दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लता मंगेशकर यांचा स्वर आणि ओ पी नय्यर यांचे सूर का जुळले नाहीत?
उभ्या आयुष्यात लता मंगेशकर यांचा स्वर न वापरता तब्बल २० वर्षे संगीताच्या दुनियेत ताठ मानेने जगलेल्या ओ पी नय्यर यांची गोष्टच वेगळी होती. भन्नाट बेदरकारपणा त्याच्यात मुरला होता. काहीसा तापट / शीघ्रकोपी अशी त्याची प्रतिमा तयार झाली होती. आपल्या मूल्यांवर तो अटल आणि अढळ होता.
भारतीय चित्रपट सृष्टीत संगीतकार ओ पी नय्यर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या संगीतात पंजाबी घराण्याची नशा होती, एक ऱ्हिदम होता, एक ठेका होता. आज १६ जानेवारी ओ पी नय्यर यांचा जन्मदिवस (जन्म १६ जानेवारी १९२६). त्यांना आपल्यातून जाऊन देखील आता चौदा पंधरा वर्षे होत आहेत. पण त्यांच्या संगीताबद्दल/ त्यांच्या गाण्यांबाबत रसिक मात्र कायम चर्चा करीत असतात.
आता मूळ विषयाकडे येवूया. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एकही गाणे का गायले नाही? हा रसिकांच्या दृष्टीने खूपच कुतूहलाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. एकीकडे लताची बहिण आशा भोसले ओपीच्या संगीताचा ‘प्राण स्वर’ असताना लताचा आवाज मात्र त्याच्या संगीतात चुकूनही सापडत नाही, याची रसिकांना कमाल वाटते.
खरोखरच ओपी आणि लता कधीच एकत्र का येऊ शकले नाही याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, तर असे दिसते की, १९५२ सालच्या दलसुखलाल पंचोली यांच्या ‘आसमान’ या चित्रपटासाठी खरं तर ओ पी कडे लता मंगेशकर गाणार होत्या. ओपी चा हा पहिलाच चित्रपट होता. आपल्या या चित्रपटासाठी लताने गावे ही पांचोली यांचीच इच्छा होती. त्यांनी गायक सी एच आत्मा यांच्यामार्फत लताला तसा निरोप दिला. ध्वनीमुद्रणाची तारीख देखील ठरली. परंतु अचानक काही अडचण आल्यामुळे लता रेकॉर्डिंगला पोहोचू शकल्या नाहीत. ओ पी नय्यर यांना ही गोष्ट खूप खटकली आणि त्यांनी ती गोष्ट खूपच पर्सनली घेतली.
‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ असा हा प्रकार झाला. भांडण/वितुष्ट असं काही झालं नाही, पण कटूता निर्माण झाली हे नक्की!
‘आसमान’ या चित्रपटातील ज्या गाण्याची रचना लता मंगेशकरसाठी केली होती, ते गाणे होते, ‘जब से पी संग नैना लागे…!’ हे गाणे पुढे गायिका राजकुमारी यांच्याकडून गाऊन घेतले. हे गाणे ऐकल्यावर वाटते, खरोखर लता करीताच ही चाल बांधली होती. अशी नकारात्मक सुरुवात झाल्याने पुढे ओपी आणि लता कधीच एकत्र आले नाहीत.
हे ही वाचा: तर किशोरकुमार झाले असते ‘आनंद’!!!
“इतर सर्व संगीतकार लताच्या स्वराच्या मागे धावतात, तिच्या स्वरा शिवाय देखील संगीत यशस्वी होऊ शकत नाही का, हा विचार मी केला आणि त्या स्वरापासून दूर राहिलो. तिचा आवाज माझ्या संगीतासाठी योग्य नव्हताच!” असा त्यांचा युक्तिवाद होता. अर्थात लताच्या स्वराबद्दल ओपी नय्यरना नितांत आदर होता. “शतकातून एखादाच असा स्वर निर्माण होतो” असं ते म्हणत.
एकदा विविध भारतीवर ‘विशेष जयमाला’ हा कार्यक्रम सादर करताना त्यांनी लताचे ‘तुम क्या जानो तुम्हारी याद मे हम कितना रोये’ हे गाणं लावलं होतं. अर्थात या वेळी लताच्या नावाचा उल्लेख त्यांनी केलाच नाही. सी रामचंद्र यांच्या संगीताचे मात्र वारेमाप कौतुक केले.
लता मंगेशकर यांनी विविधभारतीवर जयमाला सादर करीत असताना ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मेरे सनम’ या चित्रपटातील ‘ये है रेशमी जुल्फो का अंधेरा’ हे गाणं ऐकवलं होतं. अर्थातच ओ पी च्या नावाचा उल्लेख टाळून आशाचं आवडतं गाणं म्हणून त्यांनी ते लावलं होतं.
काहीही असो लताचे स्वर आणि ओ पी नय्यरचे सूर काही जुळले नाहीत हेच खरं! नव्वदच्या दशकात एकदा मध्यप्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार ओ पी नय्यर यांना जाहीर झाला होता, पण “ज्या गायिकेने माझ्या संगीतात एकही गाणे गायले नाही तिच्या नावाचा पुरस्कार मी कसा स्वीकारू?” असा युक्तिवाद करत तो पुरस्कार नाकारलाच. शिवाय संगीतकाराला गायकाच्या नावाचा पुरस्कार कसा देवू शकता, असा उलटा सवाल देखील खडा केला.
हे सुद्धा वाचा: जेव्हा सोंगाड्यालाच थिएटरमधून हाकललं जातं…
ओपीच्या निधनानंतर (२८ जानेवारी २००७) खरंतर आशा भोसले यांच्याकडून श्रद्धांजलीचे चार शब्द येण्याची रसिकांना अपेक्षा होती, पण ते आलेच नाहीत. लताने मात्र “ओ पी नय्यर यांच्याकडे त्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती आणि ही शैली इतर संगीतकारांपेक्षा संपूर्णतः वेगळी होती”, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.