महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘करवा चौथ’ मुळे अभिनेता जितेंद्रचे वाचले प्राण!
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रूढी परंपरा सण-वार आणि आचार विचाराला खूप महत्त्व आहे. अनादी काळापासून चालत आलेल्या या संस्कारांनी भारतीय समाज जीवन समृद्ध झाले आहे. आज वैज्ञानिक युगामध्ये देखील भारतीय मूल्यांना जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे. काही रूढी परंपरांनी आता आधुनिक स्वरूप घेतले असले तरी त्यातील मूल्य संस्कार मात्र तेच कायम आहेत. असाच एक पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासाला जोडणारा सण म्हणजे करवा चौथ. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हा सण येतो. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये या सणाला परंपरेला जास्त महत्त्व आहे. हे व्रत पत्नीने करायचे असून रात्री चंद्र दर्शन केल्याशिवाय पाण्याचा थेंब देखील ग्रहण करायचा नाही असे याचे स्वरूप आहे. चाळणीतून चंद्र पाहणे पतीच्या हातून पहिला घास घेणे या मोठ्या ‘रोमँटिक’ कल्पना यात आहेत. पती-पत्नीच्या अतूट आणि अपार प्रेमाला दर्शविणारा हा सण आहे. याचा वापर आपल्या हिंदी सिनेमांमध्ये वारंवार दिसून येतो.
साठ आणि सत्तरच्या दशकात तर करवा चौथ या सणाचा मोठा प्रभाव हिंदी चित्रपटांवर दिसून येतो. याच करवा चौथमुळे अभिनेता जितेंद्रचे (Jitendra Kumar) प्राण वाचले होते हे तुम्हाला माहित आहे कां? अलीकडेच स्वतः जितेंद्रने कपिल शर्मा शो मध्ये हा किस्सा सांगितला होता. मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. १२ ऑक्टोबर १९७६ या दिवशी अभिनेता जितेंद्रला डी रामा नायडू यांच्या ‘दिलदार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मद्रासला (आताच्या चेन्नई) जायचे होते. यासाठी त्याने इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 171 चे तिकीट बुक केले होते. ही फ्लाईट संध्याकाळी सात वाजता मुंबईच्या सांताक्रुज विमानतळावरून होती. त्याच दिवशी नेमका करवा चौथचा दिवस होता. त्यामुळे अभिनेता जितेंद्रची (Jitendra Kumar) पत्नी शोभा कपूर हिचा सकाळपासून जितेंद्रला मद्रासला जाण्याचा विरोध होता. कारण फ्लाईट संध्याकाळी सात वाजता होते. तोवर हे व्रत पूर्ण होणे शक्य नव्हते. कारण चंद्रोदय रात्री साडेआठ वाजता होणार होता. दिवसभर या दोघांचा या विषयावर वाद चालू होता. परंतु जितेंद्र (Jitendra Kumar) तसा वक्तशीर माणूस आणि साउथ कडील सिनेमाचा शेड्युल एकदम टाईट असते; तिथे अजिबात हलगर्जीपणा चालत नाही याची त्याला जाणीव होती . त्यामुळे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या न्यायानुसार जितेंद्र विमानतळावर जायला निघाला. त्याच्या पत्नीने नाराजीनेच त्याला जायची परवानगी दिली. तिचा दिवसभराचा उपवास होता.
परंतु एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर जितेंद्रच्या (Jitendra Kumar) असे लक्षात आले की, आपली फ्लाईट दोन तास उशिरा आहे. लेट आहे. त्यामुळे त्याने एअरपोर्टवरूनच पत्नी शोभाला फोन केला आणि सांगितले ,”माझी फ्लाईट दोन तास लेट आहे. त्यामुळे मी घरी येतो. तोवर चंद्रोदय देखील होईल. तुझे व्रत आपण पूर्ण करू आणि त्यानंतर मी पुन्हा विमानतळावरून फ्लाईट पकडेन.” त्यावेळी जितेंद्र (Jitendra Kumar) बांद्रा पाली हिल ला राहत असल्यामुळे तिथून एअरपोर्ट जवळच होते. पत्नी शोभा कपूरला खूप आनंद झाला. अशा प्रकारे जितेंद्र एअरपोर्टवरून पुन्हा घरी आला. पण साडेआठ वाजले तरी चंद्रोदय होत नव्हता. चंद्र काही दिसत नव्हता. शोभा कपूरने ,” मी चंद्र दिसल्याशिवाय काहीही खाणार नाही.” असे निक्षून सांगितले. वेळ निघून चालला होता. पत्नी प्रेम की कर्तव्य या दुविधे मध्ये बिचारा नवरा जितेंद्र सापडला होता. परंतु शेवटी पत्नी प्रेमाचा विजय झाला. शोभा कपूरने जितेंद्रला थांबवून ठेवले! जितेंद्रने (Jitendra Kumar) मद्रासला जायचे रहित केले.
======
हे देखील वाचा : ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ हे गाणं ‘आनंद’ सिनेमासाठी लिहीलंच नव्हतं!
======
पण त्या त्यानंतर अशी एक घटना घडली ज्याचा जितेंद्र ने कधी विचार देखील केला नव्हता. तो आपल्या घराच्या बाल्कनी तून एअरपोर्ट कडे पाहत होता. त्याच्या बाल्कनी तून विमानतळ दिसत होते. जितेंद्र (Jitendra Kumar) आणि त्याची पत्नी त्या रात्री बाल्कनीत गप्पा मारत उशिरा पर्यंत बसले होते. मध्य रात्री अचानकपणे एक आधीचा गोळा आकाशात झेपावताना दिसला आणि पुन्हा जमिनीवर पडताना दिसला. त्यांना कळेना आपल्याला काय दिसले. परंतु थोड्या वेळातच खुलासा झाला. जितेंद्र (Jitendra Kumar) ज्या फ्लाईटने मद्रास ला जाणार होता तीच इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 171 टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाली आणि सांताक्रुज एअरपोर्ट पासून जवळच या विमानाचा अपघात झाला. विमानातील सर्व ९५ प्रवासी आणि कृ मेंबर्स यांचा अक्षरशः कोळसा झाला. एकही जण यातून वाचला नाही. सर्व बातमी ऐकून जितेंद्र (Jitendra Kumar) अक्षरशः थिजून गेला. कारण मृत्यू त्याच्यासमोर उभा राहिला होता परंतु पत्नीच्या प्रेमाने तो टळला गेला. या विमान अपघातात मल्याळम अभिनेत्री राणी चंद्रा हिचा देखील मृत्यू झाला. हा किस्सा सांगताना जितेंद्र भारावून गेला होता आणि आपल्या पत्नीच्या प्रेमाच्या धाग्याने आपण आज जिवंत आहोत हे सांगत होता!