‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Agnipath ते ‘मुनवली’; अमिताभ अलिबागकर झाला…
शीर्षकावरून फिल्म दीवाने वगळता बाकीचे कदाचित गोंधळात पडले असतील… अमिताभ बच्चनने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे साडेसहा कोटींचे तीन भूखंड विकत घेऊन आपल्या हक्काच्या जागेचा विस्तार केला हे समजले, पण त्यात मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’ (१९९०) या चित्रपटाचा संबंध काय असा हे शीर्षक वाचून आणखीन एक प्रश्न पडला असेल.

मुनवली हे गाव समुद्र मार्गे जायचे ठरवल्यास गेट वे ऑफ इंडिया येथून लॉन्च अथवा बोटीने मांडवा बीचला जायचे अथवा भाऊचा धक्का येथून रो रो सर्व्हिसने मांडवा येथे जायचे, तेथून साधारण पंधरा वीस मिनिटावर हे गाव आहे. तेथून जवळचे गाव मापगाव आणि आणखी थोडे पुढे गेल्यावर चोंडी, किहीम, कणकेश्वर फाटा ही गावे आहेत. बच्चन कुटुंबिय जुहूवरुन निघाल्यावर अटल सेतू मार्गाने आपल्या या नवीन संपत्तीकडे जाणे पसंत करेल. ही जागा एकूण ८ हजार,८८० स्क्वेअर फूट इतकी आहे.

अलिबाग हे मोठे उद्योगपती, क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार अर्थात सेलिब्रिटी यांच्यासाठी एक ‘गुंतवणूक केंद्र’ झाले आहे आणि पर्यटकांना विकेण्ड पिकनिकचे आकर्षण झाले आहे. मांडवा ते चौल, रेवदंडा, काशिद समुद्र किनारा असा हा एकूण भाग गुंतवणूक केंद्र व पर्यटन अशा दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जावू लागलाय. काही वर्षांनी अमिताभ बच्चनच्या मुनवली फार्म हाऊसला भेट देण्यासाठी देशभरातील त्याचे चाहते उत्सुक असतील. आजच्या डिजिटल युगात अशा गोष्टी खूप वेगाने माहित होतात. ‘अग्निपथ’ चित्रपटात विजय दीनानाथ चौहान (अमिताभ बच्चन) आणि कांचा चीना (डॅनी डेन्झोप्पा) यांच्यातील संघर्ष मांडवा या समुद्र किनारी गावात घडतो. एखाद्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे या चित्रपटात मांडवा बीचला महत्त्व आहे.
पटकथेत जरी हे मांडवा असले तरी प्रत्यक्षात हे चित्रीकरण गोव्यातील अशाच एका समुद्र किनारी गावात करण्यात आले. दिग्दर्शक मुकुल आनंदने आपल्या ‘इन्साफ’ (१९८६) या चित्रपटात खरोखरच माऺडवा बीचवर विनोद खन्ना व शक्ती कपूर यांच्यातील काही मारहाण दृश्य चित्रित केली. त्यामुळे मुकुल आनंदला मांडवा बीचची ओळख झाली होतीच. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘अग्निपथ’(२०१२) घ्या रिमेकमध्ये मांडवा बीचला स्थान असले तरी त्याचे चित्रीकरण गुजरातमधील समुद्र किनारी गावात करण्यात आले आहे.
================================
हे देखील वाचा : Dine In Film Theatre आणखीन एक पुढचं पाऊल
================================
अमिताभ बच्चन आता अलिबागकर झाला आहे आणि रुपेरी पडद्यावरील मांडवा आता त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात आला आहे. शाहरुख खानपासून अक्षय खन्नापर्यत अनेकांचे अलिबाग तालुक्यातील लहान मोठ्या गावात ‘सेकंड होम'”‘ आहे, त्यात अमिताभ बच्चनची भर हवीच होती. या सगळ्यातून अलिबाग खूपच बदलत असले तरी त्याचे मूळ गावपण, नारळ सुपारीची वाडी हे वैशिष्ट्य आणि वैभव कायम राहूदूत. अलिबाग माझे आजोळ आहे म्हणून मला त्यांचे जास्तच प्रेम.
