
Amitabh Bachchan यांच्या ‘या’ गाण्याला देशभर मोठा विरोध झाला होता!
ख्यातनाम प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला अमिताभ बच्चन यांचा ‘लावारिस’ हा सिनेमा 1981 सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. अमिताभच्या सक्सेसफुल करिअरमधील हा एक माइल स्टोन चित्रपट होता, या चित्रपटातील एका गाण्यामुळे मात्र प्रचंड मोठा वाद निर्माण झाला होता. काही सामाजिक संघटना चक्क कोर्टात गेल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरवर काळे फासले जात होते. काही ठिकाणी तर महिला संघटनांनी सिनेमाचे शो देखील बंद पाडले. अर्थात हे सर्व रामायण घडून देखील सिनेमा सुपर डुपर हिट झाला आणि गाणे तर त्याच्यापेक्षा हिट झाले. अश्लील अश्लील म्हणून ज्या गाण्यावर बंदी आणावी अशी मागणी होत होती तेच गाणं आज चाळीस – पंचेचाळीस वर्षानंतर देखील तितकेच पॉप्युलर आहे. कोणते होते ते गाणे आणि काय होता नेमका किस्सा?

‘लावारिस’ हा प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट २२ मे १९८१ रोजी प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, झीनत मान,अमजद खान, सुरेश ओबेरॉय, राखी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. प्रकाश मेहरा सोबतचा हा अमिताभचा चौथा चित्रपट. अमिताभला सुपरस्टार बनवण्यात प्रकाश मेहरा यांचा मोठा वाटा होता. या सिनेमांमध्ये ॲक्शन,डायलॉग आणि मारधाड प्रचंड रेलचेल होती. चित्रपट पूर्ण तयार झाला होता. प्रकाश मेहरा यांनी जेव्हा या सिनेमाची ट्रायल बघितली तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सजेस्ट केले की या सिनेमांमध्ये प्रेक्षकांना थोडा रिलीफ मिळावा म्हणून एक एंटरटेनमेंट सॉंगची गरज आहे. प्रकाश मेहरा त्या पद्धतीने विचार करू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की या सिनेमातील एक गाणं जे अलका याज्ञिकने गायलं होतं आणि राखीवर चित्रीत झालं होतं तेच गाणं जर अमिताभच्या स्वरात रेकॉर्ड केले तर? त्यांनी लगेच संगीतकार कल्याणजी यांच्याशी संपर्क साधून गाणे रेकॉर्ड करायचे ठरवले. गाणे होते ‘ मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..’
अमिताभने या पूर्वी ‘मिस्टर नटवरलाल’ (१९७९) या चित्रपटात ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो’ हे गाणं स्वत:च्या स्वरात गायलं होतं. अमिताभ त्यावेळी सुपरस्टार पदाच्या पीक पिरेडवर होता. अमिताभ बच्चनच्या अभिनया सोबतच त्याच्या स्वरात जर हे गाणं रेकॉर्ड केलं तर प्रेक्षकांना डबल एन्टरटेनमेंट डोस मिळेल याची खूण गाठ प्रकाश मेहरा यांनी बांधली होती. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या स्वरात हे गाणं प्रकाश मेहरा यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर कल्याणजी आनंदजी नाईट मध्ये ऐकलं होतं. एकदा होळीच्या वेळी देखील अमिताभने या गाण्याच्या काही ओळी गायल्या होत्या. त्यामुळे हे गाणं अमिताभ बच्चनच परफेक्ट जाऊ शकेल अशी त्यांना खात्री होती. या सिनेमातील इतर सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायलेली होती!
================================
हे देखील वाचा : The Great Gambler : अमिताभ बच्चनचा चांगला पण अंडर रेटेड सिनेमा!
================================
गाणे रेकॉर्ड झाले. जेव्हा हे गाणे शूट करण्याचा निर्णय झाला तेव्हा प्रकाश मेहरा यांनी नुकताच अमजद खान यांच्या एका आगामी चित्रपटाची ट्रायल पाहिली होती त्या चित्रपटात अमजद खानने स्त्री वेषात एक गाणे गायले होते प्रकाश मेहरा यांनी याच पद्धतीने ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणं अमिताभ वर स्त्री वेषात चित्रित करायचे ठरवले. अमिताभला सुरुवातीला थोडा संकोच वाटला पण नंतर तयार झाला आणि गाण्याचे शूट झाले. 22 मे 1981 या दिवशी या चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच सिनेमाला बंपर यश मिळाले. या गाण्यावर तर पब्लिक जाम फिदा झाली. त्या काळात लग्नसराई मध्ये कुठलीही बारात या गाण्याशिवाय पुरी होत नव्हती. हॉटेलमध्ये, पार्टीमध्ये सगळीकडे या गाण्याची धूम होती.

पण काही काळानंतर काही महिला संघटनांनी या गाण्यावर तीव्र आक्षेप घेतला हे गाणे अश्लील पद्धतीने चित्रित झाले आहे तसेच यातील ओळी महिलांना बदनाम करणाऱ्या आहेत असा त्यांचा आरोप होता. देशभरात आणखी काही संघटना देखील या गाण्याच्या विरुद्ध उभ्या राहिल्या. माधुरी या फिल्म मॅगझिनमध्ये यावर एक लेख देखील आला. गाण्याला विरोध जितका वाढत होता तितकीच त्याची लोकप्रियता देखील वाढत होती. पण आंदोलन वाढत गेले काही ठिकाणी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरलाला काळे फासण्यात आले तर काही ठिकाणी ‘लावारिस’चे शो बंद पाडण्याचा प्रयत्न झाला.
अमिताभने यावर खुलासा करायचे ठरवले. त्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले,” हे गाणं अश्लील अजिबात नाही. उत्तर प्रदेशातील लोकगीत आहे. आणि पहिल्यांदाच माझ्या सिनेमात आलेले नाही. यापूर्वी १९७५ साली ‘मजे लेलो’ या चित्रपटात तसेच १९७० साली ‘बॉम्बे टॉकीज‘ या चित्रपटात देखील हे गाणे होते आणि हे गाणे हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेले आहे!” त्यावर पुन्हा वादंग माजला. जर हे गाणे लोकगीत असेल तर त्याचे क्रेडिट हरिवंशराय बच्चन यांना कसे ?”, असा त्यांचा सवाल होता. त्यावर अमिताभ बच्चन यांची उत्तर असे होते की “अवधी लोकगीताला हरिवंश राय बच्चन यांनी दुरुस्त करून पुन्हा लिहिले आहे.” पण वाद वाढत गेला. इतका की या सिनेमाच्या रेकॉर्ड आणि कॅसेटवरून हरीवंशराय बच्चन यांचे नाव काढून टाकण्याची मागणी पुढे आली आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली. रेकॉर्डवर आता या गाण्याच्या पुढे पारंपारिक लोकगीत असे लिहिले गेले!
================================
हे देखील वाचा : एका सिनेमातून अमिताभ बच्चनने तर दुसऱ्या सिनेमातून Dharmendra ने का एक्झिट केली?
================================
जया भादुरी देखील या गाण्यावर प्रचंड नाराज होती. असे म्हणतात की या सिनेमाच्या प्रीमियरला जेव्हा हे गाणे पडद्यावर दाखवले गेले तेव्हा रागा रागात जया भादुरी थेटर सोडून बाहेर पडली होती! आपल्या पतीला स्त्री वेषात पाहणे तिला असह्य झालं. पण जया भादुरी एक विसरली काही वर्षांपूर्वी अमेरिकेत लता मंगेशकर शो मध्ये अमिताभ बच्चन यांनी हे गाणे स्टेजवर गायले होते आणि हे गाताना त्याने जया भादुरीला उचलून घेतले होते! सुपरस्टार राजेश खन्ना यांनी देखील या गाण्यावर सडकून टीका केली होती.” मला कुणी करोडो रुपये दिले तरी मी स्त्री वेषात पडद्यावर येणार नाही. मला माझा आत्मसन्मान आहे!” अशा शब्दात त्यांनी अमिताभ बच्चन सडकून टीका केली. काही महिन्यानंतर वादळ शांत झालं. हे गाणे त्या वर्षीचे बिनाका गीत माला तील सर्वोत्कृष्ट गीत ठरले! आज 40- 45 वर्षानंतर आपण जेव्हा हे गाणं पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला अश्लील अजिबात वाटत नाही पण त्या काळात मात्र मोठा गहजब झाला होता!