
Manna Dey : तू प्यार का सागर है, तेरी इक बुंद के प्यासे हम….
गोल्डन इरा मध्ये प्रत्येक संगीतकाराने आणि नायकाने आपापले पार्श्वगायक निवडून घेतले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या जोड्या जमल्या होत्या. पण मन्नाडे हे असे एकमेव गायक होते जे तसे कोणाचेच लाडके नव्हते, कोणत्याही नायकासोबत अथवा संगीताकारासोबत त्यांची हमखास जोडी जमली नव्हती. शास्त्रोक्त गायकीवर त्यांची जबरदस्त कमांड होती. त्यामुळे ज्या ज्या वेळी सिनेमांमध्ये शास्त्रीय रागधारीवर आधारित गाण्यांची मागणी असायची त्यावेळेला हमखास मन्नाडे यांचा स्वर आठवला जायचा. संगीतकार शंकर जय किशन यांनी मन्नाडे यांचा स्वर भरपूर वापरला.
जवळपास ७५ हून अधिक गाण्यांमध्ये मन्ना आपल्याला शंकर जयकिशन यांच्याकडे गाताना दिसतात. या गाण्यांचा आपण ज्यावेळी आढावा घ्यायला लागतो त्यावेळी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील कितीतरी माणिक मोती मन्ना डे च्या स्वरातून शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात गायलेली दिसतात. आर के च्या १९५१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटात मन्नाडे यांनी पहिल्यांदा शंकर जयकिशन यांच्याकडे गाणे गायले. ‘तेरे बिना आ गये चांदनी’ हे गीत त्यांनी लता मंगेशकर सोबत गाणे होते. या गाण्याचा दुसरा भाग होता ‘घर आया मेरा परदेसी’. राजकपूरसाठी मन्नाडे हे कॉम्बिनेशन पन्नास च्या दशकात अनेकदा दिसून आले. १९५३ साली आलेल्या आर के च्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटात मन्ना डे यांची दोन गाणी आशा भोसले सोबत होती. ही दोन युगल गीते होती ‘ठहर जरा ओ जाने वाले’ आणि दुसरे होतं ‘रात गई फिर दिन आया’ या चित्रपटात ‘लपक झपक तू आरे बदरिया’ हे धमाल अप्रतिम शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणं चित्रपटात डेव्हिडवर चित्रित झालं होतं.

१९५५ साली आलेल्या अमिया चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ या चित्रपटातील ‘तू प्यार का सागर है तेरी इक बुंद के प्यासे हम…’ हे राग दरबारी वर आधारीत अतिशय सुंदर आणि मन्ना डे चे सिग्नेचर सॉंग ठरावे असे बनले होते.बलराज सहानी वर यांच्यावर चित्रित हे गाणे आज देखील गाण्यांच्या मैफिलीमध्ये दाद घेऊन जाते. आज जवळपास ५०-६० वर्षे झाली पण ‘घायल मनका पागल पंछी उडने को बेकरार…’ हे ऐकलं की मन सैरभैर होते. याच वर्षी आर के चा ‘श्री ४२०’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात मन्नाडे यांच्या वाटेला तीन गाणी आली होती. पैकी दोन युगल गीते होती. लता मंगेशकर यांच्यासोबतच बागेश्वरी रागावर बेतलेलं ‘प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यू डरता है दिल’ हे अप्रतिम मान्सून सॉंग आज प्रत्येक पावसात रसिकांना आठवते.
================================
हे देखील वाचा : Bandhan : कवी प्रदीप यांच्या गाण्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती!
================================
शंकर जयकिशन यांचे ऑर्केस्टेशन या गाण्यात जबरदस्त होते. याच चित्रपटात आशा भोसले सोबत मन्नाडे यांनी ‘ मुड मुड के न देख मुड मुड के…’ हे गाणं गायलं होतं. (या गाण्यात पडद्यावर जयकिशन यांचे ओझरते दर्शन घडते!) आणि याच चित्रपटात ‘दिल का हाल सुने दिलवाला सीधीसी बात न मिरची मसाला…” हे मन्नाडे यांनी गायलेलं सोलो गीत देखील होते. शंकर जयकिशन यांचा खरंतर मुकेश हा लाडका गायक. राज कपूर साठी तर मुकेश हे कॉम्बिनेशन त्या काळात प्रचंड लोकप्रिय होत पण असं असताना देखील एस जे यांनी जाणीवपूर्वक काही गाणी जी राजकपूर वर चित्रित करायची होती ती मन्नाडेला दिली आणि मन्ना डे ने देखील ती अप्रतिम सुरात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले.
१९५६ साली ‘बसंत बहार’ हा चित्रपट आला होता. संपूर्णपणे शास्त्रोक्त रागावर गाणी असलेल्या या चित्रपटाला खरंतर आधी नौशाद संगीत देणार होते पण चित्रपटाचे दिग्दर्शक राजा नवाथे यांनी शंकर जयकिशन यांचा आग्रह धरल्याने हा चित्रपट त्यांच्याकडे आला. त्याचप्रमाणे या चित्रपटातील सर्व गाणी रफी यांनी गावी असा निर्मात्याचा आग्रह होता. परंतु दिग्दर्शकांनी हा देखील आग्रह मोडीत काढला आणि मन्नाडेला सर्व गाणी दिली. मन्नाडे यांनी काय अप्रतिम गाणी गायली आहेत!’सूर ना सजे क्या गाऊ मै…’ हे बसंत बहार या रागावरील आधारित गाणं जनमानसात अतिशय लोकप्रिय ठरलं.
मिया कि मल्हार वर आधारीत ‘भयभंजना वंदना सुन हमारी’ हे भजन भक्तीरसात न्हावून निघाले होते. या चित्रपटात लता मंगेशकर सोबत मन्नाडे यांनी गायलेलं रागेश्वरी वर बेतलेलं ‘नैन मिले चैन कहा’ हे युगलगीत मस्त जमून आले होते. या गीतात सितार चा खूप सुंदर वापर केला होता. या चित्रपटातील गाण्यांचा मेरुमणी शोभावे असे गाणे मन्नाडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं होतं. बसंत बहार रागावर आधारीत गीताचे बोल होते ‘केतकी गुलाब जुही चंपक बन फुले’ पं.भीमसेन जोशी यांनी एस जे यांच्याकडे गायलेलं आहे एकमेव गाणे होते.

याच वर्षी १९५६ साली राज कपूर आणि नर्गिस यांचा ‘चोरी चोरी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील तीन युगल गीते चित्रपट संगीत रसिकांसाठी अतिशय आवडती अशी ही युगल गाणी आहेत. ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’,’ जहां मै जाती हूं वही चले आते हो’,’ ‘ये रात भीगी भीगी’ हीच ती तीन युगलगीते! मन्नाडे यांचा स्वर खरंच राजकपूर यांना परफेक्ट मॅच होत होता पण संगीतकारांनी फारसा तो वापरलेला दिसत नाही. गंमत म्हणजे या चित्रपटाचे निर्माते शेट्टी यांना या गाण्यांसाठी मुकेशचा स्वर हवा होता.त्यांचा मन्नाडेला विरोध होता पण राज कपूर आणि एस जे यांनी आपला मन्ना साठीचा आग्रह कायम ठेवला. मन्ना ने देखील अपमान गिळून आपल्या स्वरातील मेक ओव्हर तिथे सादर केला. हा स्वर केवळ थीम सॉंग किंवा भक्ती गीतासाठी नाही तर romantic songs देखील गावू शकतो हे सिद्ध केले. एस जे यांची हि किमया होती.
राजकपूर आणि नूतन यांचा ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनाडी’ हा चित्रपट १९५९ आला होता. या चित्रपटात मन्नाडे यांना केवळ एक गाणे मिळाले होते.न्यू इयर क्लब सॉंग असल्याने यात एस जे यांचे ऑर्केस्ट्रेशन जबरा होते. ट्रंपेट चा मस्त वापर होता.मन्नाडे आणि लताचा स्वर होता. याच वर्षी शम्मी कपूर आणि माला सिन्हा यांचा ‘उजाला’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ‘झुमता मौसम मस्त महिना’, ‘अब कहा जाये हम’,’ सुरज जरा पास आ’ ही मन्नाडे यांनी गायलेली गाणी होती . मन्ना यांचा स्वर आता शम्मी कपूरला देखील शोभला होता. याच दरम्यान ‘छोटी बहन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. यातील ‘ओ कली अनार कि ना इतना सताओ’ हे गाणं त्या काळात रेडिओवर प्रचंड लोकप्रिय झाले होते.

‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटातील है ‘आग हमारे सीनेमे हम आग से खेलते जाते है’ या गाण्यात मन्नाडे यांचा स्वर होता. १९६६ साली आलेल्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटात ‘चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडे वाली मुनिया..’ या उत्तरेकडील लोकसंगीतावर आधारीत गीत मन्नाडे यांनी अगदी उत्स्फूर्तपणे गायलं होतं. (या गाण्यात पडद्यावर गीतकार शैलेंद्र यांचे ओझरते दर्शन घडते!)या दशकातील मन्नाडे यांनी शंकर जयकिशन यांच्याकडे गायलेली काही उल्लेखनीय गाणी आता पाहूया ‘मुस्कुरा लाडले तू मुस्कुरा’ (जिंदगी) ये उमर क्या रंगीली (प्रोफेसर) मै तेरे प्यार का बिमार हू (लव इन टोकियो) दिल की गिरह खोल दो चुप न बैठो कोई गीत गाओ (रात और दिन) झनक झनक तेरी बाजे पायलिया (मेरे हुजूर) काल का पहिया घुमे रे भैया (चंदा और बिजली) आर के च्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात ‘ये भाय जरा देख के चलो’ हे गाणं त्या काळात खूप गाजलं होतं.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
गंमत म्हणजे या गाण्याला फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. मन्नाडे यांचे जे सच्चे चाहते आहेत त्यांना गंमतच वाटली होती कारण मन्नाडे यांची या आधीची इतकी चांगली गाणी येऊन गेली त्याला कधी पुरस्कार मिळाला नाही पण ‘ये भाय जरा देख के चलो..’ या गाण्याला मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! राज कपूर ने मन्नाडे स्वरामध्ये ‘लागा चुनरी मे दाग छुपाऊँ कैसे’ हे गाणं रोशनच्या संगीतात ‘दिल हि तो है’ या सिनेमात साकारलं होतं. हे गाणे शम्मी कपूरला प्रचंड आवडलं होतं आणि त्याने ‘जाने अनजाने’ या चित्रपटात मन्नाडे कडून त्याच टाईपचे ‘छम छम बाजे रे पायलिया’ हे गाणं दरबारी रागात गाऊन घेतलं आणि पडद्यावर ते साकारल. शंकर-जयकिशन यांच्या संगीतात मन्नाडे यांची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. मन्नाडे यांच्या स्वराला मेन स्ट्रीम मध्ये आणून ते जनमानसात रुजवण्याचं मोठं काम शंकर-जयकिशन यांनी केलं होतं.