‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
येतोय ओम राऊतचा आदिपुरुष
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत…त्याचं कारण आहे, आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर. श्रीरामाच्या जीवनावर आधारीत असलेल्या आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा सोशल मिडीयावर केल्यावरच लोखो लाईक यापोस्टरला मिळाले आहेत. त्यासोबत चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे.
बाहुबली आणि साहु या चित्रपटांनी हजारो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आदिपुरुष या चित्रपटात श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष हा 3D अॅक्शन चित्रपट असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचे शुटींग सुरु होणार आहे. आदिपुरुषच्या पोस्टरमध्ये Celebrating Victory of Good over Evil असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये श्रीरामाचं धनुष्यबाण दिसत आहे. तर दुसरीकडे हनुमान आणि रावण दिसत आहे.
श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास आहे, आता रावणाच्या भूमिकेत कोण असेल याचीही चर्चा आहे. तसेच हनुमानाची भूमिका कोण साकारणार आणि सीता माता कोण असेल याचीही चर्चा सुरु झाली आहे. सीतामातेच्या भूमिकेसाठी तीन अभिनेत्रींचं नाव चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे अनुष्का शेट्टी. यापूर्वी अनुष्का आणि प्रभास यांची जोडी बाहुबली आणि मीर्ची मध्ये चांगलीच गाजली होती. सोबत काजल अग्रवालचंही नाव चर्चेत आहे. पण या दोघींपेक्षा सर्वात अग्रक्रम आहे, तो किर्थी सुरेश या आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या नावाला. किर्थी सुरेश महानती, पेनगन या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी सध्या सर्वात आघाडीवर आहे.
आदिपुरुष या चित्रपटाचं बजेट आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटाहून अधिक असणार आहे. साधारण 400 करोड रुपयांचं हे बजेट बाहुबली 2 पेक्षा अधिक आहे. यासर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे ओम राऊत.तान्हाजी-द अनसंग वॉरिअर या चित्रपटातून ओम राऊत यांनी मराठ्यांच्या भव्यदिव्य इतिहासाला समर्थपणे पडद्यावर साकारले. लोकमान्य-एक युगपुरुष हा ओम यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
ओमने डीएआर मोशन पिक्चर्सचे क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले. सिटी ऑफ गोल्ड, लालबाग परळ, हॅन्टेड – 3D यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. तान्हाजी या चित्रपटानंतर ओम यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता ओम आणि प्रभास एकत्र असल्यानं आदिपुरुष हा नक्कीच भव्यदिव्य आणि आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड मोडणारा चित्रपट असेल हे नक्की. प्रभास याचा राधेश्याम हा प्रेमकाहाणीवर आधारीत चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे. तर दिपिका पादुकोणबरोबरही प्रभासचा एक चित्रपट येतोय. विज्ञानपट असलेल्या या चित्रपटात प्रभासनं सर्वाधिक मानधन घेतलं आहे. हे प्रभासचे आगामी चित्रपट सुपरहीट असणारच.पण त्यापेक्षाही त्याच्या चाहत्यांना प्रतिक्षा असेल ती आदिपुरुषची.
सई बने