
….ही तर उद्याची Web Series
तुम्हालाही कल्पना आहे, पहिला आणि दुसरा अशा दोन ‘बाहुबली’ मधील काही दृश्ये एकत्र करून आणखीन एक चार तासांचा ‘बाहुबली’ मल्टीप्लेक्सच्या पडद्यावर आला. येथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येणार नाही. निर्माता आणि वितरक दिसतोय असं म्हणायला हवे. ‘युगंधर’ ही असाच केवढा तरी लांबलचक चित्रपट. या चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा पहिला भाग दोन तास चार मिनिटे असा तर मध्यंतरनतरचा भाग एक तास चौतीस मिनिटं असा मोठा आहे. एकूणच हा चित्रपट तीन तास चौतीस मिनिटे असा आहे आणि तरीही हा चित्रपट संपत नाही, आणखी चार पाच महिन्यांत याच चित्रपटाचा पुढचा भाग पडद्यावर येतो आहे. बजेट वाढ वाढ वाढवा.
‘शोले’ हा सर्वकालीन सुपरहिट चित्रपट, तोही मूळ शेवटासह (क्लायमॅक्स) पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय याची आपणास कल्पना आहे. पहिल्या वेळेस अर्थात १५ ऑगस्ट १९७५ रोजी ‘शोले’ प्रदर्शित होत असताना देशात आणीबाणी लागू झाली होती आणि या चित्रपटातील शेवट बदलावा अशी सेन्सॉरची सूचना अमलात आणली गेली. आता मात्र तो मूळ शेवटासह ‘शोले’ पाहायला गर्दी होईलच. यह फिल्म रुकने का नाम ही नही लेती… पण हे लांबलचक चित्रपट म्हणजे भविष्यात एक प्रकारची वेबसिरीज असतील का? सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर हो…

ओटीटी माध्यम आज मोबाईलवर, दूरचित्रवाणी संच यावर छान स्थिरावले आहे. त्यावर देशविदेशातील अनेक भाषेतील चित्रपट आणि वेबसिरीज पाह्यला मिळताहेत. त्यात लांबलचक चित्रपट म्हणजे सहा सात भागांची मालिका असू शकते. आणि ते करताना चित्रीत करण्यात येवूनही चित्रपटात समाविष्ट करण्यात न आलेल्या अनेक दृश्याचा समावेश करता येईलही.
सहज आठवण म्हणून सांगतो, आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व चित्रफित (व्हिडिओ)चे आगमन झाले आणि आजचं शुक्रवारी पडद्यावर आलेला नवीन चित्रपट संध्याकाळी चक्क व्हिडिओवर येई (त्यामागच्या रंजक कथा, किस्से, दंतकथा वेगळ्या) तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीने काय केले माहितेय? चित्रपटात क्लोज अपला महत्व देण्याऐवजी मिड शॉट घेऊ लागले (सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ बघा) आणि चित्रपट तीन तासाचा होईल यावर लक्ष ठेवू लागले (रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ बघा). त्या व्हिडिओ कॅसेटमध्ये चित्रपट माऊ नये ( अधिकृत व्हिडिओ कॅसेटमध्येच पूर्ण चित्रपट दिसेल) असं ते गणित होते. चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यातील अशा अनेक वेगळ्या गोष्टी एक वेगळेच विश्व आहे. त्या काळाला मागे टाकून आपण आता बरेच पुढे आलो आहोत. आता ओटीटी युगात नवीन फंडे नकोत का? तर हवेत. ते भविष्यातील तरतूद आहे. ‘गॅन्ग्स ऑफ वासेपूर’ असाच दोन भागातील लांबलचक चित्रपट. आणि ओटीटीवर आपल्या सवडीनुसार आणि हवा तेवढा चित्रपट पाह्यची सोय असे हे समीकरण आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal एकाच मध्यंतरचा असावा की दोन? हा वाद आठवतोय? त्याची लांबी तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशेएक्याण्णव मिनिटे इतकी आहे. जुन्या रिळाच्या हिशोबात वीस रिळे होतात. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘ ची लांबी तीन तास चोवीस मिनिटांची असूनही ‘विना तक्रार, विना कंटाळा ‘ अनेकांनी अक्षरश: पुन्हा पुन्हा पाहत. लांबलचक चित्रपटाच्या गोष्टीच वेगळ्या.

सत्तरच्या दशकात सेन्सॉर सर्टिफिकेटवर अठरा, एकोणीस रिळ असं वाचलं रे वाचलं, हाऊसफुल्ल थेटरात टाळ्या शिट्ट्यांचा जणू पाऊस पडे. त्यात एक टाळी माझीही. नेहमीच्या तिकीटात जास्त पिक्चर पाहायला मिळणार असाच तो जणू आनंद असे. मल्टिप्लेक्स युगात एकशेसाठ मिनिटांचा चित्रपट म्हणजे, दिग्दर्शकाने जणू एखादी गोष्ट मांडताना जास्त वेळ घेतल्याची मुव्ही लव्हर्सची भावना. पण खरंच तसं असते काय? दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’ची लांबी दोनशे चौदा मिनिटे होती. आणि त्यावरुन चित्रपटसृष्टीत व मिडियात ‘फार लांबी आहे ‘ अशी कुजबुज, कुरकूर झाली. त्याच वेळेस आशुतोष गोवारीकरची एका फिल्मी मुहूर्तात भेट झाली असता, तो मला म्हणाला, “एखादी गोष्ट तपशीलवार आणि रंगवून सांगितली की ती अधिक प्रभावी ठरते. समोरच्यापर्यंत पोहचते. त्यामुळे ती तशीच मांडायला हवी”.
आशुतोष गोवारीकरच्या या म्हणण्याशी मी सहमत झालो. त्यानेच दिग्दर्शित केलेल्या ‘लगान’ची लांबी दोनशे चोवीस मिनिटे आहे. त्याच्या थीमनुसार ते परफेक्ट होते. मध्यंतरानंतर क्रिकेट सामन्यातून चित्रपट आकार घेत घेत जातो, त्यासाठी भुवन (आमिर खान) अतिशय कष्टाने क्रिकेट संघ तयार करतो आणि मग क्रिकेट शिकण्यापासून सांघिक भावना निर्माण करण्यापर्यंत बरेच काही चित्रपटात घडते. आणि तब्बल दीड दोनशे वर्षांपूर्वीच्या खडूस इंग्लिश संघाचा पराभव करतो. हे सगळं अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून पडद्यावर येत जाते म्हणजे वेळ लागणारच आणि चित्रपट रसिकांनी ‘या चित्रपटातील क्रिकेटचा खेळ छान एन्जाॅय केल्याने पिक्चर हिट झाला. आशुतोष गोवारीकर ‘व्हाॅटस युवर राशी’ या चित्रपटात दोनशे अकरा मिनिटात पकड घट्ट करु शकला नाही. याचं कारण एकच, एकाद्या मालिकेचा विषय त्याने चित्रपटात साकारला. त्याच्या ‘स्वदेश ‘ची दोनशेदहा मिनिटाची लांबी थीमनुसार परफेक्ट. आपल्या देशातील ग्रामीण भागातील वास्तव त्यात त्याने मांडले. तेथील जीवनाचा संथ वेग चित्रपटात आपोआप आला.
आपल्या देशातील पहिल्या दोन मध्यंतरचा चित्रपट ‘संगम’ विशेष उल्लेखनीय. आर. के. फिल्म बॅनरचा हा पहिला रंगीत चित्रपट. राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात प्रेम त्रिकोणाची गोष्ट. दोन जिवलग मित्र (राज कपूर व राजेंद्रकुमार) एकाच युवतीच्या ( वैजयंतीमाला) प्रेमात पडतात. त्यातला रोमान्स, समज गैरसमजातील नाट्य, गीत, संगीत व नृत्य यांच्या केमिस्ट्रीत भरपूर युरोप दर्शन. हा १९६४ चा चित्रपट म्हणजे एकसष्ट वर्ष होताहेत. मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील अप्सरा चित्रपटगृहाचे उदघाटन ‘संगम’ने झाले. चित्रपटाच्या नियमित वेळा होत्या दुपारी अकरा, साडेतीन आणि रात्री आठ. आणि रसिकांनी दोन्ही मध्यंतर एन्जाॅय केला. असा पहिलाच अनुभव म्हणून ते सुखावले.

या यशापासून जणू खुद्द राज कपूरचीच महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्याने तब्बल सहा वर्ष खर्च करुन दोन मध्यंतरचा ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) चित्रपट निर्माण केला. राज कपूरसारखे ‘चित्रपट हाच आपला श्वास मानणारे दिग्दर्शक’ चित्रपटाच्या लांबी वा रुंदीपेक्षा खोली महत्वाची मानत. पहिल्या ट्रायलला या चित्रपटाची लांबी ४ तास आणि ४३ मिनिटे ( दोन मध्यंतर) अशी इतकी होती. हा चित्रपट प्रदर्शित करताना तो ४ तास ९ मिनिटे अर्थात दोनशे एकोणपन्नास मिनिटे (दोन मध्यांतर) अशा अवधीने पडद्यावर आला. पण फस्ट डे फर्स्ट शोपासूनच तो पडला पडला, बोअर है अशी जोरदार आवई उठली आणि मग त्याची लांबी कमी करुन ती १७८ मिनिटे (एक मध्यांतर) अशी करण्यात आली. तरीदेखील तीन तास.
विशेष म्हणजे, यू ट्यूबवर मूळ दोन मध्यंतरचा म्हणजेच ४ तास ९ मिनिटे लांबीचा चित्रपट चक्क आहे. आवर्जून पहा. रोमान्स आणि सर्कस, सेक्स आणि गीत संगीत यांचा छान मेळ घातलाय. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आर. के. फिल्मच्या वतीने त्या काळातील नियमानुसार दहा वर्षांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला असतानाच तो मूळ रुपातच सेन्सॉर करुन घेतला आहे. आपल्या चित्रपटावरचे निस्सीम प्रेम, अभिमान आणि विश्वास असावा तर तो असा आणि अस्सल फिल्म दीवाने आवर्जून वेळ काढून मूळ ‘मेरा नाम जोकर’ अगदी आवर्जून यू ट्यूबवर पाहताहेत.
================================
हे देखील वाचा : Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी
================================
या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते. अतिशय दणदणीत पब्लिसिटीने हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटापासून मुंबईतील ‘बेस्ट’ बसला या चित्रपटाच्या पोस्टरने रंगवले होते. कालांतराने रणधीर कपूरने एका मुलाखतीत याच चित्रपटावरुन त्याला प्रश्न करताच उत्तर दिले, आमच्या चित्रपट निर्मिती संस्थेचा सर्वाधिक यशस्वी ‘मेरा नाम जोकर ‘ आहे. म्हणजेच त्या चित्रपटाने रिपिट रन इत्यादीत रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला.
चित्रपटाच्या लांबीच्या या गोष्टीत राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ची लांबी दोनशे सहा मिनिटे इतकी. मला आठवतंय, मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना लिबर्टी थिएटरची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटे दिली होती (संपूर्ण मुंबईत या एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यामागे व्यावसायिक रणनीती होती.) ‘गीत संगीत व नृत्यातून बोलणारा ‘ हा चित्रपट एन्जॉय करीत असतानाच फर्स्ट इंटरमिशन असे पडद्यावर आले. म्हणजे हे पहिले मध्यंतर असून आणखीन एक मध्यंतर आहे हे लक्षात आले आणि तासाभरात दुसरं मध्यंतर आले. पाचव्या दिवशीच थोडी लांबी कमी करुन एक मध्यंतर केल्यावर चित्रपट आणखीन प्रभावी ठरला आणि लिबर्टीती एकशेदोन आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केला.
सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ ही तब्बल दोनशे तेरा मिनिटांचा जबरदस्त मसालेदार मनोरंजक चित्रपट. अनेक व्यक्तिरेखा आणि मूळ कथानकात अनेक उपकथानके अशी त्यात सांगड. जनसामान्यांचे भरपेट मनोरंजन करण्याची जणू ही हौस मौज. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘एलओसी कारगिल ‘ची लांबी तब्बल दोनशे पंचावन्न मिनिटे इतकी. युध्दाची तयारी, युध्दाचा थरार यात चित्रपट थरारक झाला तरी दिग्दर्शक जे. पी. दत्तावर ‘बॉर्डर’च्या यशाचा हॅन्गओव्हरच दिसला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘गॅन्ग्स ऑफ वासेपूर ‘ अतिशय तपशीलवार साकारताना लांबीवर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही. अनेक व्यक्तिरेखा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून चित्रपट रंगवला. तो झाला, तीनशे नऊ मिनिटांचा. म्हणजेच दोन मध्यंतर हवीत. त्यापेक्षा त्याने पहिला भाग आणि त्याचा सिक्वेल असे केले. रसिकांना ते आवडले हे जास्त महत्वाचे. एक प्रकारे एकच पूर्ण चित्रपट पाह्यला दोनदा तिकीट काढले म्हणायचे.

पिक्चरची लांबी प्रकरण दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होण्याच्या ट्रेण्डमध्येही कायम. जणू मूळ तमिळ वा तेलगू चित्रपट लांबीने मोठे तेवढेच मनोरंजन मोठे असं वातावरण. पहिला ‘बाहुबली’ आणि दुसरा ‘बाहुबली’ मिळून तब्बल तीनशे सतरा मिनिटांचा जबरदस्त फॅण्टसी ड्रामा. पडद्यावरच्या विश्वात रसिक रमून गेले. ‘आर आर आर’ ची लांबी एकशे एकोणनव्वद मिनिटे. थरारक ॲक्शन आणि भरपूर व्हीएफएक्सने आपण या चित्रपटाला इतका वेळ कधी बरे दिला हे लक्षातच येत नाही. अधिकची लांबी एकाद्या चित्रपटाच्या पथ्यावरही पडते. ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’ असेच लांबलचक. पब्लिकला वाटले पैसा वसूल है….
================================
हे देखील वाचा : जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!
================================
मोठ्या शहरांत हे लांबी प्रकरण यशस्वी ठरते. छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात ‘रिळांच्या युगात ‘ या लांबीवर स्थानिक थिएटरवालाच कात्री चालवे. तेथे ‘दिवसा चार खेळ’ ही थिएटर संस्कृती. बारा, तीन, सहा व नऊ अशा ‘फिक्स्ड वेळा’. त्यात बसेल तेवढाच पिक्चर आम्ही दाखवू असाच जणू रोखठोक बाणा. पब्लिकने मूळ चित्रपटातील काय कापलयं, काय ठेवलयं याची चिंता न करताच पिक्चर एन्जॉय केलेत. अनेक तालुक्यात वा गावांत रात्रीचा खेळ संपल्यावर रिक्षा/ सितारा/टमटम पकडायची घाई, ते कुठे हो जास्त लांबीचे पिक्चर पाहत बसणार? लांबलचक पिक्चरच्या गोष्टी शहरापासून लांब लांब गेल्यावर बदलत जातात… आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीत असे अनेक घटकमटक चवळी चटक आहेत. आपल्या देशात चित्रपट पाहणं म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन असते ते हे असे. सगळेच मोठ्या लांबीचे चित्रपट भविष्यात वेबसिरीज म्हणून ओटीटीवर येतीलही…