दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा एका गीतकाराने लिहिलेले गाणे चक्क १५ वर्षानंतर चोरले जाते!
दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार सर्व क्षेत्रात होत असतात. कधी ते जाणीवपूर्वक होतात, तर कधी अनवधानाने होतात! पण या दोन्ही प्रकारात ज्याने त्याची निर्मिती केलेली असते त्याला मात्र नाहक मनस्ताप होत असतो. असाच मनस्ताप गीतकार विठ्ठल भाई पटेल यांना झाला होता.
आजच्या पिढीला गीतकार विठ्ठल भाई पटेल हे नाव कदाचित माहीत नसणार पण राज कपूरच्या ‘बॉबी’ या चित्रपटातील दोन गाणी विठ्ठल भाई पटेल यांनी लिहिली होती. या सिनेमातील ‘झूठ बोले कौवा काटे’ आणि ‘ना मांगू सोना चांदी, ना मांगू हिरा मोती’ ही दोन गाणी लिहिली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.
याच ‘बॉबी’ चित्रपटासाठी त्यांनी सिच्युएशन नुसार आणखी एक गाणे लिहीले होते. या गाण्याचे शब्द होते ‘वो कहते है हमसे, अभी उमर नही है प्यार की, नादा है वो क्या जाने कब कली खिली बहार की…’ टीनएजर लव्हस्टोरी असलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी हे गाणं खरंच एकदम परफेक्ट होतं. मुळात राजकपूर यांना हे गाणं प्रचंड आवडलं होतं.
राजकपूर हे स्वतः संगीताचे उत्तम जाणकार होते. चित्रपट संगीताच्या प्रत्येक सीटिंगच्या वेळी ते आवर्जून उपस्थित असायचे. त्यामुळे गाणं बनण्याच्या प्रक्रियेत ते प्रमुख साक्षीदार असायचे. या प्रस्तुत गाण्याची चाल त्यांनी स्वतः गुणगुणून लावली होती. मुळात या गाण्याचे शब्दच त्यांना बेफाम आवडल्याने शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या (आणि युनिटच्या) तोंडी हे गाणे चांगलेच रुळले होते. हे गाणं पुढे शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात रेकॉर्ड देखील करायचे ठरले होते पण नंतर काही कारणाने चित्रपटाची लांबी वाढत गेली आणि या गाण्याचे ध्वनिमुद्रण झालेच नाही.
या चित्रपटानंतर विठ्ठल भाई पटेल यांना बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट मिळत गेले. आर के बॅनर सोबत काम करताना ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘बिवी ओ बिवी’ या चित्रपटात त्यांनी गाणी लिहिली. पुढच्या दहा बारा वर्षात त्यानी ४० सिनेमांसाठी गाणी लिहिली. यात प्रामुख्याने ‘संन्यासी’, ’हरजाई’ या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. नंतर गीत लेखनातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते राजकारणात गेले.
मध्यप्रदेशच्या सागर या नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष झाले व नंतर तिथूनच ते आमदार देखील झाले आणि पुढे अर्जुनसिंग, मोतीलाल व्होरा यांच्या मंत्रिमंडळात सामील होऊन त्यांनी मंत्रीपद भूषवले.
या सगळ्या गदारोळात 1987 साली त्यांनी रेडिओवर एक गाणे ऐकले. हे गाणे तेच होते ‘बॉबी’ साठी जे त्यांनी लिहिलेले ‘वो केहते है हमसे…..’ हे गाणं आता नितीन मुकेश यांनी गायलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक के. रवि शंकर होते. खरी गंमत पुढेच आहे.
विठ्ठल भाई पटेल यांना त्यावेळी धक्का बसला. त्यांनी या चित्रपटाची कॅसेट आणि रेकॉर्ड बघितली त्या ठिकाणी गीतकार म्हणून चक्क इंदीवर यांचे नाव होते, तर संगीतकार म्हणून राजेश रोशन यांचे नाव होते. विठ्ठल भाई पटेल यांना स्वत:चा हा खूप मोठा अपमान वाटला. त्यांनी लिहिलेल्या गाण्याचे श्रेय दुसरेच कुणी तरी लाटत होते. हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.
विठ्ठल भाई पटेल यांनी ताबडतोब मुंबईला राज कपूर यांना फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली. राजकपूर यांची तब्येत त्या काळी ठीक नसायची तरी त्यांना देखील ही ‘शॉकिंग’ न्यूज अस्वस्थ करून गेली. ताबडतोब त्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले परंतु ज्या वेळी विठ्ठलभाई पटेल यांनी निर्मात्याला कायदेशीर नोटीस बजावली तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले . त्यात राज कपूर यांचं नाव आल्याने त्यांना दखल घ्यावीच लागली.
यानंतर निर्मात्यांनी भोपाळ येथे विठ्ठलभाई पटेल यांच्या घरी जाऊन चक्क मीडियासमोर त्यांची माफी मागितली आणि त्यांना ११ हजार रुपयांचा चेक दिला.
विठ्ठल भाई पटेल यांनी लगेच, “तो चेक कुठल्यातरी धर्मादाय संस्थेला द्या”, असे सांगितले आणि रेकॉर्ड व कॅसेटवर तसेच चित्रपटात श्रेयनामावलीत योग्य ते बदल करायचं सांगितले. त्यानुसार निर्मात्यांनी कॅसेट आणि रेकॉर्डवर वेगळ्या रंगाची शाई वापरून गीतकार म्हणून विठ्ठलभाई पटेल यांचे नाव लिहिले.
अर्थात ज्या रेकॉर्ड व कॅसेट मार्केटमध्ये उपलब्ध होत्या त्यांच्यावरच हे बदल करता आले. ज्या रेकॉर्डस् व कॅसेट्सची अगोदरच विक्री झाली होती त्यात बदल करता येणे शक्य नव्हते. पण एक कायदेशीर लढा विठ्ठलभाई पटेल लढले आणि जिंकले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी नम्रपणे सांगितले, “मी काही इंदीवर यांच्या एवढा मोठा गीतकार नाही, पण जे काम मी केले आहे त्याची तशीच नोंद होणे आवश्यक आहे.”
तरी झालेल्या प्रकारचा उलगडा होत नव्हता. हे गाणं पंधरा वर्षानंतर तिकडे कसं पोचलं? त्यांनी जुना घटनाक्रम आठवून पहिला आणि त्यांना त्याचे उत्तर मिळाले. ज्यावेळी ‘बॉबी’ या चित्रपटाच्या गाण्याची म्युझिक सिटिंग चालू होती त्यावेळी ‘बॉबी’चे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना सहाय्यक म्हणून संगीतकार राजेश रोशन देखील उपस्थित होते.
====
हे देखील वाचा: किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!
====
या सर्वांच्या उपस्थितीत राजकपूर यांनी स्वतः जाऊन हे गाणे दाखवले होते. (त्याचा ऑडिओ यु ट्यूब वर उपलब्ध आहे.) या सगळ्याची नोंद राजेश रोशन यांनी घेतली होती आणि पंधरा वर्षानंतर त्यांनी हीच चाल वापरून चक्क हे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपटाची उरलेली गाणी इंदीवर यांनी लिहिली असल्यामुळे हे गाणे देखील त्यांच्या नावावर (अनावधानाने?) टाकले गेले.
निर्मात्यांनी केलेले बदल रेकॉर्ड आणि कॅसेट मध्ये दिसतात. पण आज अनेक वेबसाईटस वर अजूनही हे गाणे इंदीवरच्या नावावरच आहे. माध्यमांवरील अनेक सांगीतिक कार्यक्रमात जेव्हा या गाण्याचा उल्लेख होतो तिथे देखील अजूनही याचे गीतकार म्हणून इंदीवर यांचेच नाव घेतले जाते.
====
हे ही वाचा: पंचमच्या ‘पार्श्वगायना’चे अज्ञात पैलू
====
आपल्यावर झालेल्या अन्यायाची कायदेशीर लढाई विठ्ठल भाई पटेल जिंकले पण तोवर खूप उशीर झाला होता. आज राजकपूर, इंदीवर आणि विठ्ठल भाई पटेल यापैकी कुणीच हयात नाही. पण अनावधानाने का होईना झालेल्या चुकीच्या बदल्यात पटेल यांनी दिलेला लढा सिनेरसिकांच्या चांगलाच लक्षात आहे.