द बिग बुल…अभिषेकच्या अभिनयाची कसोटी
अभिषेक बच्चन आणि अजय देवगण ही जोडी मोठ्या पडद्यावर मोठा स्कॅम करण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त यात दोघांचीही भूमिका वेगवेगळी असणार आहे. द बिग बुल या चित्रपटातून अभिषेक आणि अजय ही जोडी एकत्र दिसणार असून अभिषेक मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे तर अजय देवगण या चित्रपटाचा निर्माता आहे. तर कुकी गुलाटी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
भारताच्या शेअर बाजारात १९९२ मध्ये हर्षद मेहता नावाचं वादळ आलं होतं. एका सामान्य शेअर ब्रोकर ते करोडो रुपयांची उलाढाल करणारा ब्रोकर हा त्याचा प्रवास आणि त्यातून शेअर बाजारावर ओढवलेलं संकट… हा विषय अनेक निर्मात्यांना चित्रपट काढण्यासाठी खुणावत होता. हे आव्हान अजय देवगणनं स्विकारलं. द बिग बुल या नावानं अजयनं या चित्रपटाची निर्मिती केली असून ८ एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.
नुकताच अजयनं आपल्या सोशल अकाऊंटवरुन द बिग बुल (The Big Bull) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. यात अभिषेक (Abhishek Bachchan) हेमंत शाह नावाची भूमिका करत आहे. १९९२ मध्ये शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताने जी उलथापालथ केली होती, त्यावर द बिग बुल ची कथा आधारीत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यावर तासाभरातच लाखो लाईक्सचा पाऊस पडला. याला एक मुख्य कारण म्हणजे प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय. अनेकांना अभिषेकच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुरु चित्रपटातील गुरुनाथ देसाईची आठवण झाली.
‘इस देश मैं हम कुछ भी कर सकते है’ या वाक्यानं ट्रेलरची सुरुवात होते. यातूनच हेमंत शाहची मानसिकता व्यक्त होते. शेअर ब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनावर असलेल्या या चित्रपटाचे संवादही तेवढेच परिणामकारक आहेत. चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
याच विषयावर गेल्या वर्षी स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं. यात प्रतिक गांधी या कलाकारानं मुख्य भूमिका साकारली होती. ही वेबसिरीज चांगलीच लोकप्रिय झाली. त्यासोबत प्रतिक गांधीनं साकारलेल्या हर्षद मेहताच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. त्यामुळेच अभिषेकही आता चित्रपटात हर्षद मेहताची भूमिका करणार म्हणून त्याची आणि प्रतिक गांधीची तुलनाही अनेकांनी केली आहे. द बिग बुल मधला हेमंत शाह अर्थात अभिषेक बच्चनने या भूमिकेचं सोनं केल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट होतंय.
अभिषेकनं या चित्रपटाच्या यशासाठी मेहनत घेतली आहे. अभिषेकनं आपल्या नावात आणखी एक ए लिहीला आहे. अभिषेकने लुडो या चित्रपटाच्यावेळी त्याच्या नावात बदल केला होता लुडो मध्ये अभिषेकची भूमिका लहान होती. पण समिक्षकांनीही या भूमिकेचं कौतुक केलं. त्यामुळे द बिग बुल मध्येही अभिषेकनं आपल्या नावात बदल केला आहे. द बिग बुलचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे द बिग बुल आणि चेहरे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. द बिग बुलमध्ये अभिषेक बच्चन तर चेहरे मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) प्रमुख भूमिकेत आहेत. द बिग बुल ओटीटी माध्यमावर आणि चेहरे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या बापलेकाच्या जोडीत बॉक्स ऑफीसवर यश कोण खेचून आणेल याकडे आता लक्ष लागले आहे.