
Shammi Kapoor यांनी बप्पी लाहिरीला का गाऊ दिले नाही?
भारतीय सिनेमांमध्ये पाश्चात्त्य संगीताचा वापर पूर्वीपासून होत आहे. परंतु सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात डिस्को संगीताचे आगमन झाले आणि पुढची आठ दहा वर्ष या डिस्को ने हिंदी सिनेमा गाजवून सोडला. संगीतकार बप्पी लहरी यांनी डिस्कोचा मुबलक वापर आपल्या संगीतातून केला. निर्माता रामानंद सागर आणि दिग्दर्शक आनंद सागर यांचा ‘अरमान’ हा चित्रपट १९८१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील दोन डिस्को गीतांनी अभूतपूर्व असे यश मिळवले होते. या चित्रपटाला संगीत बप्पी लहरी यांचं होतं. या चित्रपटात शम्मी कपूर चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत होते. त्यांच्यावर देखील एक गाणं या चित्रपटात चित्रित झाले आहे. हे गाणं बप्पी लहरी स्वतः गाणार होते. परंतु शम्मी कपूर यांनी बप्पीला,” हे गाणं तू गाऊ नकोस!” असं सांगितलं. ”माझ्या म्हातारपणाचा आणखी मजाक करू नकोस”, असं देखील सांगितलं. शम्मी कपूर असं बप्पी लाहिरी यांना असे का म्हणाले? मग बप्पी ने ते गाणं गायलं का? त्या गाण्याचे पुढे काय झाले? खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.
बप्पी लहरी यांचा हिंदी सिनेमा मध्ये प्रवेश सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी झाला. पण त्यांना खरी लोकप्रियता १९७५ साली आलेला ‘जखमी’ या चित्रपटापासून मिळाली. त्यानंतर ‘लहू के दो रंग’(१९७९) या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली.याच काळात बप्पी लहरी यांनी स्वतः देखील प्लेबॅक सिंगिंग सुरू केलं होतं. त्यांनी मिथुन चक्रवर्तीसाठी ‘सुरक्षा’(१९७९) या चित्रपटात मौसम है गाने का हे गाणं गायलं ते प्रचंड लोकप्रिय झाले. ‘वारदात’(१९८१) मध्ये ‘तू मुझे जान से भी प्यारा है ‘ मिथुन साठी गायले. विनोद खन्ना साठी ‘बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो’ (आप की खातीर) हे गाणं तर त्या काळात तरुणाईचा बेहद लाडके गाणं झालं होतं.

‘प्यारा दुश्मन’ हा चित्रपट १९८० साली प्रदर्शित झाला होता यातील ‘हरी ओम हरी’ हे उषा उथप यांनी गायलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. डिस्को संगीताची ही नांदी होती. या गाण्याचे लोकप्रियता पाहून अनेक संगीतकार डिस्को संगीताकडे वळाले. ‘प्यारा दुश्मन’ च्या लोकप्रियता नंतर अनेक निर्माते बप्पी लहरीकडे अशाच प्रकारचे संगीत डिमांड करू लागले. याच सिनेमाच्या दिग्दर्शकाने (आनंद सागर) ने १९८१ साली ‘अरमान‘ सिनेमा प्रेक्षकांपुढे आणला. गोवा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी या सिनेमाला होती. या चित्रपटात राजबब्बर, दीपक पराशर, शम्मी कपूर, रंजीता, कल्पना अय्यर, प्रेमा नारायण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी हिंदी वर अंजान,इंदीवर आणि कुलवंत जानी यांनी लिहिली होती. या सिनेमातील उषा उथप यांनी गायलेले ‘रंभा हो संभा हो मै नाचू तुम नाचो’ ’ आणि शेरोन प्रभाकरन हिने गायलेलं ‘हां मेरी जैसी हसीना का दिल…’ प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आज ही दोन गाणी हीच या चित्रपटाची आठवण आहे.

पण या चित्रपटात किशोर कुमार यांनी दोन गाणी गायली होती. त्यातील एक गाणं शम्मी कपूर वर चित्रीत झालं होतं. हे गाणं खरंतर आधी बप्पी लहरी स्वतः गाणार होते. शम्मी कपूर ने या चित्रपटात गोव्यातील एका हॉटेलमधील पियानो वादकाची भूमिका केली होती. हे गाणं खूप फिलॉसॉफिकल होतं. ‘आत्महत्या करायला निघालेल्या व्यक्तीला आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अशा प्रकारे संपवायचं नसतं’ असा संदेश या गाण्यातून द्यायचा होता. हे गाणं जेव्हा बप्पी लहरी गाणार असं शम्मी कपूर यांना कळालं तेव्हा ते तडक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले. तिथे त्यांना दिसले बप्पी याच गाण्याची रिहर्सल करीत आहेत. त्यांनी बप्पी ला हात जोडून सांगितले,”बेटा ये गाना तुम मत गाओ.” त्यावर बप्पीने विचारले “ क्यूं अंकल?” त्यावर शम्मी कपूर यांचे म्हणणे होते,” माझा आवाज पहिले पासून थोडासा भारदस्त आहे आता वृद्धापकाळानंतर तो जास्तच झालेला आहे आणि तुझा आवाज पातळ आहे आणि तरुणाईला शोभणारा आहे. त्यामुळे तू जर हे गाणे गायलेस तर ते मला अजिबात सूट होणार नाही. उलट माझ्या म्हातारपणाचा मजाक होईल. तेव्हा कृपया हे गाणे तू गाऊ नकोस. तुझ्या ऐवजी हे गाणे तू किशोर कुमारला गायला दे!”
================================
हे देखील वाचा : जेव्हा Shammi Kapoor वर चित्रित गाणे शमशाद बेगमने गायले होते!
================================
बप्पीने विचार केला आणि त्याला ते पटले. त्याने सांगितले, “शम्मी अंकल तुम्ही बरोबर म्हणत आहात. हे गाणे आता किशोर कुमारच गातील!” त्यावर शम्मी कपूर ने खूष होऊन बप्पी लाहीरीला मिठी मारली. नंतर बप्पी ने किशोर कुमारला रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये बोलावले काही रिहर्सल नंतर लगेच हे गाणं रेकॉर्ड देखील झालं! किशोर कुमारच्या ऐंशीच्या दशकातील अप्रतिम गाण्यांपैकी हे गाणं होतं. गाण्याचे बोल होते ‘ सारे जहां की अमानत है ये जीवन तुम्हारा तुम्हारा नही.’ चित्रपटात हे गाणे शम्मी कपूर वर चित्रीत झालं होतं. आणि त्या काळात या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळाली होती. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाची खरी दोनच गाणी गाजली ती डिस्को गाणी. या गाण्याचे दुसरे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे किशोर कुमारने शम्मी कपूर साठी गायलेले हे पहिलं गाणं ठरलं! त्यासाठी देखील शम्मी कपूरसाठी हे गाणं खूप महत्त्वाचं होतं. शम्मी कपूर आणि किशोर कुमार खरंतर एकाच वेळी रुपेरी पडल्यावर आले होते पण किशोर कुमारचा प्लेबॅक शम्मी कपूर साठी तब्बल तीस वर्षानंतर रसिकांना ऐकायला मिळाला!