक्त ‘चाचा भतिजा’ हा एकमेव तर प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’ व ‘हाथ की सफाई’ हे दोनच चित्रपट दिग्दर्शित केले. त्या काळातील आघाडीच्या या दोन दिग्दर्शकांनी सलीम जावेदपेक्षा अन्य पटकथालेखकांना महत्व दिले. त्यांनी सलीम जावेदना सडेतोड उत्तर देताना म्हटले, त्यांच्या पटकथेवर दिग्दर्शकाला फारसे काम नसते तर ए. सलाम दिग्दर्शित ‘आखरी डाव’ आणि देश मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’ का पूर्णपणे अपयशी ठरले…
हे उत्तर मला आवडले कारण मी मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांचा चाहता. १९९१ साली एका दिवाळी अंकासाठी मनजींची आमच्या गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमधील घरी अमिताभ बच्चन’ या विषयावर मी मुलाखत घेतली तेव्हा या वादावर आमचे बोलणे झाले. अमिताभच्या साठीनिमित्त रविवार लोकसत्तासाठी जुहूच्या सुमित प्रिव्ह्यू थिएटरमधील कार्यालयात प्रकाश मेहरांची मुलाखत घेतली तेव्हाही या गाजलेल्या वादाची मी त्यांना आठवण करुन दिली. सलीम खान यांचे बोलणं अतिशय सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण हे त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत माझ्या लक्षात आले. चित्रपट व्यवसायात दीर्घ काळ वावरुनही ते फिल्मी झाले नाही हा त्यांचा गुण विशेष उल्लेखनीय.

सलीम जावेद यांनी ‘सौदा’ नावाचा एक चित्रपट लिहिला होता, अशी फारशी कुठे नोंद नाही. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला उठसूठ माहितीसाठी गुगलचा मोठाच आधार वाटतो, त्यातही सलीम जावेद यांच्या यशस्वी कर्तृत्वाच्या चित्रपट यादीत ‘सौदा’ या १९७४ च्या चित्रपटाचे नावच नाही. पण या चित्रपटाच्या अतिशय दुर्मिळ अशा पोस्टरवर मात्र कथा सलीम जावेद असे म्हटले आहे. या चित्रपटाचे निर्माते होते सी. एस. ओबेरॉय आणि दिग्दर्शक आहेत, सुदेश इस्सार. या चित्रपटात विनोद खन्ना, योगिता बाली, मदन पुरी, सुधीर, मुक्री, जानकीदास, पूर्णिमा आणि रणजित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इतर छोट्या छोट्या भूमिकेत रशिद खान, सी. एस. दुबे, श्याम अरोरा, लीना डिसोझा, उमा दत्त यांच्याही भूमिका आहेत. तर इंद्रजीतसिंग तुलसी यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. हा चित्रपट नेमका कधी आणि कुठे प्रदर्शित झाला हे फार फार तर विनोद खन्नाचे जबरा फॅन सांगतील. असतात हो असे पंखे.
हा चित्रपट सलीम जावेद यांनी लिहिला आहे हे दुर्लक्षित का राहिले अथवा मागे का पडले असावे? सलीम जावेद यांनी एकीकडे ‘जंजीर, ‘हाथ की सफाई’, ‘यादों की बारात’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘शान’, ‘क्रांती’, ‘डॉन’, ‘दोस्ताना’, ‘शक्ती’ असे अनेक सुपर हिट चित्रपट लिहिले आणि पटकथा व संवाद लेखकांना ग्लॅमर आणले, त्यांचे मूल्य वाढवले, त्यांना पोस्टरवर स्थान मिळवून दिले, तरीही त्यांच्या खात्यात काही फ्लॉप्स चित्रपटही आहेत. एस. एम. सागर दिग्दर्शित ‘अधिकार ‘ ( १९७१ प्रमुख भूमिका अशोककुमार, नंदा, देब मुखर्जी, नाझिमा आणि प्राण ), ए. सलाम दिग्दर्शित ‘आखरी डाव’ ( १९७५. जितेंद्र, सायरा बानू आणि डॅनी), प्रेमजी निर्मित आणि देश मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’ ( १९७७. शशी कपूर, संजीवकुमार, अमिताभ बच्चन, रेखा, अमरीश पुरी, डॉ श्रीराम लागू, प्रेम चोप्रा आणि हेलन), रमेश तलवार दिग्दर्शित ‘जमाना’ ( १९८५. राजेश खन्ना, ऋषि कपूर, पूनम धिल्ला आणि रंजिता) या चित्रपटांना रसिकांनी नाकारले. ‘इमान धरम’च्या अपयशाच्या वेळी तर सलीम जावेद यांची पटकथा आणि संवाद म्हणजे हमखास यशच अशा इमेजला जबर धक्का बसला होता. गॉसिप्स मॅगझिनमधून बरेच काही ना काही लिहून आले.
राजेश खन्नाची दुहेरी भूमिका असलेल्या चक्क दोन चित्रपटांची पटकथा व संवाद सलिम जावेद यांचे होते पण राजेश खन्नाने त्यात बरेच फेरफार केल्याने सलिम जावेद यांनी आपले नाव मागे घेतल्याचे त्या काळात गॉसिप्स मॅगझिनमधून फार गाजले. ‘मस्तकलंदर’ या चित्रपटाच्या निमित्ताने रविवार नवशक्तीसाठी सलिम खान यांची दीर्घ मुलाखत घेतली तेव्हा त्यांनीही त्याबाबत मला सांगितले. ते चित्रपट होते, जम्बू दिग्दर्शित ‘मेरे जीवन साथी’ ( १९७४ , यात नायिका होत्या तनुजा आणि मौशमी चटर्जी ) आणि सतपाल दिग्दर्शित ‘भोला भाला ‘ ( १९७९. यात नायिका होत्या रेखा आणि मौशमी चटर्जी) या दोन्ही चित्रपटांची राहुल देव बर्मनचे संगीत असलेली गाणी लोकप्रिय झाली. पण दोन्ही चित्रपट फ्लाॅप ठरल्याने सलिम जावेद यांच्या खात्यात हे अपयश जमा झाले नाही. अन्यथा त्यांचे अपयशाचे पारडे थोडे जड झाले असते. तसे होऊ नये म्हणून ‘सौदा ‘ची आठवणही नको असावी.
================================
हे देखील वाचा : कल्पक आणि वेगळी दृष्टी असलेले Piyush Pandey!
================================
पटकथा कशी असावी/ लिहावी ( निर्माता व दिग्दर्शकांकडे त्याचे महत्व कसे पटवून द्यावे), स्वतःचे मार्केटिंग कसे करावे यासाठी सलीम जावेद आयडॉल आहेत. तरी आता पुन्हा जरी ते एकत्र आले तरी आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल वातावरणात त्यांच्या पटकथेवर चित्रपट निर्माण करावा असे कोणत्या दिग्दर्शकाला मनोमन वाटेल हा प्रश्नच आहे? फरहान अख्तरला वाटेल का? त्याचा सलीम जावेद लिखित, मनोजकुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ चित्रपट जास्त आवडता आहे. खुद्द सलीम जावेद आपल्याचा एखाद्या चित्रपटाची रिमेक लिहिण्यात रस घेतील का? जावेद अख्तर यांनी ‘दीवार’ वरुनच राहुल रवैल दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष’ लिहिला, सलीम खान यांनी ‘दीवार’ वरुनच शशिलाल नायर दिग्दर्शित ‘फलक’ लिहिला. मला आठवतंय, मेट्रो चित्रपटगृहात मॅटीनी शोला ‘फलक’ प्रदर्शित झाला असता मुंबईतील आम्हा चित्रपट समिक्षकांना पहिल्या दिवसाचे बाल्कनीचे तिकीट दिले असता सलीम खानही आम्हा चित्रपट समिक्षकामध्येच बसले होते. पण चित्रपट अगदीच निराशाजनक ठरला.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘अकेला’ हा अमिताभ बच्चनची भूमिका असलेल्या चित्रपटाची पटकथा सलीम खान यांचीच आहे. सलीम जावेद यशस्वी व आदर्श पटकथा व संवाद लेखक निश्चित आहेत (की होते?) सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी आपापल्या पद्धतीने स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली. त्यापेक्षा त्यांनी एकत्र काम केलेल्या पटकथा संवाद लेखनाचा प्रभाव नक्कीच मोठा आहे….