रामसेतु…नवीन वाद…
वर्षाला किमान चार चित्रपट करणा-या अक्षय कुमारने त्याचा धुमधडाका कोरोनाकाळातही कायम ठेवला आहे. कोरोनाचा कहर थोडा कमी झाल्यावर लक्ष्मी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करून त्यानं ओटीटीवर हा चित्रपट रिलीजही केला. अर्थात कधीनव्हे तो अक्षय कुमार लक्ष्मी चित्रपटावरुन ट्रोल झाला. आधीच्या नावात कटछाट करावी लागली. अक्षय कुमारचा सर्वात बकवास चित्रपट. असा शेरा त्याला सहन करावा लागला. पण एवढे होऊनही लक्ष्मी चित्रपट अक्षयसाठी पैसा वसूल ठरलाय. दिवाळीत सर्वाधिक हा चित्रपट बघितला गेला. ही चांगली बातमी येत असतानाच अक्षयनं त्याच्या पुढच्या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रामसेतु नावाचा चित्रपट अक्षय करीत आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर त्याने शेअर केले आहेत. या चित्रपटाच्या कथेबाबत वा सहकलाकारांबाबत अद्यापही काहीच माहिती त्यानं दिली नाही. मात्र या पोस्टरवर असलेल्या टॅग लाईनमुळे अक्षय पुन्हा ट्रोल होण्याची शक्यता आहे.
सूरज पे मंगल भारी, शौकीन, परमाणू चित्रपट करणारे अभिषेक शर्मा हे या रामसेतुचे दिग्दर्शक आहेत. अक्षयनं चित्रपटाचं पोस्टर शेअर करतांना फक्त दिग्दर्शकाचं नाव जाहीर केलं आहे आणि आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. विक्रम मल्होत्रा आणि अरुणा भाटीया या चित्रपटाचे निर्माते आहेत. हाती धनुष्यबाण घेऊन युद्धाच्या पवित्र्यात उभे असलेले श्रीराम आणि सोबत अक्षय कुमारचा वेगळा लुक या पोस्टरमध्ये आहे. मात्र यासोबत या पोस्टरवर असलेली ही सच या कल्पना. ही टॅग लाईन वादाचा विषय होणार अशी शक्यता आहे. या पोस्टरसोबत अक्षयनं ‘इस दीपावली सभी भारतीयों के अंदर राम के आदर्श को जीवित रखेंl ताकि हम हमारी आने वाली पीढ़ी के लिएएक सेतु बना सके, ‘रामसेतु’ नाम का एक बड़ा बीड़ा उठाया हैl सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएंl’ असा संदेश दिला आहे.
सध्या बॉलिवूडचा सर्वाधिक व्यस्त कलाकार म्हणून अक्षय कुमारचा उल्लेख होतो. राखी पौर्णिमेला अक्षयनं आपल्या रक्षा बंधन या चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाय डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज चौहानमध्येही तो प्रमुख भूमिकेत आहे. त्याचा बेलबॉटम चित्रपटही प्रदर्शनाच्या तयारीत आहे. आणि अन्य काही प्रोजेक्टवर त्याचे काम चालू आहे. लक्ष्मी चित्रपटाला क्रिटीक्स आणि नेटक-यांनी चांगलेच झोडले होते. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट या टिकेचा जास्त फायदाच झाल्याचे दिसले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट म्हणून लक्ष्मीची नोंद झाली. त्यामुळेच या खिलाडीकुमारच्या आगामी चित्रपटाकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.