
जेव्हा Mohamamd Rafi यांच्या डब्यात गेलेल्या गाण्याच्या ट्यूनवरील किशोर यांचे गाणे सुपरहिट झाले!
काही काही गाण्याची कशी गंमत असते पाहा. एक गाणे 1963 साली संगीतकार सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केले. हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. ज्या चित्रपटासाठी हे गाणं गायलं होतं तो चित्रपट गुरुदत्त फिल्मसचा होता. या सिनेमाचं एकच गाणं रेकॉर्ड झालं होतं आणि त्याच काळात संगीतकार सचिन देव बर्मन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी त्यांना पुढचे सहा महिने आराम करायला सांगितला. त्यामुळे या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांनी संगीतकार बदलला आणि सचिन दा यांच्या जागी ओपी नय्यर यांची वर्णी लागली. ओ.पी यांनी सचिन देव बर्मन यांनी स्वरबध्द केलेलं या सिनेमातील एकमेव गाणं काही या सिनेमात वापरलं नाही. नंतर पुढे पाच वर्षांनी सचिन दा यांनी याच गाण्याच्या ट्यूनवर किशोर कुमार यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं आणि जे प्रचंड लोकप्रिय झालं. म्हणजे रफी यांनी गायलेलं गाणं डब्यात गेलं पण या गाण्याच्या ट्यून वर किशोर कुमार यांनी गायलेले गाणं मात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं.कोणतं होतं ते गाणे?

महान दिग्दर्शक गुरुदत्त यांनी काळाच्या पुढचे चित्रपट दिले. आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा हे चित्रपट पाहतो तेव्हा त्यातील कंटेंट सोबतच गुरुदत्तच्या दिग्दर्शनाची कमाल आपल्या लक्षात येते. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ हे त्याचे तीन मास्टरपीस सिनेमे. यानंतर गुरुदत्त यांनी ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट निर्माण करायला सुरुवात केली. ‘कागज के फूल’ च्या अपयशानंतर त्याने दिग्दर्शन करणे बंद केले होते. ‘चौदहवी का चांद’ (एम. सादिक) आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ (अब्रार अल्वी ) यांच्याकडे दिग्दर्शनासाठी दिले होते.

या नंतरचा चित्रपट होता ‘बहारे फिर भी आयेंगी’ या सिनेमाचे दिग्दर्शन मात्र पुन्हा एकदा गुरुदत्त स्वतः करणार होता. या सिनेमात दोन हिरॉईन्स होत्या. माला सिन्हा आणि तनुजा. तर संगीतासाठी पुन्हा सचिन देव बर्मन यांना घेतले होते. शूट सुरू झाले यातील एका गाण्याची रेकॉर्डिंग देखील झाले. हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले होते. गाण्याचे बोल होते ‘ कोई ना तेरा साथी..’ गाणे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. हे सिनेमाचे शीर्षक गीत होते. सचिन देव बर्मन यांची खूप कॅची ट्यून या गाण्याला होती. पण याच काळात सचिन देव बर्मन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना डॉक्टरने सहा महिने काम करायला बंदी घातली. सिनेमाचे फक्त एकाच गाणे रेकॉर्ड झाले होते. आता के करायचे? गुरुदत्त यांनी आता संगीतकार बदलायचे ठरवले. सचिन देव बर्मन यांच्या जागी त्यांनी आता ओपी नय्यर यांना साईन केले. आता सर्वच बदलले. ओपी यांनी आता त्यांचे आवडते एस एच बिहारी,आजिज काश्मिरी, कैफि आजमी आणि अंजान यांना गीतकार म्हणून घेतले. त्यांनी चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू केले.

या सिनेमात पहिल्यांदाच गीता दत्त यांचा स्वर नव्हता. गुरुदत्त फिल्म्सने नऊ चित्रपटांची निर्मिती केली होती या सर्व सिनेमांमध्ये गीता दत्त यांचा परमनंट स्वर असायचा. पण या चित्रपटात मात्र गीता दत्त यांच्या वाट्याला एकही गाणे आले नव्हते गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्यातील ताणलेल्या संबंधाचे हे प्रतीक होते. दहा ऑक्टोबर 1964 या दिवशी गुरुदत्त यांचे निधन झाले. आणि हा चित्रपट अर्धवट राहिला. या सिनेमासाठी गुरुदत्त फिल्म भरपूर पैसा ओतला होता हा अर्धवट प्रोजेक्ट पूर्ण करणे गरजेचे होते. गुरुदत्तचा भाऊ आत्माराम आणि लेखक अब्रार अल्वी यांनी हा चित्रपट पूर्ण करायचे ठरवले. शाहीद लतीफ यांच्याकडे या चित्रपटाचे दिग्दर्शन दिले. आता सिनेमाचे सर्वच डायमेन्शन्स बदलले गेले सचिन देव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेले गाणे आपल्या सिनेमात वापरायला ओ पी नय्यर यांनी नकार दिला. मग या गाण्याचे पुढे के झाले? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
================================
हे देखील वाचा : नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?
================================
संगीतकार सचिन देव बर्मन यांनी बनवलेल्या गाण्याची ट्यून त्यांना खूप आवडली होती. सचिन दा यांनी हीच ट्यून नवकेतनच्या ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटातील ‘ये दिल ना होता बेचारा’ या गाण्यासाठी वापरली आणि हे गाणे तयार केले आणि जे प्रचंड लोकप्रिय झाले. youtube वर आता सचिन देव बर्मन यांनी ‘बहारे फिर भी आयेंगी’ या चित्रपटासाठी रफीच्या स्वरात रेकॉर्ड केलेले गाणे ‘कोई ना तेरा साथी हो…’ उपलब्ध आहे या गाण्याची लिंक मी खाली दिलेली आहे हे गाणे देखील तुम्ही जरूर ऐका. ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही पण यातली गाणी मात्र नितांत सुंदर होती. ‘आपके हसीन रूख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है..’ हे रफी यांच्या स्वरातील गाणे अप्रतिम झाले होते. गुरुदत्त च्या अकाली निधनानंतर या सिनेमात त्यांची भूमिका कोणाला द्यावी यावर बरीच चर्चा झाली. सुनील दत्त ला आधी विचारण्यात आले पण त्याने नकार दिला मग ही भूमिका धर्मेंद्रकडे आली.
https://youtu.be/sPYH1rpim4k?si=xJ4neanv7M6Hb0VP (कोई न तेरा साथी हो)
https://youtu.be/FKRdfz466wE?si=C5dAKVpOXJAl5cl7 (ये दिल न होता बेचारा)