
नाराज Asha Bhosle यांना किशोर कुमार यांनी कसे गायला तयार केले?
ऐंशीच्या दशकात भारतीय चित्रपट संगीताचा ट्रेंड टोटली बदलला होता. आता मेलडीयस गाण्याची संख्या झपाट्याने कमी होत होती. फास्ट ट्रॅक आणि डिस्को गाण्यांच्या संगीताला प्रेक्षक पसंत करत होते. अर्थपूर्ण शब्द रचना असलेली गाणी देखील कमी झाली होती. याच काळात एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आशा भोसले यांनी ते गाणे गायला चक्क नकार दिला होता. त्यांना या गाण्यातील शब्द वाह्यात वाटत होते. परंतु किशोर कुमार यांनी आशा भोसले यांना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आणि आशा भोसले यांनी ते गाणे गायले! किशोर कुमार सोबत गायलेल्या ऐंशी च्या दशकातील आशा किशोरच्या टॉप चार्ट बस्टर मध्ये या गाण्याचा समावेश झाला. कोणतं होतं ते गाणं ? कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा?

संगीतकार बप्पी लाहीरी यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांच्याकडे निर्माते अशाच प्रकारच्या संगीताची मागणी घेऊन येऊ लागले. ‘नमक हलाल’,’हथकडी’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘शराबी; हे त्यांचे चित्रपट प्रचंड यशस्वी होत होते. याच काळात त्यांना दक्षिणात्य निर्मात्यांकडून देखील मोठी मागणी येत होती कारण अभिनेता जितेंद्र त्या काळात साउथ कडच्या सिनेमाचा पहिली पसंत झाला होता. ‘हिम्मतवाला’(१९८३) या चित्रपटाच्या प्रचंड यशा नंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक के राघवेंद्रराव यांनी ‘तोहफा’ चित्रपटाची निर्मिती सुरू केली. जितेंद्र , श्रीदेवी आणि जयाप्रदा या चित्रपटाची प्रमुख स्टार कास्ट होती. चित्रपटाची गाणी इंदिवर यांनी लिहिली होती. तर संगीत बप्पी लाहिरी यांचं होतं.
================================
================================
या चित्रपटात एकूण पाच गाणी होती. त्यापैकी तीन गाणी किशोर कुमार आणि आशा भोसले यांची युगलगीते होती. एक युगल गीत किशोर आणि लताच्या स्वरात होते. तर एक गाणे एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या आवाजात होते. चित्रपटातील सिच्युएशन नुसार आणि बप्पी लाही री यांनी बनवलेल्या ट्यूनवर इंदिवर यांनी गाणी लिहिली. यातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग होते. आशा भोसले आणि किशोर कुमार दोघे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. बप्पी लाहीरी यांनी गाण्याचे बोल त्यांना ऐकवले. गाण्याचे शब्द ऐकल्यानंतर आशा भोसले यांनी बप्पीला थांबवले आणि म्हणाली ,” हे कोणते वाह्यात शब्द या गाण्यांमध्ये आहेत ? याला काही अर्थ आहे का? मी हे गाणे गाणार नाही. काय शब्द आहेत हे ? ‘एक आंख मारू तो परदा हट जाय दुजी आंख मारू जमाना झुक जाये दोनो आंखे मारू तो छोरी पट जाये..’ आणि शेवटी काय ? भंकस..! असे कधी शब्द असतात का गाण्यात? हे गाणे तुम्ही दुसऱ्या गायिकेकडून गाऊन घ्या. मी गाणे गाणार नाही!” असे म्हणून आशा भोसले यांनी स्टुडिओच्या बाहेर जायला सुरुवात केली.

बप्पी लाहीरी अवाक झाले. त्यांना आशाकडून अशा प्रतिसादाची मुळीच अपेक्षा नव्हती. ते घाबरले. त्यांनी किशोरला आशाला थांबवण्याची विनंती केली. किशोरकुमार लगेच आशाच्या मागे गेला आणि तिला थांबवले. नंतर किशोर कुमार आशाला स्टुडिओच्या एका रूममध्ये घेऊन गेले. त्यावेळी आशा भोसले किशोर कुमारला म्हणाल्या ,”किशोरदा तुम्हाला तरी अशी गाणी आवडतात का? काय शब्द आहेत.” त्यावर किशोर कुमार म्हणाले,” हे बघा आशा, हे गाणं जे मी गात आहे ते जितेंद्रवर चित्रित होणार आहे. याच जितेंद्रसाठी मी एकेकाळी ‘मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना’, ‘ओ माझी रे अपना किनारा’ सारखी अप्रतिम गाणी गायली आहेत. पण तो काळ वेगळा होता. आजचा जमाना टोटली वेगळा आहे. आजच्या प्रेक्षकांना हेच आवडते. हे गाणं ज्यांनी लिहिलं त्या इंदिवर यांनी एकेकाळी ‘जीवन से भरी तेरी आखे मजबूर करे जीने के लिए , ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये’ अशी भाव स्पर्शी गाणी लिहिली आहेत. आणि आशा तुला आणि मला काही वेगळे सिद्ध करायची गरजच नाही. आपली क्षमता रसिकांना माहित आहे. त्यामुळे नवीन पिढीच्या आवडीनुसार आता आपल्याला गायला लागेल आपल्याला आवडो अथवा न आवडो!”
================================
हे देखील वाचा : आशा भोसले यांच्या टाॅप टेन पैकी ‘या’ गाण्याची पन्नाशी
================================
आशा भोसले यांना किशोरचे म्हणणे पटले आणि रेकॉर्डिंगसाठी त्या तयार झाल्या. ‘तोहफा’ हा चित्रपट ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रदर्शित झाला आणि त्या वर्षी चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. यातील सर्वच गाणी प्रचंड गाजली ‘एक आंख मारू तो परदा हट जाये’ या गाण्याला तर पब्लिकने प्रचंड लोकप्रिय झाले!