
Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!
राजेश खन्नाच्या सुपरस्टार पदाच्या काळातील त्याच्या लेट लतीफपणाबद्दल (सेट वर उशिरा येण्याबाबत) खूप काही सांगून झालं आहे. उशिरा सेटवर यायचं, समोरच्याला अजिबात किंमत द्यायची नाही, आपल्याच मिजासखोर घमंडी स्वभावानुसार वागायचं, निर्माता दिग्दर्शकांना तासं तास ताटकळत ठेवायचं…. असे अनेक किस्से आज देखील बॉलीवूडमध्ये अतिशय चवीने सांगितले जातात. राजेश खन्नाचा स्टारडम संपल्यानंतर देखील तो स्वतःला सुपरस्टार समजत होता आणि तो त्याच तोऱ्यात वावरत होता असं देखील त्या काळातील पत्रकार सांगतात. त्याकाळच्या मीडियामध्ये असेच छापून येत होतं. पण या सर्व गोष्टींना छेद देणाऱ्या देखील काही घटना घडत होत्या. राजेश खन्ना प्रत्येक वेळी असंच वागत होता का? तर नक्कीच नाही. त्यातलाच हा एक वेगळा किस्सा. ज्यात राजेश खन्नाच्या त्या काळातील स्वभावाला छेद देणारी घटना घडली होती.
हा किस्सा ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा आहे. त्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण यावर चित्रपट निर्माण होत होते. १९८३ साली अमिताभ बच्चन यांचा ‘इन्कलाब’ राजेश खन्ना यांचा ‘आज का एम एल ए राम अवतार’ आणि जितेंद्र यांचा ‘यह देश’ हे एकाच जॉनवरचे चित्रपट एकाच वेळी बनत होते. त्यामुळे संपूर्ण बॉलीवूड मध्ये या तिन्ही सिनेमा बद्दल खूप उत्सुकता होती. या तिन्ही सिनेमात कोणता सिनेमा बाजी मारतो यावर या तिघांच्या यशापयशाचे गणित मांडले जाणार होते. त्यामुळे तिघेजण आप आपल्या सिनेमाबद्दल खूप जागरूक होते. राजेश खन्ना तर कमबॅक करण्यासाठी खूप उत्सुक होता. त्यामुळे ‘आज का एम एल ए राम अवतार’ या सिनेमाच्या पब्लिसिटीत कुठलीही कसूर सोडायची नाही असे त्याने ठरवले होते.

जेव्हा त्याने बघितले की या सिनेमाची पब्लिसिटी योग्य प्रकारे होत नाही त्या वेळेला त्यांनी त्या काळातील नामवंत पब्लिसिटी डिझायनर दिवाकर यांना पाचारण कले. दिवाकर यशवंत या नावाने त्यांचे पब्लिसिटी हाऊस होते. राजकपूर, गुलशन रॉय, बी आर चोप्रा यांच्या चित्रपटाची पब्लिसिटी ते करत असत. राजेश खन्नाने त्यांना आपला नवीन चित्रपट आणि त्याची पब्लिसिटी याबद्दल सांगितले. “पैशाची अजिबात काळजी करू नका“ असे देखील सांगितले. दिवाकर देखील खूष झाले आणि त्यांनी कुठलाही लेखी करार न करता पब्लिसिटीचे काम सुरू केले. त्या काळातील उपलब्ध असलेल्या सर्व मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी या सिनेमाची जोरदार पब्लिसिटी केली!
================================
हे देखील वाचा : Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?
================================
पण हे तीनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसा चमत्कार करू शकले नाही. ‘आज का एम एल ए राम अवतार’ या सिनेमाला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राजेश खन्ना देखील नाराज झाला. दिवाकर यांनी पब्लिसिटी करताना स्वत:चे तब्बल दोन लाख रुपये खर्च केले होते. आता हे पैसे त्याला राजेश खन्ना कडून हवे होते. पण सिनेमाच फ्लॉप झाल्यामुळे त्यांना मागायचे कसे? हा प्रश्न होता. जेव्हा दिवाकर लोकांना सांगत असतात की मी दोन लाख रुपये खर्च केले त्यावेळेला लोक त्याला मूर्ख समजत असे आणि कुठलाही करार न करता तू एवढा पैसा का खर्च केला आणि त्यात पुन्हा स्वतः हा पैसा कां घातला असे प्रश्न विचारून त्याला निरुत्तर करत होते. त्यामुळे आपले पैसे बुडाले याच विचारात दिवाकर होते. दोन लाख रुपये ही त्या काळात खूप मोठी रक्कम होती. काळ पुढे जात राहिला. हळूहळू दिवाकर आपले पैसे आता काय मिळत नाही या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले होते.