जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

Sholay पुन्हा आला, मिनर्व्हाच्या आठवणी जाग्या झाल्या…..
‘शोले’च्या नावावर ‘पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत असलेला’ (चित्रपटाच्या भाषेत रिपीट रनला) चित्रपट हादेखील एक भारी विक्रम. बरं इतकं असूनही या पिक्चरची क्रेझ कायम. या चित्रपटात असं काय पाहण्यासारखे आहे? असा गंभीर प्रश्न करण्यात अभ्यास आहे असे मानणारा वर्ग असूनही कधीही ‘शोले’ प्रदर्शित व्हावा, हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्यानी तो एन्जॉय केला जातोय. मूळ शेवटासह (क्लायमॅक्स) ” शोले द फायनल कट ” असं म्हणत पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सर्वकालीन सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत असताना आज मिनर्व्हा चित्रपटगृह जागेवर आहे कुठे? याचं उत्तर काय आहे?
‘शोले’ १२ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे यानिमित्ताने आवर्जून मिनर्व्हा चित्रपटगृहाला भेट दिली आणि मिनर्व्हा चित्रपटगृहाबाबतच्या माझ्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दशकभरापूर्वीच मिनर्व्हा चित्रपटगृह पाडले आहे आणि अजूनही ते पाडलेल्या अवस्थेत आहे. आज तेथे पत्रे लागल्याचे दिसते. पण मी कायमच म्हणतो, आज जरी मिनर्व्हा चित्रपटगृहाची इमारत पाडली असली तरी तेथे गेल्यावर मला ‘शोले’तील गब्बरसिंगची दहशत जाणवते. वीरु आणि जय यांच्यातील नाणेफेकीतील नाणे आपल्या आसपास पडलेय असा भास होतो. आजही मला होळीच्या गीत संगीत आणि नृत्याचा रंग आणि आनंद डोळ्यासमोर येतो.

आजही मिनर्व्हा चित्रपटगृहासमोर उभे असताना माझ्या डोळ्यासमोर ‘शोले’ च्या आगाऊ तिकीट विक्रीसाठी लागलेली लांबलचक रांग येते. त्या काळात आम्ही गिरगावकर, ग्रॅन्ड रोड, ताडदेव, खेतवाडीतील अस्सल चित्रपट रसिकांना ही ‘शोले’च्या आगाऊ तिकीट विक्रीसाठी लागलेली रांग पाहण्यातही एक प्रकारचा आनंद मिळत होता (आजही मला त्यामागचे उत्तर सापडत नाहीये. कदाचित त्या वयातील आणि तेव्हाच्या ‘शोले’ च्या हिस्टेरिया झाल्याचा तो परिणाम असावा. चित्रपट संस्कृतीतील अशा अनेक गोष्टी त्या काळानुसार असतात हे एकदा लक्षात घेतले तर त्या गोष्टीचे कौतुक वाटते.) मिनर्व्हात ‘शोले’ साठी अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर होते आणि ते वाढीव दर महाग वाटत होते. वडापाव दहा पैशाला मिळत असल्याचेही ते दिवस होते.
मुंबई झालेच, महाराष्ट्र राज्य आणि देशातील अनेक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड गेली आहेत त्यात आमचं मिनर्व्हा चित्रपटगृहदेखिल आहे. आजही ग्रॅन्ड रोडला पूर्व बाजूला उतरुन मिनर्व्हाकडे जाताना मला रामसे ब्रदर्सचे कार्यालयाकडून पुढे जाताना समोरची ज्युसची गाडी आणि त्याभोवतीची गर्दी डोळ्यासमोर येते. ज्युस पे पिक्चर की चर्चा.(‘शोले’च्या दिवसात मिनर्व्हाभोवतीचे असे अनेक लहान मोठे व्यवसाय तेजीत होते. एक सुपर डुपर हिट चित्रपट बरेच काही देत असतो. तो चित्रपट केवळ पडद्यावर गाजत नाही.) परवा असाच मी रामसे ब्रदर्सचे कार्यालयाकडून पुढे गेलो आणि रहिमचाचा (ए.के.हनगल) यांचा कापरं भरलेल्या आवाजातील “इतना सन्नाटा क्यू है भाई” हा संवाद ऐकायला आला….
आपल्या क्रिकेट व सिनेमावेड्या देशात आवडत्या स्टेडियमवर व चित्रपटगृहावरही भरभरुन प्रेम करणारे क्रिकेट फिल्म दीवाने खूप आहेत. स्टेडियमवरचा माहौल फलंदाजाचा हुरुप वाढवतो. गोलंदाजीची लय सापडते. एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स जेव्हा अनेक आठवडे हाऊसफुल्लचा फलक दिमाखात लावत त्या काळात तर ‘आवडता स्टार, आवडते थिएटर ‘ ही तर वेगळी संस्कृती होती आणि अशातच आपल्या अशाच एका आवडत्या पाडलेल्या चित्रपटगृहाच्या जागेच्या व्यवहाराची चक्क जाहिरात येते तेव्हा एकाद्या चित्रपटप्रेमीच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यास आश्चर्य ते काय?

दक्षिण मध्य मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील (जुना लॅमिंग्टन रोड) मिनर्व्हा थिएटरबाबत अगदी असेच झाले आहे. मूळचे जुने मिनर्व्हा थिएटर पाडून त्या जागी नवीन भव्य इमारत उभी राहिली आणि त्याच्या उदघाटनाच्या वेळेसच त्याला ‘महाराष्ट्राचे गौरवस्थान ‘ म्हटले गेले. तीच त्याची कायमस्वरूपी ओळख झाली. जुन्या मिनर्व्हातील शेवटचा चित्रपट होता नरेन्द्र बेदी दिग्दर्शित आणि राजेश खन्ना, मुमताज आणि संजीवकुमार अभिनित ‘बंधन’ (१९७०) तर नवीन मिनर्व्हाचा पहिला चित्रपट होता, एफ. सी. मेहरा निर्मित आणि सुशील मुझुमदार दिग्दर्शित ‘लाल पत्थर’ (३१ मार्च १९७२). राजकुमार, हेमा मालिनी, राखी आणि विनोद मेहरा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या थिएटरची मालकीच इगल फिल्मचे निर्माते एफ. सी. मेहरा आणि अभिनेता शम्मी कपूरची असल्याने मेहरांच्याच चित्रपटाने याचे उदघाटन होणे स्वाभाविक होतेच. शम्मी कपूरचे थिएटर? एका हीरोचे सिनेमा थिएटर? याचं त्या काळात, त्या वयात केवढं कुतूहल आणि कौतुक होते काही विचारू नका. ( चित्रपट स्टारचे वितरण कार्यालय आणि चित्रपटगृह मालक या दोन गोष्टी अधिकच माहितीपूर्ण व रंजक विषय आहे. एकदा त्यावर लिहिन.)
चित्रपटगृह संस्कृतीत आमच्या मिनर्व्हाचे स्थान खूपच मोठे आणि महत्वाचे होते. ते वाढवले रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) ने! ‘शोले आणि मिनर्व्हा ‘ एकाच नाण्याच्या दोन भक्कम बाजू आहेत.( की होत्या ? आज मिनर्व्हाची इमारत जागेवर नाही हे दिसतेय.) संपूर्ण मुंबईत फक्त मिनर्व्हा, न्यू एक्सलसियर ( यात पहिले मोजून काही आठवडे) आणि बसंत ( चेंबूर) येथेच ‘शोले ‘ सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड अशा स्वरुपात होता ( इतरत्र ३५ एमएमचा होता). मिनर्व्हात ‘शोले’ पाहण्याचा रोमांचक अनुभव घेतलेल्या नशीबवान पिढीतील मी एक आहे. आमच्या पिढीने सुपर डुपर हिट चित्रपटाचा काळ अनुभवलाय. हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्या….
मिनर्व्हात शोलेने दिवसा दीड, साडेपाच आणि साडेनऊ अशा तीन शोमध्ये ३१ ऑगस्ट १९७८ पर्यंत मुक्काम केला आणि मग तेथेच तो मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आणखीन दोन वर्षे असा एकूण पाच वर्षे खणखणीत चालताना त्याने सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण ढवळून काढले.म्हटल ना, सुपर डुपर हिट चित्रपट फक्त आणि फक्त पडद्यावर राहत नाही. ‘शोले‘चा मिनर्व्हातील प्रीमियर आजही चर्चेत असतो. सत्तर एमएमची प्रिन्ट इंग्लंडवरुन आली तरी ती विमानतळावर अडवल्याने पस्तीस एमएमच्या प्रिन्टवर प्रीमियर रंगला, तर ती प्रिन्ट उशीरा पोहचल्याने रात्री उशिरा रमेश सिप्पीने आपलाच ‘शोले ‘ मोजक्याच जणांसह पहाटेपर्यंत पाहिला
विजू खोटे अनेकदा तरी गप्पात रमल्यावर आपला येथील पब्लिकसोबत ‘शोले‘ पाहल्याचा अनुभव रंगवून सांगे. अलंकार चित्रपटगृहात मॅटीनी शोला ‘जय संतोषी मा’ (मुंबईत प्रदर्शित ३० मे १९७५) हाऊसफुल्ल गर्दीत भक्तीमय वातावरणात पाहिला जात असतानाच काही शुक्रवारनंतर ‘शोले’ आणि आजही त्यांच्या यशाची तुलना होतेय. मिनर्व्हाच्या महत्वाच्या गोष्टी अनेक. यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मचा ‘दाग‘ (१९७३) याच मिनर्व्हात रिलीज केला. गुलशन रॉय या चित्रपटाचे वितरक होते. विशेष म्हणजे, बीबीसीच्या राजेश खन्नावरच्या डॉक्युमेंट्रीत मिनर्व्हातील ‘दाग ‘च्या प्रीमियरचे काही क्षण आहेत. तेव्हाच मिनर्व्हा जगभरात पोहचले. मिनर्व्हात अनेक चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी यश संपादले, महत्वाचे चित्रपट असे, यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ आणि ‘शक्ती’, प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘आझाद ‘, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘नसिब’, राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘हुकुमत’ , राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘सोहनी महिवाल’, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘तवायफ’, एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह’ वगैरे. राम तेरी गंगा मैलीचे मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकाना मिनर्व्हाचे बाल्कनीचे फस्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिल्याने त्या हाऊसफुल्ल गर्दीत चित्रपटाचा वेगळा अनुभव आला.
तर येथे शंभर दिवसाचे यश मिळवलेले चित्रपटही बरेच. काही नावे सांगायची तर, राजा चवाथे दिग्दर्शित ‘मनचली’, रवि टंडन दिग्दर्शित ‘झूठा कही का’, राज सिप्पी दिग्दर्शित ‘सत्ते पे सत्ता’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘अशांती’, ऋषि कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’, राजीव मेहरा दिग्दर्शित ‘एक जान है हम’ वगैरे. आ अब लौट चले या चित्रपटाचीही आम्हा चित्रपट समीक्षकाना मिनर्व्हाचे बाल्कनीचे फस्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिलं होतं आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट मध्यंतरमध्ये थिएटरच्या कार्यालयात शशी कपूर आम्हा चित्रपट समीक्षकाना भेटायला आला होता. आताचा शशी कपूर हा ” ऐसपैस” सुटला होता आणि त्याला आपल्या पुतण्याच्या ( रिशी कपूर) पहिल्या दिग्दर्शनाबद्द्ल आमची मते जाणून घ्यायची होती.
मिनर्व्हा चित्रपटगृहात काही चित्रपट रसिकांनी नाकारले. ‘दिल दौलत और दुनिया’, ‘मनोरंजन’, ‘प्रेम शास्र’, ‘महान’, ‘पुकार’, ‘शरारा’, ‘बारुद’ (अक्षय कुमार व रविना टंडन), ‘कोयला’, ‘रुप की रानी चोरो का राजा’, ‘चमत्कार’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘कसम’, ‘किला’ वगैरे वगैरे. हे झाले दिवसा तीन खेळ याप्रमाणेचे प्रगती पुस्तक. याच मिनर्व्हातील मॅटीनी शोची गोष्ट आणखी वेगळी. अशोककुमार आणि प्राण यांनी दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे गात धमाल उडवलेला ‘व्हीक्टोरिया नंबर २०३’ने येथे मॅटीनी शोला तब्बल साठ आठवडे मुक्काम केला. कागज की नाव, ‘अमानुष’, ‘डिस्को डान्सर’ अशा काही फिल्मनी मॅटीनीला ज्युबिली हिट मुक्काम केला.
================================
हे देखील वाचा : जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!
================================
मिनर्व्हाच्या वाटचालीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट, मनमोहन देसाई निर्मित ‘अनमोल’ ( ऋषि कपूर व मनिषा कोईराला). हा मॅटीनीलाच रिलीज झाला पण पहिल्याच दिवशी खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे खुद्द मनजीना आश्चर्य वाटले. मिनर्व्हा चित्रपटगृहाची आसनक्षमता १४९९ सीटस. अतिशय भव्य दिव्य आणि देखणी अशी. हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्यानी पिक्चर एन्जॉय करण्यात भारी थ्रील होते. आपल्या देशात चित्रपट पाहणं हे एक भारी सेलिब्रेशन असते आणि ते मिनर्व्हासारख्या चित्रपटगृहात अनुभवता येई. आणि याच अशाच सिंगल स्क्रीन थिएटर्समधील पब्लिकने आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला.

मिनर्व्हाचे थिएटर डेकोरेशन कायमच पाहण्यासारखे असे. मी गिरगावात राहिल्याने हे डेकोरेशन पाह्यला मिनर्व्हावर जाऊन येई यात आश्चर्य नको, त्या काळात असे डेकोरेशन पाहण्याचीही प्रथा होती.‘शोले ‘च्या डेकोरेशचाही प्रभाव पडला. ‘दाग ‘च्या डेकोरेशनमधील शर्मिला टागोर आणि राखी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला राजेश खन्ना असो अथवा राम तेरी गंगा… च्या डेकोरेशनमधील धबधब्याखालील मंदाकिनी असो, अतिशय भव्य कटआऊट होता. सत्ते पे सत्ताच्या मिनर्व्हावरच्या डेकोरेशनचा फोटो आजही सोशल मिडियात लाईक्स मिळवतोय. मिनर्व्हाच्या तळमजल्यावरील शोकेसमधील भरपूर शो कार्टस पाह्यची कायमच चंगळ असे.विशेषतः आगामी चित्रपटाची कार्ड्स पाहून ‘पिक्चरमध्ये दम असेल वा नसेल ‘ असेही ठामपणे सांगणारे असत.
================================
हे देखील वाचा : ….ही तर उद्याची Web Series
================================
मल्टीप्लेक्स युगात हे मेन थिएटरचे वैशिष्ट्य कालबाह्य होत गेले. २००६ साली मिनर्व्हाची विक्री झाली आणि काही दिवसातच थिएटरच पाडले गेले. सुरुवातीला वाटले, चार स्क्रीनचे मल्टीप्लेक्स उभारले जाईल, पण बातमी आली की, येथे भव्य आर्टस काॅम्प्लेक्स उभारले जाईल. पण तसे काहीही न होता पुन्हा पुन्हा याच जागेच्या विक्रीच्या जाहिराती येऊ लागल्या आणि त्या जुन्या आठवणी देऊ लागल्या. आताही तेच झाले आहे. चित्रपटगृह म्हणजे चार भिंती, एक पडदा, प्रोजेक्शन, पब्लिक, त्यांच्या टाळ्या शिट्ट्या यासह बरेच काही ना काही असते. अनेकांचे भावविश्व या वास्तूशी जोडले गेलेले असते. आणि मग कधी गप्पांचा फड रंगला की जुन्या चित्रपटाच्या आठवणीसह थिएटरचा फ्लॅशबॅकही डोळ्यासमोर येतोच. आता तर ही वास्तूच नाहीशी झाल्याने फक्त आठवणीची रिळे आहेत.
================================
हे देखील वाचा : Bollywood & Marriage : साखरपूडा झाला पण….
================================
एका पिढीकडे ज्युन्या काळातील मिनर्व्हाचा अनुभव…. अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या मिनर्व्हा मुव्हीटोन या चित्रपट निर्मिती संस्थेच्या मालकीचे ते होते. १९३०\ ३२ च्या सुमारास ते सुरु झाले. म्हणजेच मूकपट ते बोलपट असा तो प्रवास होता. प्रभातचा ‘चंद्रसेना’ (१९३५) येथेच प्रदर्शित झाला. मिनर्व्हा मुव्हीटोन निर्मित ‘पुकार’ (१९३९), ‘सिकंदर’ (१९४१), ‘पृथ्वीवल्लभ’ (१९४३), ‘एक दिन का सुल्तान’ (१९४१), ‘झांशी की रानी’ (१९४५) येथेच प्रदर्शित झाले. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कानून’, ‘धुल का फूल’ यांचे प्रीमियर येथेच रंगले व चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतरच्या काळात ‘राजकुमार’, ‘जहां प्यार मिले’, ‘मिलन’ इत्यादी. गुरुदत्त यांचा बहुचर्चित ‘साहिब बीवी और गुलाम’ हा चित्रपट लिबर्टीसह जुन्या मिनर्व्हातही प्रदर्शित झाला. म्हणजेच जुने मिनर्व्हादेखिल तितकेच वैशिष्ट्यपूर्ण.
महत्वाचे म्हणजे, एकदा खुद्द अमजद खान १३० व्या आठवड्यात येथे ‘शोले’ पाहायला आला त्याची बातमी झाली होती….सिंगल स्क्रीन थिएटर्स अशी बहुरंगी, बहुढंगी. एकेक करत ‘पडद्याआड ‘ गेली तरी चित्रपट रसिकांच्या मनात/मेंदूत/ ह्रदयात त्यांना कायमचे ‘शो ‘ आहेत. तेथील आठवणींचा खेळ संपणारा नाही. पिढी बदलत राहिली तरी त्या आठवणींची साठवण भारीच. चित्रपटगृहाच्या माध्यमातून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचतो म्हणूनच जगभरातील प्रत्येक चित्रपटगृहाचा इतिहास अतिशय महत्त्वाचा. शहरापासून दूर ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन थिएटर्सपर्यत प्रत्येकाचे आपलं एक व्यक्तीमत्व आणि वैशिष्ट्य आहे ( वा होते). आणि या एकपडदा चित्रपटगृहाचेही आत्मचरित्र प्रकाशित होवू शकते. आमच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात चे तर नक्कीच. ‘शोले : द फायनल कट’ प्रदर्शित होत असताना तर मिनर्व्हा आठवणारच.