‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
असं काय घडलं की ‘त्या’ अभिनेत्रीने सिनेसृष्टीशी कायमचे नाते तोडून परदेशात जाणे पसंत केले?
साठच्या दशकातील एका अभिनेत्रीला अशा एका ‘लाजिरवाण्या प्रसंगाचा’ सामना करावा लागला की, त्यामुळे तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. नक्की काय घडलं होतं? तिच्या बाबतीत नेमकी अशी कोणती गोष्ट घडली की तिला सिनेमाच्या क्षेत्रातून बाहेर पडावे लागले? हा किस्सा जितका त्या अभिनेत्रीवर झालेल्या अन्यायाचा आहे तितकाच अभिनेत्रीकडे ‘कलावंत’ म्हणून न पाहता एक स्त्री म्हणून, एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे या पुरुषसत्ताक मानसिकतेतून घडलेल्या प्रमादाचा देखील आहे. (Untold story of Faryal)
आपल्या हिंदी सिनेमात नायिकेसोबतच सहनायिका, खलनायिका हा ट्रेंड सुरुवातीपासूनच आहे. पन्नासच्या दशकात हेलन, कुक्कू या अभिनेत्री ‘व्हॅम्प’ म्हणून सिनेमाच्या दुनियेत आल्या. त्या उत्तम नर्तिका होत्या. त्या काळात कॅब्रे डान्सची लाट आली होती. काहीशा खलनायकी टाईपच्या भूमिका असलेला प्रकार त्या काळात कमालीच्या लोकप्रिय होत होता. खलनायकासोबत असलेली मदालसा या भूमिकेचा आवाका असायचा.
हेलन असल्या भूमिकात माहीर होती. पुढे बिंदू,अरुणा इराणी, पद्मा खन्ना, कल्पना अय्यर अनेक नायिका व्हॅम्प म्हणून पडद्यावर आल्या. अर्थात यातील काहींनी पुढे ‘मेन स्ट्रीम’मध्ये येऊन नायिकेच्या भूमिकादेखील केल्या.
साठच्या दशकाच्या मध्यावर ‘फरियाल’ (Untold story of Faryal) नावाची एक अभिनेत्री हिंदी सिनेमामध्ये आली. तिचा पहिला सिनेमा होता १९६५ साली आलेला ‘जिंदगी और मौत’. यात तिचा नायक होता अभिनेता प्रदीप कुमार. संगीतकार सी रामचंद्र यांचे अप्रतिम संगीत या सिनेमाला लाभले होते. “दिल लगाकर हम न समझे जिंदगी क्या चीज है, इश्क कहते है किसे आशिकी क्या चीज है” ही अप्रतिम गझल या सिनेमात होती आणि ती फरियालवर चित्रीत झाली होती. पण सिनेमा फ्लॉप ठरला.
‘जिंदगी और मौत’ या सिनेमानंतर ती ‘बिरादरी’ या चित्रपटात शशि कपूरची नायिका बनली. त्या काळात सात्विक, सोज्वळ चेहऱ्याच्या अनेक नायिका रुपेरी पडद्यावर असल्याने, फरीयाल सारखी काहीशा तिखट सौंदर्याची युवती नायिका म्हणून यश मिळवू शकली नाही. त्यामुळे तिने सिनेमात व्हॅम्पच्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. (Untold story of Faryal)
‘नवकेतन’च्या १९६७ सालच्या ‘ज्वेल थीफ’ नावाच्या सिनेमामध्ये एक हॉट कॅबरे तिला करायला मिळाला . या डान्स नंबर नंतर तिच्याकडे अशाच प्रकारच्या भूमिकांची रांग लागली. खरंतर ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमातील कॅब्रे देखील तिलाच मिळणार होता, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिचे अनेक कॅब्रे डान्स सिनेमात दिसू लागले. हळूहळू या क्षेत्रात तिचं नाव व्हायला लागलं.
याच काळात १९६८ साली दिग्दर्शक रवी नगाई यांनी ‘द गोल्ड मेडल’ या सिनेमाची घोषणा केली. ही सिनेमा एक ‘स्पाय मूवी’ होता. यात फरीयालला भूमिका मिळाली. तिच्यावर एक डान्स नंबर देखील या सिनेमात चित्रित झाला होता. या सिनेमात जितेंद्र ,प्रेमनाथ, राखी यांच्या देखील भूमिका होत्या.
या सिनेमाचे चित्रीकरण चालू असताना एक शॉट मध्ये प्रेमनाथ फरियालवर जबरदस्ती करतो, असा प्रसंग होता. यामध्ये तिला बाहुपाशात घेऊन एका सोफासेटवर तिच्यावर जबरदस्ती करतो. प्रेमनाथ रंगेल गडी होता. (‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातील ‘हुस्न के लाखो रंग’ या कॅब्रे मधील पद्मा खन्ना सोबतचा त्याचा जबरा अभिनय रसिकाना आठवत असेलच!) हा शॉट चित्रित होत असताना अभिनेता प्रेमनाथ त्याच्या भावनांना आवर घालू शकला नाही आणि अभिनेत्री फरियालला बाहुपाशात घेऊन तो सोडायला तयारच होईना. सोफ्यावरून तो तिला घेऊन खाली कार्पेटवर आला आणि तिला बाहुपाशात घेऊन लगट करू लागला. (Untold story of Faryal)
फरीयाल कमालीची घाबरली. कारण शॉट सांगताना दिग्दर्शकाने असे काहीच सांगितले नव्हते. प्रेमनाथची बळजबरी चालूच होती. सेटवरील आंबट शौकीन लोक त्या दृश्याची मजा घेत होते. शेवटी तिने प्रेमनाथच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली व दिग्दर्शकाकडे बघून म्हणाली, “क्या कोई कट बोलेगा?” दिग्दर्शक रवि नगाइ भानावर आला आणि त्याने ‘कट’ म्हटलं.
सेटवरच फरियाल रडायला लागली. प्रेमनाथचा चित्रिकरणाच्या वेळचा अविर्भाव आणि ॲटीट्युड पाहून ती अस्वस्थ झाली. ती सेटवरून तडक घरी गेली आणि तिने निर्णय घेऊन टाकला की, “यापुढे मी सिनेमात काम करणार नाही.” (Untold story of Faryal)
=======
हे देखील वाचा – अशी आहे अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या स्क्रीन टेस्टची कहाणी
=======
दिग्दर्शकाने तिला समजावून सांगितलं. प्रेमनाथनेही तिची माफी मागितली, पण फरियाल आपल्या भूमिकेवर कायम राहीली. ‘गोल्ड मेडल’ सिनेमातील राहिलेलं थोडसं शूटिंग पूर्ण करून सिनेसृष्टीला बाय बाय करून ती कायमची परदेशात निघून गेली.
हा ‘द गोल्ड मेडल’ सिनेमा पुढे खूप रखडला. १९८४ साली कसाबसा पूर्ण होऊन रिलीज झाला आणि फ्लॉप झाला. आज फरीयाल ‘इज्राईल’ या देशात मायानगरी पासून कोसो दूर आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.