
‘आशिकी’ सिनेमा रिलीजच्यावेळी Mahesh Bhatt यांनी निर्मात्याला काय गॅरंटी दिली?
सध्या जगभर सर्वत्र जेन झी चा मोठा बोलवाला आहे. आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये तर जेन झी च्या माध्यमातून सत्तांतर घडले. भारतात देखील नव्वदच्या दशकात जन्माला आलेली पिढी आपली स्वतंत्र आवड आपले स्वतंत्र विचार आणि आपली स्वतंत्र ओळख ठेवणारी आहे. या दशकातील चित्रपट, गाणी आणि संगीत एकूणच आगळं वेगळं असं होतं. भारतीय चित्रपट संगीतातील स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करणारे होते. हा पिरेड संक्रमणाचा होता. खाजगीकरण /उदारीकरण /जागतिकीकरण दरवाजावर थापा देत होते. नवीन बदल सर्वच क्षेत्रात घडू पाहत होते. भारतीय चित्रपट आणि संगीताच्या दुनियेत देखील आमुलाग्र बदल घडत होते. म्युझिक कॅसेटच्या विश्वात सुपर कॅसेट इंडस्ट्री ने मोठी हलचल मचवली होती. अक्षरश: दहा पंधरा रुपयात टी सिरीजने कॅसेट मार्केट मध्ये आणल्याने मोठ्या कंपन्यांचे प्रॉफिट मार्जीन आणि मक्तेदारी या दोघांवर प्रभाव पडला होता. हा सर्व बदलाव ज्यांच्या मुळे येत होता ते होते गुलशन कुमार. चित्रपट निर्माते आणि सुपर म्युझिक कॅसेटचे प्रणेते.

नव्वदच्या सुरील्या दशकातील महेश भट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट गुलशन कुमार यांनीच निर्माण केला होता. हा चित्रपट एक आयकॉनिक चित्रपट आहे. नव्वद च्या दशकातील टॉप टेन चित्रपटांपैकी आहे. या सिनेमाने मेलडी ची परिभाषाच बदलून टाकली. या चित्रपटातील गाणी गीतकार समीर अंजान यांनी लिहिली होती तर संगीत नदीम श्रवण यांचे होते. चित्रपटात एकूण अकरा गाणी होती आणि सर्वच्या सर्व गाणी सुपर डुपर हिट झाली होती. या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंग चा एक किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. यात एक गाणं होतं ‘तू मेरी जिंदगी है…’ हे गाणं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं या गाण्याच्या रेकॉर्डिंगला गीतकार समीर आणि दिग्दर्शक महेश भट देखील उपस्थित होते. या गाण्याचे धून महेश भट यांना खूप आवडली पण त्या पेक्षा त्यांना त्यातील शब्द खूप आवडले होते. या गाण्याचा दुसरा अंतरा असा आहे
‘हर जख्म दिल का तुझे दिल से दुआ दे
खुशिया तुझे, गम सारे मुझको खुदा दे …’

हा अंतरा आणि या ओळी महेश भट यांना बेहद आवडल्या. या ओळीतून व्यक्त होणारी कृतज्ञता आशीर्वाद आणखी कशातून व्यक्तच होऊ शकत नाही अशी त्यांना खात्री पटली. या ओळी ऐकून ते इतके भारावून गेले की त्यांनी खिशातून नोटांचे बंडल काढले आणि सर्व समीर यांच्या हातात देऊन टाकले आणि म्हणाले,” समीरजी, मै आपके इस गाने पर कुर्बान हो गया…’ महेश भट यांनी हा चित्रपट अतिशय अप्रतिम रित्या दिग्दर्शित केला होता. परंतु चित्रपट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा याचा ट्रायल शो गुलशन कुमार यांनी आपल्या मित्रांना दाखवला तेव्हा त्यातील काही मित्रांनी महेश भट यांना,” हा चित्रपट वाटत नाही तर एक म्युझिक अल्बम वाटतो!” असे सांगितले. गुलशन कुमार यांनी हे खूप सिरीयसली घेतलं आणि चित्रपट प्रदर्शित करावा की नाही या विचारात पडले. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Chandani Bar :चित्रपट ब्लॉकबस्टर ठरूनही महेश भट्ट का चिडले होते भांडारकरांवर?
================================
परंतु त्या काळात या सिनेमाच्या कॅसेट इतक्या लोकप्रिय झाल्या की संपूर्ण देशभर आशिकीच्या गाण्यांनी कहर केला होता. या सिनेमाच्या तब्बल २ कोटी कॅसेट विकल्या गेल्या होत्या. पण निर्माते मात्र हा चित्रपट प्रदर्शित करावा की नाही या द्विधा मनस्थितीत होते. जेव्हा महेश भट यांना ही बातमी कळाली तेव्हा ते गुलशन कुमार यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितले,” असं काही होणार नाही. हा चित्रपट चांगला बिजनेस करेल. तुम्ही काळजी करू नका” आणि त्यांनी एका बॉण्ड पेपरवर लिहून दिले,” जर हा चित्रपट दुर्दैवाने फ्लॉप झाला तर मी दिग्दर्शन करणे बंद करेल!” दिग्दर्शकाचा हा आत्मविश्वास पाहून गुलशन कुमार यांनी हा चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले. या चित्रपटाची उत्सुकता वाढावी म्हणून यातून हिरो आणि हिरोईन म्हणजे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा एकही फोटो मीडियामध्ये महेश भट यांनी येवू दिला नाही. उलट टीझर मध्ये एका ब्लेजर खाली या दोघांचे चेहरे लपवले गेले त्यामुळे रसिकांची उत्सुकता प्रचंड वाढली 23 जुलै 1990 या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट ठरला!